UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


सत्यनारायणाची कथा

हे सत्यनारायणाच्या कथेचे विडंबन नाही. सत्यनारायण या संकल्पनेचा निराळा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न.

अध्याय १

सूत शौनकाला म्हणाला पुजा सत्यनारायणाला
करि जो ऐशा व्रताला कलियुग स्पर्शे ना त्याला ।।
आता शौनक सूतासि पुसे ऐसे हे व्रत करावे कसे
कलियुगाचे क्रूर फासे खेळावे कैसे सांग तू ।।
सत्य नारायणाची महती युगानुयुगे सारे गाती
जन्मोजन्मीची भ्रमंती मिटून जाई व्रताने या ।।
हाचि जन्म जयाचे लक्ष लावोनि टाकी सोक्षमोक्ष
पुरावे घेऊन प्रत्यक्ष व्रत हे त्याचे साठीही ।।
सूत पुढे शौनकाला म्हणतो,
ऐक तुला सांगतो शौनका अशा व्रताची कथा
करशिल जर तू हरतिल साऱ्या आयुष्याच्या व्यथा ।।
साधू वाण्याला हे सत्यनाराणाचे व्रत माहिती होते. त्याच्या अनुभवातून साकार झालेली ही गोष्ट मी तुला सांगतो. त्या आधी हा साधू वाणी कोण हेही सांगावे लागेल. ऐक तर….
एका नगरात कोणी होता साधू वाणी
व्यापारात मालामाल मोजी नोटा नाणी ।।
निर्यातीत मिळे पैका कळे त्याला आता
ऐका सत्यनारायणाची कथा ।।
साधू वाणी धार्मिक होता. व्यापारातील अनिश्चिततेमुळे त्याने सत्यनारायण व्रताचा संकल्प सोडला होता. तरीही प्रवास, चिकाटी आणि सातत्य यावरही त्याचा दांडगा विश्वास होता. साधू वाण्याकडे कल्पनांची वाण नव्हती आणि व्यापारासाठी धनाचीही वाण नव्हती. त्याने पाहिले की सगळीकडे बाटल्यात भरून पाणी खपते आहे. पैका पाण्यात गेला अशी म्हण बदलण्याची वेळ आली आहे. म्हणून साधू वाण्याने सरळ एक पाणी डॉट कॉम कंपनी काढली. बी टू बी आणि बी टू सी अशी भाषा वाढली.
करा ई मेल आणि वाढवा सेल
धाडस आणि माहितीचा घाला मेळ ।।
तुमचा आमचा सगळ्यांचा वाचवा वेळ
इलेक्ट्रॉनिक व्यापाराचा सगळा खेळ ।।
जगात अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याची गरज आहे हे साधू वाण्याने जाणले.
त्याने तंत्रज्ञ आणले विहिरी खणल्या, पावसाचे पाणीही टाक्यांमधे भरले.
उत्तर धृवावरील बर्फ ढकलत आणून जगाला पाणी पुरवायचे त्याचे स्वप्न होते.
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये हे त्याला माहिती होते.
सूत म्हणतो….
साधू वाणी विकतो पाणी खुशाल कंटेनर भरुनी
देशोदेशी जाई आणि येई तेथे जल विकुनी ।।
अशाच एका देशी गेला जहाज घेउनि वेगाने
सूत गातसे प्रेमे त्याच्या सफरीचे मंगलगाणे ।।
एकदा एका वाळवंट देशात पाणी पुरवण्याचे मोठे कंत्राट मिळवून साधू वाणी त्या देशाकडे रवाना झाला. या देशात धन मुबलक होते पण पाण्याची कमतरता होती. तिथे खनिजे खूप होती पण वरुणाची अवकृपा होती. साधू वाण्याने ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याचे पंप काढले. मोठमोठ्या प्रदर्शनात पाणी शुद्धतेचे दाखले मांडले.
सेल मांडियेला वाळवंट देशी
गरजत विकिले पाणी रे ।।
स्वस्त आणि मस्त पाण्याच्या घागरी
पुरवीत जाई वाणी रे ।।
मिळवल्या नोटा सुवर्णाची नाणी
धनवंत झाला प्राणी रे ।।
खरीदला माल खनिजांच्या खाणी
त्यांची ही कहाणी कहाणी रे ।।
सूत शौनकाला म्हणाला की साधू वाणी धनवंत झाला. आणलेला सगळा माल खपत आला. तेव्हा साधू वाण्याने ठरवले की वाळवंट देशातले आपले राहणे संपत आले. म्हणून त्याने पुढच्या पुरवठ्यासाठी करार केले. पाणी पुरवठ्याचे दरही वाढवून मिळवले. वाळवंटीच्या राजाला कुर्निसात केले. विमानाने मायदेशी प्रस्थान ठेवले.
अशा रीतीने पहिला अध्याय येथे समाप्त झाला.
।। श्रीसत्यनारायणार्पणमस्तु।।

अध्याय २

साधू वाणी वाळवंट देशाची सफर यशस्वी करून मायदेशी परतू लागला.
परतताना साधू वाणी विमानातही हवेत होता
व्यापारवाढीची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पहात होता ।।
आठ दहा तासांची होती त्याची फ्लाइट
डोक्यात होता बिझिनेस अॅट द स्पीड ऑफ लाइट ।।
मग प्रकाशाच्या वेगानेच सारे काही घडले
रखरखीत वाळवंटात त्याचे विमान कोसळले ।।
कोसळताना कळली त्याला मातीच्या मायेची ओढ
मनात विचार चमकून गेला संकटात अर्धे सोड ।।
वाळूत पडला जिवंत कसा कोण जाणे
खुर्चीच्या गादीवर पडला अल्लदपणे ।।
गादीवर पडला तरी हाडे खिळखिळी झाली होती
तप्त कडक उन्हामुळे जीभ कोरडी पडली होती ।।
सारे सारे सहप्रवासी इकडे तिकडे विखुरलेले
काही हाती पायी धड पण सारे निघून गेलेले ।।
वाळवंटातल्या स्मशानात एकटा जीव कण्हणारा
घसा जीभ ओठ कोरडे आणि ऊर धपापणारा ।।
एक एक क्षण त्याला युगासारखा भासला
त्याच्या साठी आयुष्याचा हाही एक मासला ।।
असा तृषार्त झालेला साधू – पाण्याचा व्यापारी
एका एका थेंबासाठी दाही दिशा शोध करी ।।
त्याचे झाले मुख म्लान – तीव्र लागली तहान
काय मिळालेले सारे धन टाकावे गहाण ? ।।
जीभ फिरवतो ओठी श्वास कष्टानेच घेई
थकलेला चुकलेला वाणी चातकची होई ।।
डोळे किंचितसे अजून उघडे पाही सभोवार जो
आकाशी दिसतो यम परजुनी टाकी कसा पाश तो ।।
तृषेने झालेला गलित अवघा भयभीत खाली पडे
मृत्यूच्या सेनेचे अवचित तया दर्शन घडे ।।
अशा कातरवेळी एक चमत्कार घडला
साऱ्या आभाळभर एकच चकचकाट झाला ।।
थकून गेलेली गात्रे आणि अंधारलेली दृष्टी
सत्य सत्य सत्याने भरून गेली सृष्टी ।।
आला आला प्रकाशाचा महापूर आला
गेला गेला अंधार पळून दूर गेला ।।
सूत शौनकाला म्हणाला, की हा साक्षात्कार नेमका कसा झाला ते आता ऐक.
वाळवंटी झरा त्याच्या नजरेस पडे
साधू वाणी म्हणे सत्य दर्शनच घडे ।।
झुळू झुळू वाहे जळ भरे वाण्याची ओंजळ
साधू वाणी जिंके जन्म मरणाचा खेळ ।।
साधू वाणी म्हणतो की मरणाच्या दारात मला सत्य-दर्शन घडले. मृत्यूच्या काठावर माझ्या तोंडात जीवनाचे थेंब पडले.
सत्यनारायण त्याने प्रत्यक्ष पाहीला
साधू वाणीयाचा जन्म सार्थक झालेला ।।
तृषार्ताचे सत्य – जळ, कळे त्याला आता
ऐका सत्यनारायणाची कथा ।।
अशा रीतीने सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त झाला. तेव्हा शौनक सूताला म्हणाला, की ऐन वेळी योगायोगानेच साधू वाण्याला वाळवंटात झरा सापडला. सत्य-दर्शन असे योगायोगानेच होत असते काय ? शिवाय मृत्यूच्या दारातच सत्याचा लाभ होतो असे मला या अध्याया वरून वाटते आहे, या बद्दल तू तुझे मत सांग. तेव्हा सूत शौनकाला म्हणाला, की सत्य दर्शन योगायोगानेच होते किंवा कसे हे मी नाही सांगू शकणार. पण सत्य दर्शनाचा योग मृत्यूच्या दारात येत असणार कारण त्यावेळी इतर साऱ्या गोष्टी मृत्यूच्या धगीने वायुरूप होतात आणि जे काही उरते ते निखालस सत्य असते असा अनेकानेक बुद्धांचा अनुभव आहे. खरे तर जीवनात धोका पत्करून जीवाचीही तमा न बाळगता कर्म करीत राहणे हे गरजेचे आहे. कारण त्यामुळेच मृत्यूच्या दारात सतत रहाता येते आणि सत्य दर्शनाची शक्यता वाढते. तेव्हा सत्यनारायणाचे हेच खरे व्रत आहे हे तू जाण. अशा रीतीने सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त झाला.

श्रीसत्यनारायणार्पणमस्तु

अध्याय ३

सूत शौनकाला म्हणाला की साधू वाणी वाळवंट देशातून आपल्या घरी परत आला. आपल्या डॉट कॉम कंपनीच्या कचेरीत गेला. तेव्हा त्याला तिथे दोन ई-मेल्स आलेल्या दिसल्या. पहिली मेल दुःखद होती. वाळवंट देशाची बातमी त्यात होती. वाळवंट देशात म्हणे एक झरा सापडला. बऱ्याच मुलखाला त्याने पाणी पुरवठा केला. वाळवंट देश पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे साधू वाण्याचा व्यापार करार मात्र रद्द झाला. साधू असला तरी तो वाणी होता. सर सलामत तो पगडिया पचास करता. साधू वाण्याने पहिली ई-मेल किक् केली. आणि दुसरी क्लिक् केली.
शुद्ध हवा सगळ्या जगात महाग झाली. तपकिरी देशाने त्या हवेचीच मागणी केली.
आपण शुद्ध पाण्याचे ठोक व्यापारी आहात असे कळले. म्हणूनच आमचे लक्ष तुमच्याकडे वळले.
आमच्या देशात शुद्ध हवेची आहे कमी. सारे नागरिक धुराचे श्वास घेतात नेहमी.
शुद्ध हवा हेच आरोग्यामागचे तत्व. विकत घेतल्या शिवाय नाही कळणार त्याचे महत्व.
वाण्याने कोटेशन धाडले. एक घनमीटरला एक डॉलर असे करार मदार झाले.
साधू वाण्याने सत्यनारायणाचे आभार मानले. त्यानेच एक दार बंद केले तरी दुसरे उघडले.
सारी तयारी झाली. तपकिरी देशाच्या सफरीसाठी साधू वाण्याची स्वारी तयार झाली.
साधू वाणी हवा पाण्याचे ठोक व्यापारी. मुक्काम पोष्ट ग्लोबल व्हिलेज, आता मिशन तपकिरी.
त्याने हवेचे सिलिंडर्स जहाजामधे भरले. नंतर साधू वाण्याचे विमान हवेत झेपावले.
सुखरूप उतरला साधू वाणी तपकिरी देशात
तिथे तपकिरीच माती खेडी शहरात आणि तपकिरीच माती शेतात.
साधू वाण्याने शुद्ध हवेची दुकाने मांडली देशभर.
स्वस्त आणि मस्त हवेने केला तेथे कहर.
रुग्णालये आणि विद्यालयात त्याने दरात सवलत दिली.
नृत्यालये आणि मद्यालये येथे मात्र लूट केली.
एके दिवशी साधू वाणी फिरायला बाहेर पडला होता.
एका चौकात थोडा जमाव एकत्र जमला होता.
उंच सरळ खांब त्यावर तपकिरी झेंडा तपकिरी फीत
थोड्याच वेळात सुरू झाले तपकिरींचे झेंडा गीत…..
पवित्र तपकिरी झेंड्या तुला आमचे लाखो सलाम
आम्ही सारे तुझे शिपाई अनाम.
आम्ही सारे एकमेकांची कॉपी टू कॉपी
आम्ही सारेच पुण्यवान नाही कोणीच पापी.
आम्ही तपकिरी आमचे कपडे तपकिरी आमची ह्रदये तपकिरी, आमचे तपकिरीच रक्त
पवित्र तपकिरी झेंड्या आम्ही तुझे तपकिरीच रे भक्त.
आमच्या जुन्या जाणत्या तपकिरीच पोथ्या.
त्यांना बांधून ठेवणारा तपकिरीच काथ्या.
तपकिरीच अक्षरे शब्द आणि पाने.
ते वाचले नसले तरी आम्हीच लोक शहाणे.
शिस्त शील देशभक्ती ही तर आमचीच मक्तेदारी.
कारण आम्ही तपकिरी.
पवित्र तपकिरी झेंड्या तुला आमचे लाखो सलाम, आम्ही सारे तुझे शिपाई अनाम.
साधू वाणी गाणे ऐकून खूष झाला. निवासस्थानी परत आला.
काही दिवस असेच मोठे मजेत गेले. साधू वाण्याला स्वदेशात परतायचे वेध लागले.
त्याने ठरवले त्या देशातल्या निसर्गरम्य ठिकाणी जायचे. थोडा वेळ तरी हसायचे गायचे.
तिथल्या उंच डोंगराळ भागात तो गेला. झरे आणि झाडे यांच्या सहवासात रमला.
इथले लोक त्याला अधिकच आनंदी भासले. त्याच्या बरोबर राहिले बोलले आणि हासले.
तपकिरी डोंगरात हिरवीगार झाडे हलली. हिरव्यागार झाडांवर रंगबिरंगी फुले फुलली.
लोक खूपच खुष झाले. पण त्यांना आश्चर्यही वाटले.
नुसत्या शुद्ध हवेने तपकिरी झाडे रंगबिरंगी कशी होतात ?
कशी डुलतात झुलतात आणि फुलतात ?
साधू वाणी म्हणाला,
शुद्ध हवेने झाडेच का, माणसे देखील बदलतात. त्यांचे विचार आचारही बदलतात.
हवेचेच शेवटी वारे होतात. आणि वाऱ्याचीच वादळे होतात. नवे विचार नवे उच्चार आचरणात सळसळतात.
सहलीला जाऊन वाणी परत आला निवासस्थानी
त्याने पाहिले त्याचे ठिकाण घेरले होते शिपायांनी.
साधू वाणी शुद्ध हवेचे व्यापारी- आता पाहुणे झाले सरकारी.
वाण्याला तपकिरी शिपायांनी घेरले. जेरबंद करून राजासमोर हजर केले.
तपकिरी कपड्यातला तपकिरी राजा. अक्राळ त्याचा चेहरा विक्राळ त्याची सजा.
आरोपीवरचे आरोप वाचून दाखवा, राजा ओरडला.
एक तपकिरी शिपाई आरोप वाचू लागला.
शुद्ध हवेच्या मिषाने याने बंडाचीच आयात केली.
लोकांना नव्या विचारांची चटक लावली.
डोंगराळ भागात त्याने चिथावणीची भाषणे केली.
याने हवेचे वारे केले आणि वाऱ्यांची वादळे केली.
याने निसर्गाचा तपकिरी तोलही बिघडवला.
याने करणी केली पानांना हिरवा रंग दिला.
तपकिरी राज्यात याने रंगीत फुले फुलवली.
शुद्ध हवेच्या मिषाने याने बंडाचीच आयात केली.
याच्या शुद्ध हवेमुळे लोकांचे माथे भडकले
आणि महाराजांचे सिंहासन डळमळले.
म्हणूनच महाराज याला जास्तित जास्त सजा द्या.
म्हणजे नवी हवा आणणार नाही कोणी उद्या.
साधू वाणी म्हणाला- महाराज, मी एक क्षुद्र व्यापारी.
हवा आणि पाण्याचा व्यापार करी.
तुमच्या राज्यात बंडाची मुळीसुद्धा इच्छा नाही.
येथे आलो होतो. पैका मिळेल म्हणून काही.
जशी तुमची इच्छा असेल तसे करतो.
तुम्ही आज्ञा दिलीत की परत जाईन म्हणतो.
मज गरीबावर दया करी महाराजा.
येथून निघून जाणे इतकीच द्यावी मला सजा.
महाराजांनी तपकिरी पोथी धुंडाळली. ती उलगडून तिची पाने चाळली.
तपकिरी पानांवरची तपकिरीच शाई. निकाल वाचायची महाराजांना झाली घाई.
तुझी शुद्ध हवा आणि शुद्ध वारे. यांनी कोसळले आमचे देव्हारे.
येथे कायम टिकले पाहिजे तपकिरीच शासन. म्हणून देहांत प्रायश्चित्त हेच तुला शासन.
देहांत प्रायश्चित्त…महाराज गरजले. साधू वाण्याचे पाय भीतीने थरथरले.
दया करा महाराज दया. साधू वाणी करी गयावया.
तपकिरी राज्यात फार कडक असते शिस्त. मेंदूपेक्षा पोथीवरती त्यांची असते अधिक भिस्त.
मृत्यूच्या बेटावर जा त्याला घेऊन. टाका त्याचे तिकडेच दोन तुकडे करून.
महाराजांची आज्ञा शिपायांनी मानली. मृत्यूच्या बेटाकडची सफर सुरू झाली.
मरणाच्या दारामधे साधू वाणी जाता.
संपत्ती नातीगोती अर्थहीन जाणता.
मृत्यू हेच एक सत्य कळे त्याला आता.
ऐका सत्यनारायणाची कथा.
एकही चमत्कार झाला नाही. थोडाही चकचकाट झाला नाही.
त्याचे वार झेलण्यासाठी सत्यनारायण आला नाही.
आरोपीचे दोन तुकडे शिपायांनी केले. परत जाऊन महाराजांना तसे रिपोर्ट दिले.
अशा रीतीने सत्यनारायण कथेचा तिसरा अध्याय समाप्त झाला. तेव्हा शौनक सूताला म्हणाला, की सत्यनारायणाच्या व्रताचा हा असा परिणाम होतो हे समजले तर हे व्रत करणार तरी कोण ? आणि मृत्यू हेच जर अखेरचे सत्य असेल तर ते समजून घेण्यासाठी कोणत्याच व्रताची गरज कुठे आहे ?
तेव्हा सूत शौनकाला म्हणाला की या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मी तुला चौथ्या अध्यायात देणार आहे. ती आहे साधू वाण्याची अंतिम सफर… म्हणजेच अंतिम सत्याचा शोध.
असे म्हणून सूताने चौथ्या अध्यायाची कथा सांगावयास सुरुवात केली.

श्रीसत्यनारायणार्पणमस्तु

अध्याय ४

मृत्यूच्या बेटावरचे साधूवाण्याच्या शरीराचे दोन तुकडे सत्यनारायणाने सांधले नाहीत. त्याने ते दोन्ही तुकडे स्वतंत्रपणे जिवंत केले. त्यासाठी त्याने कलियुगातील क्लोनिंगचे तंत्र वापरले. सारख्याच दिसणाऱ्या या दोन देहांना त्याने दोन नावे दिली. एकाचे नाव ठेवले साधू तर दुसऱ्याचे ठेवले वाणी.
साधू , वाण्याला म्हणाला- माझा सत्याच्या शोधाचा प्रवास तुझ्या व्यापारी वृत्तीमुळे थांबला. म्हणून तुला खरेतर मृत्यूचीच शिक्षा योग्य होती. पण ते केल्यास तुझ्या शरीरापासून लगेचच अनेक वाणी तयार होण्याचा धोका संभवतो. म्हणून माझ्या आजवरच्या तपश्चर्येच्या जोरावर मी तुला शाप देतो की मनुष्यजन्माला तू लायक नसल्यामुळे तुझी अवनती होईल व तू पुन्हा खालच्या योनीत जाशील. तुझे माकड होईल.
अशा रीतीने वाण्याच्या शरीराचा नाश होऊन त्याचे माकड झाले. हे माकड बेटावरील झाडांवरून इतस्ततः फिरू लागले.
एकदा साधू सत्याच्या शोधात झाडाखाली तप करीत बसला असताना हे माकड तेथे आले आणि मोठ्याने ओरडून विचारू लागले की –
तुझा जन्म माझ्या निम्म्या शरीरापासून झाला
आणि माझा जन्म तुझ्या निम्म्या शरीरापासून
तेव्हा तू आणि मी एकमेकांची आई
की आपण दोघे भाई भाई ?
हे मला सांग….
पण या प्रश्नाकडे फुटकळ म्हणून साधूने दुर्लक्ष केले. तेव्हा चिडून जाऊन माकडाने त्याच्या डोक्यात वरून कठीण फळ मारले. तेव्हा साधूने रागावून पु्न्हा माकडाला शाप दिला…
….तुझ्या हिंडण्याफिरण्याच्या सवयीमुळे तू इथे आलास आणि मला त्रास दिलास. म्हणून मी तुला शाप देतो की तुझे गवत होईल. म्हणजे तुला हिंडता फिरता येणार नाही.
साधू शाप देऊन इतरत्र तपश्चर्येसाठी निघून गेला. इकडे कालांतराने माकडाचा मृत्यू झाला आणि त्याच्या शरीरावर गवत वाढले. हे गवत वाऱ्यावर हलू झुलू लागले व आपले जीवन सुखाने कंठू लागले. पुढे साधू तपश्चर्येसाठी एका ठिकाणी आला असता, सभोवतालची हिरवळ पाहून प्रसन्न झाला. व तेथेच तपास बसला. ध्यान करीत असता त्याला समोरच्या गवतफुलात वाण्याचा चेहरा दिसला.
त्या चेहऱ्याने विचारले, की मी जर गवत आहे तर बीज कोण आहे ते मला सांग, आणि जर बीजही मीच असेन तर मला येथे आणणारा वारा कोण आहे तेही मला सांग.
साधूने आपल्या प्रश्नकर्त्याला ओळखले पण आपल्या चिंतनात अडथळा आणणारा हा चेहरा त्याला मुळीच आवडला नाही. म्हणून त्याने गवताला पुन्हा शाप दिला की- तुझे रूपांतर निर्जीव शिळेत होईल आणि कोणीही तुझा उद्धार करणार नाही. क्षणार्धात गवताचा नाश होऊन तिथे ऩिर्जीव शिळेची निर्मिती झाली.
ही शिळा पावसात भिजत राहिली आणि कालांतराने तिचे रूपांतर मातीत झाले. पाण्याचे ओहोळ ही माती बेटभर घेऊन गेले. या मातीतच पुढे गवत आणि अनेक वृक्ष वाढले. काही प्राण्यांनी हे गवत खाल्ले. वृक्षाची फळे माणसा-माकडांनी खाल्ली.
पुढे एकदा साधूला भूक लागली तेव्हा त्याने एका झाडाचे फळ खायला घेतले. त्याला असा भास झाला की ते फळही त्याला प्रश्न विचारत आहे…..
…..मी जर फळ आहे तर तू कोण आहेस ते मला सांग.
पायाखालील गवताने त्याला विचारले की- मी जर गवत आहे तर तू कोण आहेस ते मला सांग.
तोच समोरून एक माकड आले आणि म्हणाले, की मी जर माकड आहे तर तू कोण आहेस हे मला सांग.
साधू म्हणाला की फार पूर्वी मी साधू वाणी होतो.
माकडाने विचारले-
माझी रूपे तू शाप देऊन देऊन इतकी बदललीस की त्यामुळे मला प्रश्न पडतो की मी खरा कोण आहे ? आणि साधू वाणी होण्यापूर्वी मी कोण होतो ?
आणि मुख्य म्हणजे हे गवत, ही झाडे, हे प्राणी आणि मी यांच्या मधे असणारा हा जो “मी” , तो खरा कोण आहे ? आणि एकाच वेळी सर्वांमधे असणारा हा “मी” आहे तरी कोण ?
साधू म्हणाला, माझ्या तपश्चर्येतून मी याच प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे. पण अजूनही ते मला मिळालेले नाही. तुझे इतके जन्म झाले आणि इतके अनुभव तू घेतलेस तर कदाचित तुलाच ते समजले असेल असे मला वाटते. तसे असेल तर ते मला सांग.
तेव्हा माकडाने या प्रश्नाचे उत्तर साधूला सांगितले……
विनाशाचे रूपांतर नवनिर्मितीत करण्याचे सामर्थ्य म्हणजेच मी आहे.
तुझ्या शापांचे रूपांतर वरदानात करण्याचे सामर्थ्य म्हणजेच मी आहे.
माणसाचे रूपांतर माकडात, माकडाचे रूपांतर गवतात आणि गवताचे रूपांतर बीजात आणि मातीतही करण्याची शक्ती मी आहे.
गुरुत्वाकर्षणाचा नियम मी आहे.
प्रकाशाचा वेग मी आहे.
गोंधळाचे रूपांतर सुव्यवस्थित संस्थेत करणारा तो मी आहे.
ऊर्जा आणि कणसंचयाचा संयोग करणारा मी आहे.
रचना, निर्मिती आणि विनाशाचा नियम मी आहे.
साधूला वाटले की आपल्याला सत्य समजले. तेव्हा त्याने एक गोष्ट करायची असे ठरवले. आपल्याला सापडले ते अंतिम सत्य इतरांना सांगायचे त्याने ठरवले. आपल्या मताचा प्रसार करायचे त्याने ठरवले. लोकांना शहाणे करायचे त्याने ठरवले. आपल्याला सापडलेल्या अंतिम सत्याचे मार्केटिंग करायचे त्याने ठरवले. साधूने वाणी होण्याचे ठरवले.
सूत शौनकाला म्हणाला, की अंतिम सत्याचा उच्चार मला खुद्द साधू वाण्याच्या मुखातूनच पूर्वी ऐकायला मिळाला. या सत्याचा पडताळा आपण स्वतः आपल्या आयुष्यात घ्यावा हे बरे. सत्यनारायणाचे खरे व्रत हेच आहे- असे तू जाण.
अशा रीतीने सत्यनारायणकथेचा अखेरचा व चौथा अध्याय येथे समाप्त झाला.
।। श्रीसत्यनारायणार्पणमस्तु ।।


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-15 Wed 14:07