UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


दोन पुस्तके

शाश्वत जीवनशैली बद्दल अनेक लोक चर्चा करतात. काही लोक ती अमलात आणतात. आधी केले मग सांगितले या न्यायाने श्री. दिलीप कुलकर्णी गेली २५ वर्षे जगत आहेत. त्यांनी लिहिलेल्या “सम्यक् विकास” आणि “ऊर्जा संयम” या दोन पुस्तकांविषयी…

लेखकाची ओळख

सम्यक् हा शब्द बौद्ध तत्वज्ञानाचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. संतुलित, अतिरेक नसणारा असा त्याचा थोडक्यात अर्थ. जेव्हा सगळी जीवनशैलीच सम्यक होऊन जाते तेव्हा ताण तणाव नष्ट होणे ओघानेच आले. श्री. दिलीप कुलकर्णी या माजी अभियंत्याने लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी “सम्यक विकास “, आणि “ऊर्जा संयम” ( राजहंस प्रकाशन पुणे) ही पुस्तके या जीवनशैलीचा अनोखा वेध घेतात.

कुलकर्णी गेली अनेक वर्षे पुण्यातील शहरी आयुष्य सोडून कोकणात अत्यंत साधेपणाने रहात आहेत. जगलेले विचार मांडत आहेत. अनेकांसाठी हे विचार कृतीत उतरवण्यायोग्य नाहीत. बैलगाडीच्या युगात नेणारे आहेत. किंवा अगदी आदिमानवाच्या काळात जायला सांगणारे आहेत.

अशी मूलगामी विचारांनी भरलेली पुस्तके वाचल्यावर आपण सम्यक विचार करणे गरजेचे असते. तो विचार केला की मग त्या विचारांचे महत्व जाणवते. नंतर ते प्रत्यक्षात उतरवतासुद्धा येतात.

आता पुस्तकांबद्दल

विकास ही संकल्पना हल्ली सर्वजण (आणि विशेषतः सरकार) आपल्या सोयी प्रमाणे वापरतात. विकास म्हणजे अधिकाधिक उपभोग हा या सोयिस्कर विचारांमागचा मूळ प्रवाह असतो. या लोकप्रिय विचाराला छेद देणारी सम्यक विकासाची संकल्पना कुलकर्णी मांडतात. व्यष्टी (व्यक्ती), समष्टी (समाज) आणि सृष्टी (निसर्ग) या तीनही जीवन-घटकांच्या भल्याचा समतोल साधत जाणारा विकास म्हणजे सम्यक विकास.

व्यक्तीच्या विकासाचा विचार मांडताना एक महत्वाचा मुद्दा कुलकर्णींनी मांडला आहे. तो म्हणजे व्यक्तीच्या जाणीवांचा विकास. या विकासाला मर्यादा नाही. (भौतिक विकासाला मात्र मर्यादा आहेतच. त्यातली महत्वाची मर्यादा ऊर्जेची आहे.) संवेदना बोथट झालेल्या आजच्या समाजात जाणीवांचा विकास फार महत्वाचा आहे. खरं तर विविध प्रकारच्या अडाणीपणाचे मूळ बोथट संवेदना हेच आहे.

जीवनशैली साधी करणे हे सम्यक् विकासामागचे महत्वाचे सूत्र आहे. आज बहुतांशी साऱ्यांची जीवनशैली उपभोगवादी (किंवा चंगळवादी) आहे. जीवनशैली साधी करणे ही त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नाही. म्हणून ते न करण्यासाठी हे लोक विविध सबबी सांगतात. खरं तर हे सारं धर्मानं सांगायला हवं. पण धर्म कधीच प्रश्न विचारू देत नाही. शिवाय धर्म आणि बाजार यांचे अधिकाधिक घट्ट होणारे नाते साध्या जीवनशैलीचा कधीच पुरस्कार करणार नाही. कोणतेही राजकीय तत्वज्ञान साध्या जीवनशैलीचा पुरस्कार आज करत नाही. कारण तेही बाजार-शरण आहे. म्हणूनच एकेका व्यक्तीच्या जाणीवांचा विकास होऊन ती व्यक्ती साधी जीवनशैली निवडेल तरच सम्यक विकास होईल.

सम्यक विकासासाठी ऊर्जा संयम हवा. कारण सर्व तऱ्हेच्या विकासासाठी ऊर्जा हवीच. ऊर्जेची निर्मिती आणि वापर यांचा सर्वंकष विचार ऊर्जा संयम या पुस्तकात कुलकर्णी करतात. ऊर्जेची विविध रूपे कोणती आहेत, उपयुक्त ऊर्जा (enthalpy), अनुपयुक्त ऊर्जा (entropy) आणि ऊर्जेचा हिशोब या सारख्या तांत्रिक गोष्टी मराठीत शक्य तेवढ्या सोप्या करून ते सांगतात.

ऊर्जेचा हिशोब ही एक महत्वाची संकल्पना मांडताना कुलकर्णी सांगतात की एक सोलर पॅनेल बनवताना इतकी ऊर्जा खर्च होते की तितकी ऊर्जा ते पॅनेल त्याच्या उभ्या आयुष्यात मिळून निर्माण करू शकत नाही. जी गोष्ट सोलर पॅनेलची, तीच गोष्ट धरणांची सुद्धा. विशेषतः ऊर्जा रूपांतर करणाऱ्या अशा साधनांच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे. त्यातल्या त्यात सूर्याच्या उष्णता ऊर्जेचा वापर करणारी यंत्रे या दृष्टीने कमी भ्रष्ट आहेत.

जगाचे राजकारण ज्या खनीज तेलांभोवती फिरते त्या इंधनाबद्दल त्यांचे विचार मननीय आहेतच. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात या सगळ्यांचा विचार करायला लावण्याचे महत्वाचे काम त्यांचे “ऊर्जा संयम ” हे पुस्तक करते.

सामर्थ्य आणि मर्यादा

मूलगामी विचार मांडणारी, वैज्ञानिक संकल्पना विस्ताराने सांगणारी ही पुस्तके मराठीत अाहेत हे त्यांचे मोठेच सामर्थ्य आहे. वाचकाला विचार करायला ती भाग पाडतात कारण ते विचार सर्वसामान्य वाचकाच्या आयुष्याशी निगडित आहेत.

आपल्या संस्कृतीत या गोष्टींचा आधीच कसा विचार झाला आहे आणि तिचे अनुकरण करण्याने अनेक प्रश्न सुटतील असा भाबडा विचार ही या पुस्तकाची एक मर्यादा म्हणावी लागेल. गतकालातले चांगले तेवढे घेईन असे म्हणणे सोपे अाहे पण घेणे कठीण. संस्कृती एक पॅकेज डील असते आणि त्यातले चांगले नव्हे तर सोयीचेच केवळ घेतले जाते ही वस्तुस्थिती आहे.

आता करूया सम्यक कृती

असे मूलगामी विचार पटले तरी अमलात आणणे ही गोष्ट अवघड असते. ती अमलात न आणण्यासाठी अनेक सबबी सांगता येतात. ऊर्जेचा हिशोब पटतो पण आरामदायी स्थितीतून (comfort zone) बाहेर येणे महाकठीण असते. मग मूळ विचारांनाच नावे ठेवणे सुरू होते. शिवाय ” सगळं कसं मस्त्त चाल्लंय् !” ही भावना जोर धरते.

एक टोक आहे आदिमानवाचे जीवन जगणे, दुसरे टोक आहे चंगळवाद. चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर बाजाराला शरण जायचं नाही. आदिमानवासारखं जगायचं नसेल तर ऊर्जेचा आणि तंत्रज्ञानाचा वापर संतुलितपणे करायचा.

एक व्यावहारिक पद्धत वापरून पहाण्यासारखी आहे. मला १९९५ सालची माझी जीवनशैली योग्य वाटते. यावर्षी मी कायमची सायकल वापरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संगणक होते पण त्यांचा अतिरेकी वापर नव्हता. मोबाइल नव्हते पण फोन वरून दूरसंवाद शक्य होता. (मी आज ९९ टक्के लँडलाइन फोनच वापरतो.) वाहने होती पण त्यांची अतोनात गर्दी नव्हती.त्यामुळे रस्त्यावर छान श्वास घेता येत होता. माझे आजचे जीवन मी या जीवनशैलीशी गोठवून टाकले आहे.

तुम्हाला गतकालातल्या कोणत्या वर्षातली जीवनशैली यापुढे सतत जगायला आवडेल ? (मागचं वर्ष – २०१६असलं तरी चालेल) आज तिथेच आपले जीवनमान कायमसाठी गोठवून टाका. कारण थांबणे महत्वाचे आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना जगण्याची शाश्वती आपण देऊ शकू.

कवि सुरेश भटांची एक ओळ आहेः

” चालण्याची नको -येवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो .”

एखादी गोष्ट (उदा. दुकान,सरकार) चालण्याचं, करू नये इतकं कौतुक आम्ही करत आलो, पण अवघड आहे ती थांबण्याची कला. कुठे आणि कसं थांबायचं हे कळलं पाहिजे.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-19 Sun 10:25