UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


उद्या काय कसं खायचं.. ?

उद्या काय,कसं खायचं अशी चिंता आज असता कामा नये…..

उद्या कसं, काय खायचं अशी चिंता आज असता कामा नये…..

उद्याचं अन्न आज काम करून मी मिळवेन असं म्हटलं तर उद्याच्या कामाची शाश्वती असायला हवी…..

उद्याच्या कामाची शाश्वती असेल तर कामासाठी जी साधन-संपत्ती मी वापरतो तिची शाश्वती असली पाहिजे…..

साधन-संपत्ती शाश्वत असेल तर कामासाठी लागणारी ऊर्जा मला रोज उपलब्ध व्हायला हवी…..

ही ऊर्जा अंतिमतः सूर्य देतो. मग ती लाकडापासून मिळणारी उष्णता असो किंवा जमिनीखाली असणाऱ्या तेल साठ्यापासून मिळणारी इंधन ऊर्जा असो. उष्णतेवरच विद्युत जनित्रे चालतात. अणुऊर्जासुद्धा आपण पूर्वी सूर्याचे भाग असल्यामुळेच आपल्याला मिळते. ….

शतकानुशतकं सूर्य रोज उगवत आला आहे हे आपलं सुदैवच म्हणायला हवं !

आपलं आयुष्य जास्तित जास्त निसर्गानुरूप व्हावं अशी माझी इच्छा असते. हे काम कायम अपूर्ण रहाणार याचं भान मला आहे. पण पुढे उल्लेख केलेल्या गोष्टी प्रेरणा देत राहतात. आपलं साऱ्यांचं उद्दिष्ट मानवी जीवन शाश्वत करणं हे असायला हवं. सूर्य आपला पाठिराखा आहेच.

 • निसर्गाचं निरीक्षण करा आणि प्रतिसाद द्या. त्यासाठी वेळ द्या. त्यामुळे निसर्गाबरोबर राहून (त्याच्यावर विजय मिळवून नव्हे) आपण आपल्या समस्यांचं निराकरण करू शकू. या समस्यांची वैशिष्ट्यं अशी आहेतः
  • आपल्या समस्यांचं मूळ निसर्गावर विजय मिळवण्याच्या वल्गनेत आहे.
  • आयुष्यात अति-गतिमानता आल्यामुळे अतिरेकी मानसिक ताण निर्माण झाला आहे. स्वतःची आणि पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेची काळजी वाटते.
  • ऊर्जा आणि वस्तूंचा अतिरेकी उपभोग घेण्याच्या प्रवृत्तीमुळे प्रचंड प्रदूषण होते. त्याचा परिणाम म्हणून शारीरिक अनारोग्याला सामोरे जावे लागते.
 • जिथे जिथे शक्य असेल तिथे नैसर्गिक ऊर्जा मिळवा आणि तिचा साठा करा. ज्यावेळी ही ऊर्जा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते त्यावेळी ती साठवून ठेवायची. मग गरजे प्रमाणे ती आपल्याला वापरता येईल.
  • याचं उदाहरण म्हणजे दिवसा सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करणारी सोलर पॅनेल्स वापरायची आणि बॅटरीत ही ऊर्जा साठवून ठेवायची. रात्री वापरायची. आम्ही आमच्या घरी असं मोठ्या प्रमाणात करतो.
  • सूर्य ऊर्जा वापरण्याचं दुसरं साधन म्हणजे सोलर बंब. उन्हात असणारी उष्णता ऊर्जा आपल्याला पाण्यात साठवता येते आणि नंतर वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येते. आम्ही अनेक गोष्टींसाठी सोलर बंबातल्या गरम पाण्याचा वापर करतो. उदा. भांडी धुण्यासाठी, अंघोळीसाठी.
  • वाहत्या पाण्यातली ऊर्जा, वाहत्या वाऱ्यातली ऊर्जा आपल्याला साठवता येते. त्यासाठी नव्या यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे.
 • निसर्गाबरोबर रहा पण सतत काहीतरी उत्पादन करत रहा. तुमच्या श्रमांचं आणि वेळेचं चीज होऊ द्या. आपलं उद्दिष्ट मानवी जीवन शाश्वत करणं हे आहे.
  • प्रत्येकाला आपल्या घरात किमान एक भाजी लावणे निश्चितच शक्य आहे. त्यामुळे निसर्गाबरोबर रहाता येईल आणि उत्पादनही होईल. यासाठी खेड्यातलं मोठं घरच हवं असं काही नाही. मी या दृष्टीने केलेले प्रयत्न इथे वाचता येतील.
  • इंधनवाहन न वापरता सायकलचा वापर प्रवास आणि वाहतूक यासाठी करणं हे एक प्रकारचं उत्पादनच आहे. त्यात धुरापासून मुक्तीही आहे.
 • स्वयंशिस्त पाळा आणि निसर्गाकडून आलेली प्रतिक्रिया स्वीकारा. त्या प्रतिक्रियेला अनुसरून स्वतःच्या नियमात बदल करा. निसर्गव्यवस्थेचं शाश्वत रूप आपल्यालाच टिकवायचं आहे. त्यामुळे आपलं आयुष्यही अधिक समाधानी होईल.
  • स्वच्छतेच्या धुंदीत कचरा गाडून टाकण्याने काहीच साध्य होत नाही. जमीनीखालील पाण्याचे साठे त्यामुळे प्रदूषित होत रहातात. निसर्गाने दिलेली ही प्रतिक्रिया स्वीकारून कचरा निर्माणच होऊ द्यायचा नाही हे सर्वोत्तम. ते शक्य नसेल तर सूर्याच्या उन्हात प्लास्टिकच्या वस्तू मोकळ्या टाकल्या तर त्या विघटित होतात. फार मोठ्या प्रमाणात असा कचरा असेल तर तो अतिनील किरणांच्या माऱ्याने विघटित करता येतो.
  • घरात निर्माण होणारा जैविक कचरा कुजवून त्याचे गंधहीन खतात रूपांतर करता येते. अशा रीतीने, निसर्गाने दिलेल्या या प्रतिक्रियेचा उपयोग आपण आपल्या हितासाठी करू शकतो. हल्ली आमच्या जवळच्या भाजी विक्रेत्याकडची खराब भाजी तो आमच्याकडे आणून टाकतो त्याचं आम्ही कंपोस्ट खत करतो.
 • ऊर्जा आणि वस्तू यांच्या शाश्वत रूपाचा मान राखा. उद्याची शाश्वती देणाऱ्या वस्तू आणि ऊर्जा वापरा. तशा नसलेल्या वस्तू व ऊर्जेपासून दूर रहा. ते नेहमीच शक्य नाही. तेव्हा इतर उगमापासून उपलब्ध ऊर्जेची उधळपट्टी करू नका.
  • आपल्यासाठी ऊर्जेचा अंतिम स्रोत सूर्य हाच आहे. म्हणून सूर्य ऊर्जेचा अधिकाधिक वापर करा. सूर्य प्रकाशाचा सर्वात कार्यक्षम वापर करणारी यंत्रणा नैसर्गिकच आहे. ती म्हणजे वनस्पती. प्रकाशसंश्लेषण करून प्रकाशाचे रूपांतर ऊर्जेत करणे आणि ही ऊर्जा वापरून हवेतल्या कार्बन डाय ऑक्साइडचे रूपांतर पुन्हा घन कार्बन मधे करणे हे सृष्टीतल्या अतिशय जुन्या यंत्रणेनेच शक्य आहे. ते करताना मानवाला फळे, फुले आणि लाकूड (घरबांधणी आणि फर्निचरसाठी) देत रहाण्याचे काम ही यंत्रणा करतच असते.
  • अणुऊर्जा निर्धोक नाही म्हणून तिला नकार द्या.
  • शहरातील घरात “विनासायास” येणाऱ्या वीज व गॅसचा वापर तोलून मापून करा.
 • कचरा निर्माणच करू नका.
  • वस्तूंचा कमी वापर (Reduce), पुनर्वापर (Reuse), नव्या रूपात वापर (Recycle) ही त्रिसूत्री अवलंबली तर कचरा निर्माण होतच नाही असा माझा अनुभव आहे.
 • निसर्ग-घटकांच्या वर्तनात एक प्रकारची नियमबद्धता आढळेल. गतकालाचा अभ्यास करून हे साचे कोणते ते पहा. आपल्या आयुष्याच्या नियोजनात त्यांचा आधार घ्या.
  • खूप पावसाच्या प्रदेशात घरे उतरत्या छपरांची असतात. वर उल्लेख केलेल्या नियमबद्धतेचं हे एक उदाहरण आहे.
  • भारतात ड जीवनसत्वाची आहारात कमतरता हल्ली जाणवते आहे. त्यासाठी गोळ्या खाण्याऐवजी दुपारी ११ ते २ या काळात सूर्याचे ऊन्ह अंगावर घेणे शक्य आहे.
 • नव्या रचना करताना योग्य गोष्टी योग्य जागी अशा नेमा की त्या एकमेकांना पूरक असतील.
  • तुमच्या बागेला पाणी द्यायचं असेल तर मोटार पंप वापरू नका. त्याऐवजी टाकी अशा उंच जागी बांधा की त्यामुळे नळीने पाणी झाडांपर्यंत पोचेल. किंवा बाटलीला छिद्र पाडून प्रत्येक झाडासाठी “ठिबक सिंचन” करा.
  • आमच्या घरात आम्ही सर्वत्र सोलर दिवे वापरतो. हे एल्. इ. डी. दिवे अशा उंचीवर लावले आहेत की ते वाचण्यासाठी आणि वावरण्यासाठी उपयोगी ठरतात.
 • समस्यांची उत्तरं छोटी असावीत आणि अति-गतिमान नसावीत. कारण अशा लहान आणि कमी गतिशील गोष्टींचं व्यवस्थापन आणि देखभाल तुलनेनं सोपं असतं. ही उत्तरं शोधताना स्थानिक साधनांचाच विचार करा म्हणजे परिणाम चिरंजीवी असतील.
  • एखाद्या विषयावरचा (विशेषतः तंत्रज्ञान विषयक) संदर्भ हवा असेल तर मी प्रथम तो माझ्याकडच्या पुस्तकात आधी शोधतो. मग इंटरनेटवर. पुस्तक वाचायला बॅटरी ऊर्जेची गरज नाही.
  • कोणतेही यथोचित तंत्रज्ञान (appropriate technology) असे साधे आणि विशेष गतिमान नसलेले उत्तर शोधते. उदा. गोबर गॅस संयंत्र.
 • संसाधनांमधली विविधता हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. या विविधतेचा आदर करा. आपल्या चिरंजीवी आयुष्याचं नियोजन करताना अशा विविधतेचा उपयोग करा. आपल्या समस्येतही विविधता असते. निसर्गातल्या विविधतेचा वापर केल्याने समस्यांच्या विविधतेशी सामना करण्याची शक्ती आपल्यात आपोआपच येते.
  • एकाच मातीत विविध पिकं घेता येतात. एकाच शेतात दुहेरी पीक घेताना ही विविधताच लक्षात घेतली जाते. ही दोन्ही पिके एकमेकांना पूरक असतात.
  • पिकांवर पडणारी कीड ही शेतकऱ्याची महत्वाची अडचण आहे. पण निसर्गात जशी कीड आहे तसेच ही कीड खाणारे कीटकही आहेत. हल्ली या कीटकांचा उपयोग करून कीड नष्ट करण्याचे तंत्र विकसित झाले आहे.
  • शेतात मधमाशा पाळून फलोत्पादन वाढवणे काही नवीन नाही. कीटक आणि वनस्पती यांचे सहजीवन माणूस स्वतःसाठी वापरतो आणि या सहजीवनात सहभागी होतो.
 • निसर्ग निरीक्षण करताना एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्या. ती म्हणजे निसर्गातल्या विविध गोष्टी एकमेकांना कसा प्रतिसाद देतात ते पहा. हे साद-प्रतिसाद बरेच काही सांगत असतात. त्यांचा वापर आपल्या जीवनाचे नियोजन करताना उपयोगी पडेल.
  • जीवसाखळी हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. या साखळीतलं आपलं सर्वोच्च स्थान आपण जबाबदारीनं पेलायला हवं. पूर्वी चीन मधे पीक उत्पादन वाढावे म्हणून चिमण्या मारून टाकल्या. त्यामुळे टोळांची संख्या वाढली आणि पिकांचा फन्ना उडाला. नंतर काही वर्षं सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि लोक उपासमारीनं मेले.
  • रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन क्षारयुक्त आणि नापीक बनते. जैविक शेती करताना रासायनिक क्षेत्र टप्प्या टप्प्याने कमी करत जाणे गरजेचे ठरते.
 • निसर्गात आणि म्हणून आपल्या आयुष्यात बदल होतातच. काळजीपूर्वक निरीक्षण करून आणि योग्य त्या क्षणी योग्य तो बदल करून आपलं आयु्ष्य अधिक शाश्वत बनवता येतं.
  • काही साद प्रतिसाद समजून घ्यायला बराच अवधी लागतो. उदा. ऊर्जेचा अतिवापर झाल्यामुळे हरितगृह परिणाम आपल्याला सहन करावा लागतो. पण वर्षानुवर्षांचा अभ्यास आणि त्यानुसार कार्यवाही हीच संकटातून आपल्याला तारतील.
  • शीतकपाटात वापरला जाणारा वायु हळू हळू वातावरणात वर जातो आणि त्यामुळे वातावरणाला छिद्रे पडतात. त्यामुळे सूर्यकिरणातले अतिनील किरण गाळले जात नाहीत. अतिनील किरण थेट शरीरावर पडल्यामुळे कर्करोग होतो. या वायु ऐवजी दुसरा वायु शीतकपाटात वापरला गेला पाहिजे.

डेव्हिड होमग्रेन यांनी त्यांच्या Permaculture: Principles and Pathways Beyond Sustainability या पुस्तकात शाश्वत व्यवस्थांबद्दल वर उल्लेखिलेली बारा तत्वं दिली आहेत. अनुभव आणि विश्लेषण मात्र माझं आहे.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-20 Mon 09:33