UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


सात सवयी - भाग ३

चौथी सवयः जिंका आणि जिंकू द्या

Make it a win-win situation. देणारा आणि घेणारा अशी जोडी कायम असणारच उदा. गुरु आणि शिष्य, विक्रेता आणि ग्राहक, कलाकार आणि रसिक, लेखक आणि वाचक. देणारा आणि घेणारा या दोघांचेही समाधान व्हावे असा प्रयत्न प्रभावी ठरणाऱ्या व्यक्ती नेहमी करत असतात.

खराब वस्तु विकल्यावर दुकानदार जिंकला पण ग्राहक हरला. व्यवहार बिनसला. कारण ग्राहक पुन्हा त्या दुकानात जाणार नाही. चांगली वस्तू दिल्यावर ग्राहकानं पैसे बुडवले तर विक्रेता हरला ग्राहक जिंकला म्हणून व्यवहार बिनसला. आता त्या ग्राहकाला दुकानदार दाराशी उभा करणार नाही. जेव्हा देणारा आणि घेणारा दोघंही जिंकतात तेव्हाच एकमेकांना उपयुक्त ठरण्याची प्रक्रिया चालू राहते.

मानवी समाजाचं मुख्य वैशिष्ट्य एकमेकांना उपयुक्त ठरणं हेच नाही का ? प्रभावी न ठरणारी माणसं बहुतेक वेळा ” फक्त मीच जिंकेन ” या रोगाची शिकार झालेली आढळतात.

पाचवी सवयः सह अनुभूतीचे महत्व

Think empathetically. सहानुभूती हा शब्द आपण मराठीत दया-करुणा या अर्थानं वापरतो. पण सह-अनुभूती म्हणजे खरं तर दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करणं आणि तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणं.

मी आणि माझं या पलीकडे जाऊन विचार केला की दुसऱ्याची भूमिका समजून घेणं सोपं जातं. ते केवळ दुसऱ्याच्या कल्याणासाठी नव्हे तर स्वतःच्या सुद्धा. ही सवय ठेवली तर मागच्या सवयीत वर्णन केल्याप्रमाणे दोघंही जिंकू शकतात. आणि सगळ्यांनी जिंकण्याचे फायदे सगळ्यांना मिळतात.

सहावी सवयः एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ

Use Synergy. सह-ऊर्जावान होऊया. कोणीही व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. मी, माझ्यातल्या उणीवांवर मात करण्यासाठी माझा सहकारी, पत्नी/पती, मित्र यांच्या सद्गुणांचा वापर करून परिस्थिती बदलू शकतो. आणि त्यांनाही तसं करण्यासाठी मदत करू शकतो.

एका कथेत आंधळा आणि पांगळा यांनी एकमेकांना मदत करून प्रवास केला असं वर्णन आहे. धट्टाकट्टा आंधळा चालत होता आणि पांगळा त्याच्या खांद्यावर होता. पांगळ्याला दिसत होतं आणि तो अांधळ्याला मार्ग दाखवत होता ! (Differently abled हा शब्दप्रयोग म्हणूनच आला असेल !)

सातवी सवयः सवय केल्याने होत आहे रे

Sharpening the saw. उजळणी करत राहणं फार महत्वाचं असतं. आयुष्यात एकदाच दुसऱ्याचा विचार करून दोघेही जिंकू या स्थितीला येऊन चालत नाही. ही वहिवाट व्हावी लागते. म्हणून वर उल्लेख केलेल्या प्रत्येक सवयीचा प्रत्यक्ष व्यवहारात सतत वापर करणं सर्वात अधिक महत्वाचं आहे. पहिल्या सहा सवयींची सवय असणं हेच यशाचं गमक म्हणावं लागेल.

मला वाटतं शेवटची सवय ही सर्वात महत्वाची आणि अवघड आहे. कारण पुस्तकातली सुवचनं फक्त पाठ करण्याची आणि परीक्षेत लिहून काढण्याची वाईट सवय आपल्याला जडली आहे. ही वचनं प्रत्यक्षात आणण्यासाठी असतात हे आपण विसरूनच जातो. मोबाइलवर किंवा संगणकावरच्या समाज-माध्यमात मिळालेली (बहुशः निरुपयोगी) माहिती इतरांना फॉरवर्ड करण्यातच समाधान पावणारे बहुसंख्येनं अाहेत.

हे करून पहा

या पुस्तकात प्रत्येक प्रकरणानंतर वाचकानं व्यवहारात आणण्यासाठी स्वाध्याय दिले आहेत. उदा. कृती-प्रवण होण्यासाठीचा स्वाध्याय असा आहे….

येत्या आठवड्यात रोज करायचंच असं एखादं काम ठरवा. ते अगदी साधं असू दे. उदा. सकाळी उठल्याबरोबर मी एक सुविचार माझ्या वहीत लिहून ठेवीन. येता आठवडाभर रोज मी माझ्या आईला/वडिलांना/मित्राला/मैत्रिणीला/ पत्नीला/पतीला उपयोगी पडेल असं एक काम करीन. आणि ते करा. काम सोपं की अवघड हे महत्वाचं नाही. त्यामुळे आपल्यात पुढाकार, जबाबदारीची जाणीव निर्माण होणं महत्वाचं.

या सवयी अंगी बाणवताना कष्ट पडणार आहेतच. कारण स्वतःचा आळस इतर कोणी झाडून देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

व्यक्तीचे संपूर्ण स्वातंत्र्य (independence) आणि परावलंबन (dependence) यांच्यातला सम्यक मार्ग म्हणजे परस्परावलंबन(interdependence). त्याचा प्रसार करणारे स्टीफन कॉवी यांचे मूळ पुस्तक वाचण्याची इच्छा या लेखामुळे निर्माण होईल अशी आशा आहे. त्या वाचनानं आपला चेहराच हसरा व्हावा म्हणजे विदुषकाचा हसरा मुखवटा वापरण्याची वेळच येणार नाही.
मागील पान


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-19 Sun 12:29