शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
मला समजलेले बौद्ध तत्वज्ञान २
सम्यक् म्हणजे काय ?
मागच्या लेखात मी या मार्गाच्या आठ पदरांचा शेवटी फक्त उल्लेख केला . आता प्रत्येक मार्गाचा मला समजलेला अर्थ विषद करणार आहे. प्रत्येक मुद्द्याच्या आधी सम्यक् असा प्रत्यय लागलेला आपल्याला दिसतो. सम्यक् या शब्दाचा अर्थ आहे यथायोग्य, समतोल साधणारा. बुद्धांच्या तत्वज्ञानाचा हा विशेष आहे असं मी म्हणेन. प्रत्येकाने या मार्गावरून चालताना हा तोल संभाळणे आवश्यक आहे. बुद्ध त्यासाठी तुमच्या माझ्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवतात.
बुद्धांच्या या सम्यक् रहाण्याच्या आग्रहावर शंका विचारताना एका शिष्यानं विचारलं की हे सम्यक् सम्यक् असं किती सम्यक असू शकेल ? त्यावर बुद्धांचं उत्तर असं आहे की ते तुम्हालाच ठरवायचे आहे. मार्ग त्यांनी दाखवला असला तरी त्या मार्गावरून जायचे आहे ते आपल्यालाच. आपल्या प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. म्हणून माझ्यासाठीचं सम्यक् इतरांसाठी तसंच असेल असं नाही.
जुन्या तत्वज्ञानाचा नव्याने विचार करताना एक अडचण निर्माण होते. ती शब्दांची. शब्दांचे अर्थ हजारो वर्षांनंतर तसेच राहतात असं नाही. त्यामुळे तत्वांचं आधी आकलन झालं की त्या नुसार हे अर्थ आजच्या भाषेत रूपांतरित करावे लागतात.
- सम्यक् दृष्टीः यातला दृष्टी हा शब्द फक्त डोळ्यांशी संबंधित आहे असं नाही. जगात वावरताना बाहेरून येणारे सगळे संदेश आपल्या पर्यंत पोचतात आणि हे शरीर इंद्रियांचा वापर करून त्याचा स्वीकार करतं. त्यांचा अर्थ लावताना समतोल राखायचा असं बुद्ध सुचवतात.
- सम्यक् संकल्पः संकल्प हा शब्द आजच्या काळात जसा आपण वापरतो तसा वापरला तरी चालेल. संकल्पात आज जे अस्तित्वात नाही त्याचा विचार आहे. कल्पना आहे. वर्तमानकाळापासून फार भटकू नका. असं बुद्ध सुचवतात. (महर्षी पातंजलींनी सुद्धा मनाच्या ज्या ५ वृत्ती सांगितल्या आहेत त्या पैकी एक आहे विकल्प – कल्पना करणे. पातंजल योगातील मूळ सूत्रं अशी आहेत –
वृत्तयः पंचतय्यः || क्लिष्टाक्लिष्टाः || प्रमाण- विपर्यय- विकल्प– निद्रा- स्मृतयः || - सम्यक् वाणीः वाणी हे स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन आहे. जगाकडून विविध संदेश घेतल्यावर त्याचा अर्थ लावून त्यावर प्रतिक्रिया द्यायची तर ती समतोल हवीच. ती ही सम्यक् वाणी ! आता आपण बोलण्याखेरीज लिहूसुद्धा शकतो. देहबोलीचा वापरही आपण करतो. या सर्व पद्धतींचा वापर करताना समतोल हवाच.
- सम्यक् कर्मान्तः समतोल दृष्टी मधून आपण बाह्य जगातून संदेश घेतले. त्यावर समतोल विचार केला. आपले विचार समतोल पणे व्यक्त केले. आता त्यानुसार कृती करायची आहे. हे कर्म. त्याचा अंत – परिणाम हा समतोल व्हायला हवा. हा समतोल साधणारी कृती करा असं बुद्ध सुचवतात. (भगवान महावीरांनी “अनेकांतवाद” असा सिद्धांत मांडला होता. एकाच कृत्याचे अनेक परिणाम होऊ शकतात असं हा सिद्धांत सांगतो.)
- सम्यक् आजीविकाः आजीविका म्हणजे जीवनशैली. चंगळवाद आणि संन्यास यांच्या मधला मार्ग जीवनात अनुसरावा हा बुद्धांचा संदेश आहे. वस्तूंचा पुनर्वापर करणं हे बुद्धांनी आपल्या शिष्यांना सुमारे ३ हजार वर्षांपूर्वी सुचवलं आहे. अत्यंत साधेपणानं जगणं हा या मार्गावरचा महत्वाचा पदर आहे. गरजा भागवणं पण इच्छेला महत्व न देणं हा तो मार्ग. पण साधेपणानं जगत असताना, स्वतःच्या शरीराला आणि मनाला क्लेष होतील अशा गोष्टी टाळायला बुद्ध सांगतात. प्रेतवस्त्र पांघरून आणि कित्येक दिवस उपास करून स्मशानात बुद्धांनी दिवस कंठून पाहिले होते. हा एक प्रयोग फसला हे त्यांच्या लक्षात आलं. असल्या अतिरेकी क्रियांनी काहीच साध्य होत नाही असा स्पष्ट उपदेश बुद्ध करतात.
- सम्यक् व्यायामः वि+ आयाम म्हणजे व्यायाम. वि हा प्रत्यय विशेष या अर्थासाठी वापरला जातो. आयाम म्हणजे पुन्हा पुन्हा घडणारी क्रिया. समतोल संकल्प सिद्धीस जावेत यासाठी प्रयत्न तर हवेतच. हाच व्यायाम आणि तोही समतोल . इथे बुद्धांना साधनशुचिता अपेक्षित आहे. दुःखमुक्तीसाठीचे प्रयत्न साधकाला करावेच लागतील हे बुद्धांचे सांगणे आहे.
- सम्यक् स्मृतिः माणसांच्या कृती आठवणी निर्माण करतात आणि मन त्या साठवत रहाते. ही साठवण समतोल असावी. क्रोध, द्वेष यासारख्या भावनांना थारा देऊ नये असा उपदेश बुद्ध करतातच. उदा.
नहि वेरेन वेरानि | सम्मन्ति ध कुदाचनं || अवेरेन च सम्मन्ति | एस्स धम्मो सनन्तनो ||
(वैराने वैर कधीच शमत नाही. ते केवळ अवैरानेच शमते. हाच खरा धर्म आहे. )
वर्तमानाशी फारकत घ्यायची नाही, भविष्याचा फार विचार करायचा नाही (सम्यक् संकल्प) आणि भूतकाळाशी फार संबंध ठेवायचा नाही. ही आहे सम्यक् स्मृति.
स्मृति हा शब्द बौद्ध साहित्यात आणखी एका संदर्भात येतो. विविध ध्यान पद्धतींचा वापर करून स्मृतिवर नियंत्रण मिळवणे शक्य आणि गरजेचे आहे. उदा. विपस्सना, कायागत स्मृति, आनापान स्मृति इत्यादि. हे करूनच समाधीचा लाभ मिळवायचा आहे. - सम्यक् समाधिः असं म्हटलं जातं की बुद्धांनी ध्यान करण्याचे १११ प्रकार शोधून काढले. ध्यान करताना शरीराची आणि मनाची शांत – समाधानी स्थिती म्हणजे समाधि. समाधीचा अनुभव घेऊन पुन्हा ८ पदरी मार्गावर चालत राहायचंच आहे. तेव्हा शांत समाधि स्थितीच्या फार आहारी जाऊ नका -समतोल राखा- असं बुद्ध सांगतात. समाधीची ही स्थिती मन आणि शरीर यांच्यात ऊर्जा निर्माण करील आणि त्याचा उपयोग मार्गावर चालत रहाण्यासाठी करायचा आहे.
बुद्धांनी सांगितलेल्या तीन महान तत्वांबद्धल – प्रज्ञा, शील आणि करुणा या बद्दल पुढील लेखात….