UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


ये मने, बैस अशी…

(दुपारी ४ ची वेळ. ६६ वर्षांची आजी गॅलरीत वाचत बसलेली. १५-१६ वर्षांची मनी ही तिची नात गॅलरीत प्रवेश करते.)

आजीः – ये मने, बैस अशी…पण तुझी ती चपटी डबी जरा दूर ठेव पाहू !

मनीः – (फुरंगटून) आजी हे ग काय, ती काय डबी आहे का? तो मोबाइल आहे माझा.

आजीः – तेच ते. पण मने, तुझ्या या डबी मुळे मला तुकारामबुवांची आठवण होते. का ते विचार.

मनीः – (आश्चर्यानं) का?

आजीः –अग,

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ||

चालविशी हाती धरूनीया ||

हा अभंग तुकारामबुवांनी या तुझ्या डबीलाच उद्देशून तर केला नसेल ना, असं मला काही वेळा वाटतं.

मनीः – पण तू हे शेजारच्या मावशींपर्यंत जाऊ देऊ नकोस हां. नाही तर त्या, आपली संस्कृती जगात कशी सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याच्या नादात, मोबाइलचा शोध तुकाराम महाराजांनीच लावला असं सांगत फिरतील. बरं मला सांग, तू मला का बोलावलंस?

आजीः – उगाचच. कारण मने, तू हल्ली त्या डबीतच इतकी मशगूल असतेस की आजूबाजूच्या जिवंत माणसांकडे लक्षच नसतं तुझं. पूर्वी मुली आरशात बघण्यात वेळ घालवायच्या आता तुम्ही या डबीच्या पडद्याकडे पहाण्यात घालवता. पण मला सांग तुझ्या या मोबाइलला काही आजार झालाय् का ?

मनीः – नाही, का बरं? तुला असं का वाटलं ?

आजीः – मला वाटलं तुझ्या या डबीत व्हायरस का काय म्हणतात तो शिरलाय की काय. तू सारखी डबीचा पडदा खाजवत असतेस म्हणून विचारलं बरं. माणसाला कातडीचा काही रोग झाला, की नाही का खाज सुटत?

मनीः – आजी तू चेष्टा कर माझी, पण माझ्या या मोबाइल मुळे माझी खूपच सोय होते बरका. आम्ही सगळे, म्हणजे आमचे मित्र मैत्रिणी आणि शिक्षकसुद्धा, नेहमी एकमेकांच्या कॉंटॅक्टमधे असतो.

आजीः – असेल, पण तुम्ही जेव्हा एकत्र जमता, त्यावेळी तुम्ही कसे बोलता? मी इथे गॅलरीत पुस्तक वाचत बसते, तेव्हा कधी कधी समोरच्या चहाच्या हॉटेलकडे लक्ष जातं माझं. एकदा चार मुली तिथे एकत्र जमल्या, त्यांनी चहा मागवला, चहा येईपर्यंत त्या आपापल्या मोबाइलशी खेळत राहिल्या. मग चहा आला, चहा पिताना त्या मोबाइलशी खेळत होत्या. चहा संपल्यावर त्या थोडावेळ मोबाइलशी खेळत होत्या. नंतर त्या उठून मोबाइलशी खेळत खेळत निघून गेल्या. मला कळेना की त्या तिथे का आल्या होत्या. मोबाइल हे संवाद साधण्याचं माध्यम आहे का संवाद बंद पाडण्याचं ?

मनीः – अगं आजी, आम्ही जे काय करतो ते पाच पाच मिनिटांनी कळवतो एकमेकांना मेसेज करून. तेही चक्क फ्री. त्यामुळे बोलण्यासारखं शिल्लक काही रहातच नाही. म्हणून होतं असं. पण आजी तू हेरगिरी करू नकोस हं अामच्यासारख्यांवर.

आजीः – अगं मी म्हातारी कसची हेरगिरी करणार तुमच्यावर ! माझे कान काही इतके लांब नाहीत काही. पण ते फोन आणि मेसेज कंपनीचे दादा आहेत ना, त्यांचे कान फार लांब आहेत बघ. तुम्ही सगळे जे जे काही बोलता, ते ते रेकॉर्ड करून घेतात. तुम्ही कुणाला, कुठून, काय आणि कधी फोन केलात हे त्यांना माहिती असतं. तरुणाईच्या आवेशात तुम्ही काय बोलता, त्याचे अर्थ काढायला ते मोकळेच आहेत. तुमची माहिती कोणाकोणाला विकली जाते, हे तुम्हाला कधीच कळणार नाही.

मनीः – आमचा चित्रगुप्त पूर्वीपासूनच या तऱ्हेची माहिती स्वर्गात साठवून ठेवतो– असं — त्या शेजारच्या मावशी सांगतील.

आजीः – चहाटळ पणा पुरे झाला मने !

मनीः - ते जाऊ दे आजी. पण मग आपण टेक्नॉलजी वापरायचीच नाही का? साधी गोष्ट घे, तुमचा तो जुना टेलिफोन , त्याची रिंग कशी कर्कश्श वाजते! पण आमच्या मोबाइलची ट्यून किती गोड असते.

आजीः – मने, त्याचं कारण फक्त टेक्नॉलजीत नाहीये काही. ती ट्यून एखाद्या रागावर अाधारित असेल. त्या ट्यूनचा गोडवा त्या रागामुळे आहे. कारण मोबाइलचे स्पीकर मुळी उत्तम आवाज यावा यासाठी बनवलेलेच नसतात. आणि हे बघ, टेक्नॉलजी वापरायचीच, पण नव्या निर्मितीसाठी. एक मजा सांगते मी तुला. एकदा एका इंग्रजी मासिकात ही व्यंग्यचित्रं पाहिली होती मी. एका चित्रात मुलगा आणि आई-बाप संगणक वापरून एकमेकांशी व्हिडिओ बातचित करताना दाखवले होते. दुसऱ्या चित्रात आईचं वाक्य होतं… ”बस्स, आता बोलणं पुरे झालं. बाळा आता तू खाली स्वयंपाकघरात जेवायला ये बरं ! ” आणखी एका चित्रात आई आपल्या छोट्या मुलाला बजावते आहेः ” नाही नाही. तुला डाउनलोड नाही करून घेतला, तुझा जन्म माझ्या पोटीच झाला बरं बाळ ! ”

मनीः – (संकोचून) आजी मग आम्ही संवाद साधायचा तरी कसा ?

आजीः – सांगण्यासारखी निर्मिती केली तरच संवाद साधायचा हे महत्वाचं. ती निर्मिती म्हणजे स्वतः लिहिलेली गोष्ट, कविता असेल, म्हटलेलं गाणं असेल, काढलेलं चित्र असेल, सिद्ध केलेलं गणिती प्रमेय असेल, स्वतः बनवलेला पदार्थ असेल किंवा स्वतः वाढवलेलं रोपटं असेल…. हे आत्ताचं आपलं बोलणं ही आपली एक निर्मितीच आहे. (थोडा विचार करते)
पण सर्वोत्तम संवादासाठी, शब्दांचीसुद्धा गरज नसते मने. मग मोबाइल कोणत्या झाडाचा पाला ! मी कॉलेजात तुझ्या एवढ्या मुलामुलींना पूर्वी ज्ञानेश्वर शिकवलाय्!
(डोळे मिटते. भूतकाळात जाते. तिच्या डोळ्यासमोर भरलेला कॉलेजचा वर्ग आहे. )

ये मने, बैस अशी जवळच. तुझी ती चपटी डबी बंद करून, दूर ठेव पाहू …. आणि मला तुझ्या खांद्यावर हात ठेवू दे.

(मनी जवळ येऊन बसते. आजी तिच्या खांद्यावर हात ठेवून सावकाश ओवी गुणगुणते )

अर्थु बोलाची वाट न पाहे || तेथ अभिप्रायचि अभिप्रायाते विये ||

भावांचा फुल्लौरा होतु जाये || मतिवरी ||

जेथ संवादाचा सुवाओ आढळे || तेथ ह्रदयाकाश सारस्वते वोळे ||

श्रोता दुचिता तरी वितुळे || मांडिला रसु ||

(खऱ्या सुसंवादात) अर्थ हा (वक्त्याच्या) शब्दांची वाट पहात नाही. कारण तिथे (श्रोत्याच्या मनातला) अभिप्रायच नव्या अभिप्रायाला जन्म देतो.

भाव-भावनांचा फुलोरा (दोघांच्याही) बुद्धीवर पखरण करीत जातो.

जिथे असा सुसंवाद आढळतो, तिथे (दोघांचेही) ह्रदय सारस्वताने भरून जाते .

श्रोत्याचे मन थाऱ्यावर नसेल (तो दुश्चित्त असेल) तर (मात्र) सारा रस विस्कटून जातो.

(दोघीही शांत, स्तब्ध. दोघींच्याही डोळ्यात पाणी)


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-16 Thu 12:09