UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


सात सवयी - भाग १

स्टीफन कॉवी (Stephen Covey) हे व्यवस्थापन तज्ञ जगप्रसिद्ध झाले ते त्यांच्या प्रभावी व्यक्तींच्या सात सवयी या (Seven Habits of Highly Effective People) पुस्तकामुळे.

स्वतःमधे सुधारणा करण्याचा मार्ग दाखवणारी अनेक पुस्तकं तोवर प्रकाशित झाली होती. पण त्या आणि कॉवींच्या पुस्तकात एक महत्वाचा फरक आहे. बरीचशी पुस्तके व्यक्तीमधे वरवरच्या सुधारणा दाखवणाऱ्या युक्त्या शिकवतात. पण कॉवी यांचं पुस्तक मूलभूत बदल करायला सांगतं. वेगळ्या शब्दांत असं म्हणता येईल की हे पुस्तक मुखवटा बदलण्यापेक्षा चेहराच बदलायला सांगतं.

चेहरा बदलणाऱ्या या सात सवयींविषयी मी या लेखात थोडक्यात सांगणार आहे.

पहिली सवयः कृति प्रवणता

पहिली सवय कृति प्रवण Proactive होण्याची. परिस्थितीत बदल करायचा असेल तर जे काही घडतं आहे त्याला प्रतिसाद देण्याची. हा प्रतिसाद देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आणि तो दिल्यावर जे काही घडेल त्याची जबाबदारी घेण्याची तयारी हवी. हे कृति-प्रवण व्यक्तीचं वर्णन. आळस सोडा आणि कामाला लागा हे त्या व्यक्तीचं ब्रीद.

अवती भवती घडणाऱ्या कोणत्याही घटनेला प्रतिसाद देता येतो असं कॉवी म्हणतात. सूर्य किंवा चंद्रग्रहणाला आपण काय प्रतिसाद देणार ? सोपं आहे. ते ग्रहण पहाण्याचा, त्याचा आपल्या परीनं अभ्यास करण्याचा प्रतिसाद देता येईल. एखादा अपघात आपल्या डोळ्यासमोर घडला तर प्रथमोपचार तर करता येईल !

असं म्हणतात की एकदा बाबा आमटे यांना एक दिवस रस्त्यात एक मळलेला महारोगी दिसला. त्यांच्यातली करुणा जागी झाली. आपल्या घरी नेऊन त्यांनी त्याला आंघोळ घातली आणि नंतर अशा अनेकांचं आयुष्य बदलून टाकलं. कृति-प्रवणतेचं यासारखं कोणतं समर्पक भारतीय उदाहरण देता येईल ?

कृति प्रवणता आपल्यातला आळस झाडून टाकते आणि आपल्याला धाडसी पण जबाबदार बनवते.

दुसरी सवयः अंतिम हेतूचं आकलन

शेवटा पासून सुरुवात करा. Begin with the end in mind. हे सगळं कशासाठी चालू आहे असा प्रश्न केवळ कुणी तत्वज्ञानी विचारतो असं नाही. आपणही तो विचारला पाहिजे. प्रत्येक (लहान सहानही) गोष्ट करताना आपल्याला त्याच्या अंतिम हेतूचं आकलन असायला हवं.

एक उदाहरण घेऊ या. मी हे सगळं का लिहितो आहे ? ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा त्यासाठी ज्यांना वेळ नाही त्यांना या पुस्तकाची ओळख व्हावी म्हणून. परिस्थिती बदलायला हवी म्हणून. आपण सर्वांनी प्रभावी व्हावं म्हणून.

हा हेतु एकदा का स्पष्ट झाला की हे लिहिण्याचा माझा उत्साह नुसता वाढत नाही तर हे लिहिण्याची गुणवत्ता सुधारण्याचा मी प्रयत्न करायला लागतो. मी निश्चित चांगलं काम करतो आहे हे आकलन झाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो आणि हे सारं करण्याची मानसिक ऊर्जा वाढते.
पुढील पान


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-19 Sun 11:37