UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


स्वयंपाकघरातील इंधन बचत

तुमच्या स्वयंपाकासाठी गॅस तुम्हीच बनवा !
ही घोषणा आता आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. जैविक कचरा खाऊन आणि अक्षरशः पचवून त्याचे रूपांतर मिथेन इंधनात करणारे संयंत्र आम्ही नुकतेच आमच्या कडे बसवले. आज साधारण अडीच महिन्यांनंतर, आम्ही आमच्या स्वयंपाक इंधनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झालो आहोत.

१ हजार लिटर ची पाचक टाकी (Digester), मिथेन वायू साठवणारा १००० लिटरचा दणकट रबराचा फुगा आणि प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याची शेगडी हे या यंत्रणेचे भाग आहेत. वायूचा फुगा पूर्ण भरलेला असताना, शेगडीचा एक बर्नर सतत तीन तास स्वयंपाकासाठी उष्णता देऊ शकतो. पाचक टाकीत रोज सुमारे ४ ते ६ किलो ओला, जैविक कचरा टाकावा लागतो.

या यंत्रणेची अधिक माहिती व कार्य पुढे देत आहेः

पाचक टाकी

digester.png
१००० लिटरची, जमिनीवर ठेवण्याची, दणकट प्लास्टिकची टाकी म्हणजे पाचक टाकी. या टाकीला धातूच्या पिंजऱ्याचे संरक्षक कवच आहे. स्थापना करतेवेळी या टाकीत ८५० लिटरचे जीवाणु विरजण ओतले जाते. या जीवाणुंमुळेच आपण टाकलेला जैविक कचरा पचतो आणि त्याचे रूपांतर मिथेन वायु आणि उत्सर्जित स्लरीत होते.

वायू साठवणारा रबरी फुगा

baloon.png
अत्यंत दणकट रबराचा १००० लिटर आकारमान असणारा रबरी फुगा, तयार होणारा मिथेन साठवण्याचे काम करतो. पाचक टाकीत वायू तयार होण्याची क्रिया सतत चालूच असते. ज्यावेळी आपण तो स्वयंपाकासाठी वापरत नाही, त्यावेळी तो या फुग्यात साठवला जातो. जसजसा आम्ही वायू वापरतो, तसे फुग्याचे आकारमान कमी होते. रोज तयार केलेला वायू आम्ही रोज वापरतो. आमच्या वापरा नुसार फुग्याचा आकार कमी-जास्त झालेला आम्हाला जाणवतो.

या फुग्यावर सुमारे ३५ किलो वजन ठेवले जाते. त्यामुळे आपल्याला मिळणारा वायू सुमारे ३५ किलो प्रति चौरस मिटर इतक्या दाबाने मिळतो. हा दाब नेहमीच्या सिलिंडर मधे असणाऱ्या गॅसच्या (LPG) दाबापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे वायू वापरणे सुरक्षित आहे. पण त्यामुळे कमी दाबाच्या गॅससाठीची वेगळी शेगडी स्वयंपाकासाठी वापरावी लागते.

शेगडी

burner.png
पूर्वी गोबर गॅस साठी वापरली जाणारी शेगडी वायूसाठी वापरली जाते. या शेगडीला नेहमी प्रमाणे दोन बर्नर आहेत आणि ज्योतीची तीव्रता हवी तशी कमी जास्त करता येते.

काही तपशील

  • हे संयंत्र, पुण्या जवळील चिंचवड एम्.आय्.डी.सी.तील "विश्वदीप प्रेसपार्टस्" यांनी तयार केले आहे. त्यांचा इ-पत्ता आहेः vaayu.mitra@gmail.com
  • फ्लॅट मधे राहील असे २०० लिटर क्षमतेचे संयंत्र देखील उपलब्ध आहे. ते मी पाहिले देखील आहे. रोज २ किलो जैविक कचरा या यंत्राला खाऊ घालावा लागतो.
  • जैविक कचऱ्यात यांचा समावेश होतोः
    • झाडाची हिरवी पाने
    • हिरव्या फांद्या
    • (लाकडासारखे) टणक नसलेले वनस्पतीचे भाग,
    • भाजीच्या काड्या, फळांची देठे
    • शिळे खरकटे,उर्वरित अन्न
    • बागेतील तण, काटेरी हिरवे गवत
  • वरील जैविक कचरा चुरमडून, अगदी लहान तुकडे, भुगा करून यंत्रात टाकण्याची गरज नाही.
  • वेगळे पाणी यंत्रणेत टाकण्याची गरज नाही.

सुरक्षितता

  • या यंत्रणेत विविध ठिकाणी व्हॉल्व दिल्यामुळे गरज भासल्यास वायूचा प्रवाह बंद करता येतो.
  • मिथेन वायू हवेपेक्षा हलका आहे. त्यामुळे वायु-गळती झाल्यास तो लगेचच वातावरणात निघून जाईल.
  • शेगडी पाशी वायू गळती झाल्यास त्याचा वास स्वयंपाकघरात पसरतो व व्हॉल्व वापरून प्रवाह बंद करता येतो.

अनुभव आणि निरीक्षणे

  • आज आपण बाजारातून कोणतीही गोष्ट (फ्रिज, टीव्ही इ.) आणली की ती लगेच पूर्णांशाने वापरता येते."वायू"ची स्थापना झाल्यावर तो पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी सुमारे ५ आठवडे लागतात. या कालावधीत दर आठवड्याला त्याचे "अन्न" एकेका किलोने वाढवत जावे लागते. पाचव्या आठवड्यात जीवाणूंची संख्या पूर्ण वाढून "वायू" पूर्णपणे कार्यान्वित होतो. जैव तंत्रज्ञान माणसाला थोडी सहनशीलता वाढवायला सांगते. पण पुनर्वापराच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान अजोडच म्हणावे लागेल.
  • दिवसाच्या २४ तासातले किमान तापमान २० डिग्री सेल्सियसच्या पेक्षा कमी असेल तर वायू तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
  • तापमान वाढल्यावर वायू तयार होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते.
  • फुगा जितका जास्त भरलेला असेल तितकी शेगडीची आच वाढते.
  • रोज ४ ते ६ किलो जैविक कचरा टाकल्यास १८ तासात (१००० लिटरचा) फुगा भरतो.
  • मांसाहारी अन्न कचऱ्यात असल्यास काय परिणाम होतो हे आम्ही पडताळून पाहू शकलेलो नाही. पण पाचक टाकीतील जीवाणू शाकाहार मांसाहार असा भेद करत नसावेत.
  • मिथेन वायू जसा या यंत्रणेचे प्रमुख उत्पादन आहे तसेच उत्सर्जित स्लरी हे उपउत्पादन. या स्लरीला शेणाच्या पाण्यासारखा वास येतो. पण स्लरी जमा करण्यासाठी दुर्गंधीरहित यंत्रणा कंपनी उपलब्ध करून देते.
  • आम्ही स्लरीचाही भरपूर प्रमाणात बागेत खत म्हणून वापर करतो. साधारणपणे दर आठवड्याला २० किलो स्लरी उपलब्ध होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या आणखी एका जीवाणु कल्चरमधे ही स्लरी मिसळून आम्ही बागेतील कोरड्या पालापाचोळ्याचे कंपोस्ट खत बनवतो.
  • ही स्लरी, स्वतंत्रपणे खत म्हणून बागेसाठी वापरता येते.
  • २० किलो स्लरीमधे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो बेसनपीठ मिसळ्ल्यास ते द्रावण ४ दिवसात फसफसते (जीवामृत म्हणून हे मिश्रण प्रसिद्ध आहे.). हे मिश्रण भाजी व वनस्पतींच्या वाढीसाठी व उत्तम उत्पादन देण्यासाठी उपयुक्त आहे असा आमचा अनुभव आहे.
  • काही वेळा आमच्या कडील जैविक कचरा कमी पडतो. त्यावेळी शेजारील जैविक कचरा आम्ही मागून घेतो व वापरतो. कचरा जास्त झाल्यास वायूला देऊन उरलेल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतात रूपांतर करता येते.
  • "वायू" मुळे आमची स्वयंपाक इंधनाची आणि बागेतील जैविक खताची समस्या पूर्णपणे निकालात निघाली आहे.

संपर्कः freebirdEmail.png

Author: सम्यक

Created: 2018-02-03 Sat 12:38