शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
मला समजलेले बौद्ध तत्वज्ञान १
लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बुद्धाची पहिली ओळख झाली.
शालेय पुस्तकातला मजकूर मुलांना समजेल असा छापावा लागतो. त्याशिवाय मुलांपर्यंत कोणत्या प्रकारे तो पोहोचावा यात अनेकांचे हितसंबंध दडलेले असतात. पण हे भान त्यावेळी असण्याचे कारणच नव्हते.
तथागत बुद्धांची ओळख तशी अगदी अलीकडे झाली. मराठीत लिहिलेल्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून (मंगला आठलेकर), इंग्रजीतून (शॉपेनहॉवर) , इंग्रजीतून मराठीत (विल्यम मार्टिन) भाषांतरित झालेल्या पुस्तकातून, इंटरनेटवर असलेल्या बौद्ध वाङ्मयातून (त्रिपीटक- हिंदी), आचार्य रजनीशांच्या (हिंदी) बुद्ध प्रवचनांमधून, विनोबा भाव्यांच्या धम्मपदं (मराठी) यातून हे कण वेचता आले.
सलग सात वर्षं सतत अनुभव घेतल्यावर आणि विचार केल्यावर बुद्धांनी जे सांगितले त्याबद्दल एका छोट्या लेखात काहीबाही लिहिणे हा उद्धटपणाचा एक नमुनाच मानावा लागेल हे खरेच. पण इतक्या प्रभावी तत्वांचं वाचन करून ते आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्याला काय समजलं आणि काय जाणवलं ते प्रामाणिकपणे उतरवण्याचा हा प्रयत्न आहे.
सिद्धार्थ गौतमाचा राज्यत्याग मला पूर्वी पटला नव्हता. कर्तव्य सोडून व्यक्तिगत उन्नतीसाठी काढलेली ती पळवाट होती असा माझा ग्रह झाला होता. दैन्य, वार्धक्य आणि मृत्यू यांच्या दर्शनाने सिद्धार्थाच्या मनावर खोल परिणाम घडवून आणला होता असे म्हटले जाते. हे एक कारण या राजपुत्राच्या राज्यत्यागामागे असू शकेल. पण त्यावेळच्या धर्माचा राजकारणावर आणि अर्थकारणावर होणारा परिणाम हेही एक कारण त्यामागे असू शकेल. पाण्याच्या प्रश्नावरून दोन शेजारी राज्ये एकमेकांशी युद्ध करू लागतात त्यांच्यासमोर स्पष्ट पणे युद्धाचा निषेध करणारा आणि युद्धात सामील न होण्याची घोषणा करणारा क्षत्रिय राजपुत्र सिद्धार्थ स्वतःच्या नव्या युगाची नांदीच घडवतो. या नंतर शांतता आणि त्यासाठी मानवी आयुष्यातील दुःखाचे निर्मूलन या तत्वांसाठी त्याने राज्य त्याग केला आहे.
ज्ञान झाल्यावर तथागत बुद्ध पुन्हा एकदा जगाच्या बाजारात उतरले. कारण आपल्याला समजलेल्या ज्ञानाचं वितरण करून अधिकाधिक लोकांच्या आयुष्यातून दुःख नष्ट करावे हा हेतू त्यामागे होता. असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या बोलण्यात येतो. तथागत बुद्धांनी सांगितलेली मुख्य तत्वे सांगून त्यांचे विवेचन करणे हा या लेखमालेमागचा हेतु आहे.
तथागत बुद्धांनी सांगितलेली चार आर्य (श्रेष्ठ) सत्ये
मानवी जीवनात दुःख आणि केवळ दुःखच आहे.
वर वर पहाता ही एक निराशावादी विचारसरणीची सुरुवात वाटते. पण सतत वाढणाऱ्या वयाचा विचार करता, यौवनावस्था ही एकच अशी अवस्था मानता येईल जिथे दुःख नाही असं वाटू शकेल. पण तिथे ही दुःखं आहेतच हे जरा जास्त विचार केल्यावर मान्य करावं लागेल. फार तर असं म्हणता येईल की प्रत्येक अवस्थेत दुःखाचा प्रकार बदलतो इतकंच.
या दुःखाचं कारण तृष्णा हे आहे.
जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत वाटणारं असमाधान आपल्या सर्वांच्या अनुभवाला येतं. त्या असमाधानाचं कारण बुद्ध सांगतात. ते म्हणजे तृष्णा- तहान. कोणतीही गोष्ट हवी हवीशी वाटणं. तृष्णा आणि पर्यायाने दुःख नष्ट करता येते.
दुःख आणि तृष्णा नाहीशी करता येते.
हे श्रेष्ठ सत्य सांगताना बुद्ध आपल्याला खात्री देतात की दुःख आणि तृष्णा नाहीशी करता येते.
दुःख नाशासाठी आठपदरी मार्गाचा अवलंब करावा लागेल.
- तथागत बुद्धांचा आठपदरी मार्ग
- सम्यक् दृष्टी
- सम्यक् संकल्प
- सम्यक् वाणी
- सम्यक् कर्मान्त
- सम्यक आजीविका
- सम्यक् व्यायाम
- सम्यक् स्मृति
- सम्यक् समाधि
या सर्वांबद्दलचे विवेचन या लेखमालेतील पुढील लेखांत—-