UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


श्यामची आई ती आमची आई !

राजहंसाचे चालणे | भूतली झालिया शहाणे ||

म्हणोन काय इतरे | चालावेचि ना ? ||
आचार्य अत्रे, वसंत बापट यांच्यासारख्या मोठ्या लेखकांनी साने गुरुजींच्या “शामची आई” या विषयावर लिहिलं आणि सांगितलं आहे. माझा आवाका त्यांच्याइतका मोठा नाही म्हणून मी चारच मिनिटं या विषयावर बोलणार आहे. ते सुद्धा माझी आई हा त्यातला भाग आहे म्हणून .

मित्रहो, हा विषय घेतल्यावर मी माझ्या आईला “शामची आई” हे पुस्तक आणायला सांगितलं. आमच्या आईनं हे पुस्तक पूर्वीच वाचलं आहे. मी सुद्धा त्या सर्व बेचाळीस गोष्टी वाचल्या. शाम हा माझा भाऊ, मित्र , खेळगडी आहे असं मला वाटलं. माझ्या ताईला आणि शेजारच्या मित्रालाही तसंच वाटलं. आमच्या पुढच्या पिढ्यांनी हे वाचलं तर त्यांनाही शाम आपलाच वाटेल. शामचं आणि आपलं नातंच असं विलक्षण आहे.

आमची आई जशी आम्हाला रागावतॆ तशीच शामची आई त्याला रागवायची हे वाचून मला खरं तर बरं वाटलं. शाळेच्या डब्यात पोळी राहिली आणि मी तो तसाच घासायला टाकला म्हणून आई मला बोलली. ताईशी भांडण झाल्यावर आईनंच भांडण मिटवलं. शाळेत जाताना आगगाडीच्या रुळावरून न जाता पुलावरून जा असं तिनं मला बजावलं होतं. पत्रावळ लावायला लाबून तिनं मला स्वावलंबन शिकवलं, भित्रं होऊ नये म्हणून पोहण्याची सक्ती केली. तिनंं एक तीळ सात जणात वाटून खायला शिकवलं. खोट्या प्रतिष्ठेचा राग करायला आणि दिलेला शब्द पाळायला तिनंच दुर्वांच्या आजीला बजावलं. मित्रांनो, पुस्तकातले प्रसंग मी माझे म्हणून सांगितले. शामचंच बालपण पुन्हा आपल्या वाटेला नावं आणि पात्रं बदलून येतं म्हणून ही चूक झाली असेल.

आमची आई ही शामची आई हे सांगण्यासाठी नगास नग म्हणून बेचाळीस प्रसंग मी सांगत बसणार नाही. कारण शामची आई ती आमची आई हे निराळं सिद्ध करण्याची गरजच नाही .

शामची आई ती आमची आई आहे याला आणखी एक महत्व आहे . आमची आई ही सॅमच्या मम्मी प्रमाणे नाही. ही ती गोष्ट आहे. आमची आई शुभंकरोति शिकवते, श्लोक पाठ करून घेते, गाणं म्हणायला शिकवते आणि इंग्रजी सुधारावं म्हणूनही प्रयत्न करते. पण ते इंग्रजी बुटात व टायमधे बांधलेलं नसावं असं तिला वाटतं.

शामची आई हे पुस्तकातलं पात्र नाहीच . ते घराघरात आहे. किंवा घराघरातून हे पात्र पुस्तकात शिरलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आमची आई ही थोर नाही. ती शामची आई आहे, रामची आई नाही. कारण आम्ही राम , शिवाजी किंवा झाशीची राणी होऊ शकणार नाही. पण तिनं आम्हाला घडवलं आहे. म्हणून राम सापडला तर आम्ही वानरसेनेत जरूर जाऊ. शिवबाचे मावळे होऊ, राणी लक्ष्मीसारखा पराभवातही स्वाभिमान जपू.

मित्रहो, आमची आई ही थोर नसेल पण ती शामची आई आहे हे विसरून चालणार नाही. आम्ही राम होऊ नाही शकणार पण शाम तर होऊ. कुणी सांगावं , गवळ्यांच्या पोरांबरोबर उष्ट्या पत्रावळी उचलताना आम्ही गोवर्धन पर्वत उचलू शकू. आयत्या बिळावरचा कालिया नाग मारू शकू. कोणत्याही पुतना मावशीचं खोटं प्रेम आम्हाला फसवू शकणार नाही. उर्मट राज्यकर्त्यांचे कंसं काढून टाकून बेरजा खुल्या करू शकू . राज्य भोगतानाही सुदाम्याचे पोहे गोड मानून खाण्याचे संस्कार आमच्या वर आहेतच. … आणि हा महाभारत घडवताना एखादे मोठे तत्व ही सांगून जाऊ .

……हे काही केवळ स्वप्नरंजन नाही. आपल्या सर्वांच्या मोठ्या आईचा हा इतिहास आहे. आणि त्या शामची आई ही आमची सुद्धा आई आहे.

(कु. विनीता जोशी हिच्यासाठीचे फिनिक्स च्या स्पर्धेतील भाषण)


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-16 Thu 12:23