UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जनलोकां…


सम्यक् आजीविकेची कहाणी

ऐका आजीविकादेवी तुमची कहाणी !

आटपाट नगर होतं. तिथे एक गल्ली होती. गल्लीत अनेक सोसायट्या होत्या. अशा एका सोसायटीत मोरूचा बाप रहात होता. मोरूचा बाप मोरूच्या घरी रहात असे. घर कसलं फ्लॅटच तो. मोरूचं कुटुंब खरं तर चौकोनी होतं. बाप रहायला आल्यापासून ते पंचकोनी झालं होतं. मोरू एका कंपनीत मॅनेजर होता. कंपनीच्या हितात आपलं हित सामावलेलं आहे अशी समज त्याला देण्यात आली होती.

त्यामुळे दिवसातले १३ तास कंपनीच्या सेवार्थ घालवून, दमून भागून मोरू, घरी परत येत असे. मोरूची बायको तशी शिकलेली होती. तीही एक छोटीशी नोकरी करीत असे. मोरूचा मुलगा सहावीत आणि मुलगी दुसरीत शिकत होती.बायकोच्या आग्रहामुळे मोरूनी त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं.

मोरूचा बाप विधुर होता. ३० वर्षं इमाने इतबारे सरकारी सेवा केली. पण वरकमाई करण्याची त्याची हिंमत नव्हती असं मोरूचं म्हणणं होतं. सरकारी शाळेतून मास्तर म्हणून रिटायर झाल्यावर ५ वर्षांत बायको गेली. त्यानंतर गेली दोन वर्षं हा मुलाकडेच रहात होता.

नवरात्र उत्सवाच्या सुमाराची ही घटना. गेले नऊ दिवस गल्लीत चाललेल्या गरबा डान्सचा आज शेवटचा दिवस. मोरूच्या बापाला उद्यापासून शांत झोप मिळेल अशी आशा निर्माण झाली होती.

नवरात्र संपले दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, “मोरू ऊठ, आज दसरा. आज सीमोल्लंघन करायचं.…”

मोरूनं एक मोठी जांभई दिली आणि तो करवादला, “बाबा, जरा सुखानं झोपू द्याना ! सकाळी उठल्या उठल्या तुमची शिकवणी सुरू करू नका. आणि सीमोल्लंघन कसलं करायचं म्हणताय, आम्हाला जरा काळाबरोबर चालू द्या. आज संध्याकाळी सीमोल्लंघनच काय, सोनंही लुटून आम्ही घरी परत येऊ.जरा सुखानं आराम करू द्या.”

दुपारची जेवणं होईपर्यंत मोरूचा बाप गप्प गप्प होता. मग दसऱ्याची खरेदी करायला मोरूचं चौकोनी कुटुंब बाहेर पडलं तशी मोरूच्या बापानं लिहायला एक कागद पुढे ओढला.

दसरा, इसवी सनः २०१६

प्रिय मोरूस, अनेक आशीर्वाद.

सकाळची हुकलेली शिकवणी मी दुपारी सुरू केली असं तुला वाटेल. पण मन मारता येत नाही म्हणून हे लिहितो आहे. तू बराच काळ कंपनीच्या सेवेतच राहतोस त्यामुळे आपला संवाद जवळ जवळ संपला आहे. म्हणून हा लेखी संवाद करण्याची वेळ आली.

सण आणि सुटी ही फक्त खरेदी करण्यासाठीच नसते. तर प्रियजनांबरोबर वेळ घालवण्यासाठी असते, स्वतःसाठी काही करण्याची असते. पूर्वी मी नोकरी करत असताना दसऱ्याला आपण अनेकदा घरी जेवणानंतर पत्ते, कॅरम खेळत असू. पुढे टी.व्ही. आला तेव्हा दूरदर्शनचे कार्यक्रम एकत्र बसून आपण पाहिले. तेव्हा काळाबरोबर न चालण्याचा दोष तू मला देऊ नकोस.

खरं तर काळाबरोबर तुम्ही साऱ्यांनी चालायला हवं आहे. पण संडासात जाण्यासाठीही स्कूटरला किक मारता आली तर ती संधी तुम्ही सोडणार नाही अशी भीती मला वाटते. वेगाच्या हव्यासापायी तुम्ही स्वतःची जेव्हा फरपट करून घेता तेव्हा– चाला , आणि जरा हळू चाला– असे शब्द माझ्या मनात येतातच.

आपल्या जवळच्या लोकांत मोरूचा बाप हीच माझी ओळख आहे. तुला आठवतं मोरू, डिप्लोमाला गेल्यावर एक जाहिरात तू पेपरात पाहिलीस. एक मोठा नट एका मोटारसायकलवर बसून “मेरा तो लाइफ बन गया यार !” असं म्हणताना या जाहिरातीत दाखवला होता. तुला ती मोटारसायकल हवी होती कॉलेजात जायला. तुझ्या वयाला साजेल अशीच ती इच्छा होती. तुझ्या आईलाही तुझी ही इच्छा पुरी करावी असं वाटत होतं कारण आपली आर्थिक स्थिती तितकी काही वाईट नव्हती. पण बाजारानं केलेल्या या पहिल्याच हल्ल्यात तू गारद व्हावंस असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी तुला सांगितलं की स्वखर्चानं पेट्रोल भरण्याची क्षमता तुझ्यात येण्याची वाट पहा. तू नोकरीला लागल्यावर माझं वचन मी पूर्ण केलं. मी काळाबरोबर चाललो ना ?

डिप्लोमा झाल्यानंतर माझे कितीतरी मित्र तू डिग्रीसाठी प्रवेश घ्यावास असं म्हणत होते. पण मी फक्त मोरूचा बाप नव्हतो. मी एक शिक्षकही होतो ना ! तुला गणिताची फार आवड नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. तुलाही हे मान्य करावं लागलं. म्हणून तुला डिग्रीला जाण्यापासून मी परावृत्त करू शकलो. समाजाला काय मान्य आणि प्रमाण आहे याचा विचार न करता माझ्या मुलाला काय झेपेल याचा विचार मी केला तो त्याच्या हितासाठीच. तूही तुला स्वतःला आहेस तसं स्वीकारलंस याचं मला कौतुक वाटलं. तुला तुझ्या आईनं धीट बनवला होता. त्यामुळे कंपन्यांच्या मुलाखतीत तू कधी मागे पडला नाहीस. आताच्या कंपनीत तू स्वतःच्या गुणांवर वर चढत मॅनेजर झालास याचा अभिमान मला अर्थातच आहे.

तुझी बायको मंदा ही एक गुणी मुलगी आहे. मला फार न आवडणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्यांची ती मुलगी. तुला ती जीवनसाथी म्हणून पसंत आहे हे तू सांगितलंस तेव्हा तुझ्या आईला रुचलं नसूनही आम्ही दोघंही तिच्या आईवडिलांना जाऊन भेटलो. आठवतं तुला ? तुमचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं झालं. इतिहास आणि परंपरांच्या ओझ्याखाली आम्ही दबून जात नाही, चांगलं आणि वाईट यांच्या आमच्या व्याख्या स्वतंत्र आहेत. हे त्यावेळी तुझ्या लक्षात आलं का ? तुझ्या लक्षात आलं का, की तुझे आई-वडील साधे होते पण सामान्य नक्कीच नव्हते !

जगाचा शिरस्ता म्हणून तुम्ही सोनं खरेदी करता. पण तुमचं कुटुंब सोनेरी आहे हे का विसरता ? तुझी आई गेली तेव्हाची गोष्ट. नंतरच्या काही दिवसात माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा छोटी ऊर्जा नुकतीच बोलायला लागली होती. पुढे येऊन ती चिमुरडी म्हणाली “आजोबा, डोळे पुसून देऊ ?”. करुणेची जन्मजात देणगी मिळालेली ही मुलगी बाजाराच्या हल्ल्यात ती देणगी विसरणार तर नाही ? मैदानी खेळात उपविजेता झाल्यावर उत्सवनं मला येऊन त्याचं पदक दाखवलं. मी त्याला जेव्हा विचारलं की विजेता का झाला नाहीस, तेव्हा हा म्हणाला ” आजोबा,मी नेहमीच जिंकेन असं नाही पण खेळेन मात्र उत्तमच !”. हे शहाणपण त्यानं गमावू नये यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. त्यांच्या हातात नवं तंत्रज्ञान द्या पण त्यांच्या हातात निर्मिती करण्याची जादू हवीच . ती तुम्हालाच द्यावी लागेल.

गतिमान जगात तोल साधत जगणं महत्वाचं आहे. हे सोपं आहे असं माझं म्हणणंच नाही. पण हे अशक्य नाही. आणि कोणत्याही प्रवासाची सुरुवात एक पाऊल टाकून होते ना ? मग पुढच्या प्रत्येक पावलावर स्वतःला सांगावं लागतं… उतू नकोस मातू नकोस घेतला वसा टाकू नकोस..…

केवळ देव सांगतो म्हणून व्रत पाळू नका. केवळ पुढारी म्हणतो म्हणून स्वच्छताही करू नका. किंवा केवळ मी म्हणतो म्हणून स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण…

…कारण आयुष्य तुमचं आहे. निर्णय तुमचे आहेत. ते तुमचेच असायला हवेत. हे निर्णय बाजाराच्या हल्ल्यापुढे पराभूत होऊन, इतिहासाच्या ओझ्याखाली दबून, समाजमान्यतेच्या बेड्यांमधे जखडून किंवा व्यक्तिपूजेच्या प्रभावाखाली चिरडून घ्यायचे का स्वतंत्रपणे घ्यायचे हे तुम्हीच ठरवा.

मी आपल्या जुन्या चाळीतल्या दोन खोल्यांमधे परत जातो आहे ते तुमच्यावर रागावून नव्हे. स्वतःची फरपट होऊ न देण्याचा निश्चय मी केला आहे. काळाबरोबर पण हळू हळू चालणाऱ्या माझी गरज तुम्हाला जेव्हा भासेल तेव्हा मला बोलवा, मी येईन.

या पत्राचा सूर उपदेशाचा आहे हे मला मान्य आहे. मुलगा सोळा वर्षांचा झाला की त्याला मित्र समजावा अशा अर्थाचं सुभाषित आम्ही शाळेत शिकवायचो. ही मित्रत्वाची सीमा आज मी उल्लंघली असण्याची शक्यता आहे. मोरूच्या बापातला शिक्षक जागा झाल्यामुळे हे घडलं असेल.

तुझाच

मोरूचा बाप.

संध्याकाळी सोने लुटुनी (नवरतन ज्वेलर्स, सराफ गल्ली, आटपाटनगर) मोरू–मंदा परतुनी आले. घरात शिरल्यावर बाप दिसेना तेव्हा थोडी वाट पाहिली, हाका मारल्या. मग बाहेरच्या खोलीत ठेवलेली ही चिट्ठी सापडली.

मोरू आणि मंदा दिवाणखान्यात कोचाजवळ उभे होते. मोरूनी पत्र वाचून संपवलं. तेव्हा मंदा त्याच्यापाशी आली आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाली. “बाबा चांगले आहेत पण आपलं आयुष्य हे आपलं आहे. होय ना ?”

मोरू म्हणाला, “बाबांनीही तेच लिहिलं आहे मंदा.” आणि तो मट्कन कोचावर बसला.

चार प्रश्नांची ही कहाणी मोरू–मंदानं ठोस कृती न केल्यामुळे निष्फळ आणि अपूर्ण राहिली.

वाचकांनी ही कहाणी आपापल्या मनात पूर्ण करायची आहे. आणि ती स्वतःच्या आयुष्यात सुफळ संपूर्ण करायची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.


माझी ही कथा “धूळपेरणी ” या बारामती तालुक्यातून प्रसिद्ध होणाऱ्या २०१६ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.


HOME

Author: सम्यक

Created: 2017-11-16 Thu 16:49