UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


अंतर्गोल आरशाची सूर्यचूल

पेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.

पेटी पद्धतीच्या चुलीच्या मर्यादा

 • सूर्य ऊर्जा एकत्रित करण्यात पेटी पद्धतीची चूल तांत्रिक दृष्ट्या कमी कार्यक्षम आहे.
 • उचलायला व सरकवायला (विशेषतः गृहिणींसाठी) अवजड आहे.
 • अन्न शिजायला ३ ते चार तास लागतात.

अंतर्गोल अारशाची चूल वरील तीनही मर्यादांवर मात करू शकते. मात्र ती बिनचूक पद्धतीने बनवणे आवश्यक आहे. मी जी.एन्.यू. ऑक्टेव्ह या मुक्त संगणक प्रणालीचा वापर करून कोणत्याही आकाराचा सूर्यचूल आरसा तयार करण्याचा प्रोग्राम लिहिला आहे. जिज्ञासू व्यक्तींनी तो वापरून कोणत्याही आकाराची अशी चूल बनवावी.

सरळ एकप्रतलीय पृष्ठभाग वापरून paraboloid करता येत नाही कारण तो त्रिमित आकार आहे. पण अनेक पाकळ्या वापरून त्या जोडल्या तर paraboloid च्या जवळ जाणारा त्रिमित आकार बनवता येतो. हा प्रोग्राम लिहिताना:

 • पाकळीवरील प्रत्येक बिंदू हा उभ्या parabola चा घटक आहे. आणि ,
 • तोच बिंदू हा आडव्या रिंगचा (वर्तुळाचा) घटक आहे.

ही वस्तुस्थिती विचारात घेतली आहे.

पाकळीचे चित्र व मोजमापे

sector1.png

तुम्ही हे करून पाहू शकता-(सर्व मोजमापे सेंटिमीटर मध्ये)

पाकळी उंची (ring boundary) रूंदी (width of the sector)
45.94 6.98
39.82 6.21
34.04 5.43
28.55 4.65
23.34 3.88
18.36 3.1
13.59 2.33
8.97 1.55
4.46 0.78
0 0

अंतर्गोल आरसा कसा तयार कराल ?

ज्या व्यक्तींना हा प्रोग्राम वापरणे शक्य नाही त्यांच्या साठी, चार माणसांची भाजी-भात आमटी सुमारे १ तासात तयार करण्यासाठी जो आरसा लागेल. तो कसा तयार करायचा याची थोडक्यात कृती येथे देत आहे.

 • कोणताही चकचकीत पृष्ठभाग (कागद, पुठ्ठा, स्टेनलेस स्टील पत्रा इत्यादि) विशिष्ट पद्धतीने sectorकापून एक पाकळी बनवा. पाकळीची मोजमापे व आकार पुढे दिला आहे. मोठ्या आकारात पहाण्यासाठी आकृतीवर क्लिक करा. हा साधा त्रिकोण नाही हे ध्यानात घ्या.
 • अशा ३६ पाकळ्या बनवा.
 • प्रत्येक पाकळीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे विशिष्ट उंचीपाशी विशिष्ट रुंदी असायला हवी. उदा. 18.36 से.मि. उंची असताना पाकळीची रुंदी 3.1 सें.मि. असायला हवी. किंवा 34.04 उंची असताना 5.43 सें.मि. रुंदी असायला हवी.
 • या सर्व पाकळ्या एकमेकांना अशा जोडा की शू्न्य रुंदी असलेली टोके एकत्र येतील आणि सर्वात रुंदअसलेला भाग सर्वात वर असेल.
 • अशा रीतीने तयार झालेला आरसा शेजारील छायाचित्रात दाखवला आहे. तुम्ही त्याचा स्टँड तयार केला नाही तरी चालेल. कारण एका तासात सूर्य स्वतःचे स्थान फार बदलत नाही. या वेळेत अन्न पदार्थ शिजवून तयार होतात.

आरशाची वैशिष्ट्ये

 • या पाकळ्यांची मापे अशी आहेत की ज्या जोडल्याने सपाट पृष्ठभागाचा वापर करून परवलयाकृती (paraboloid) त्रिमित आकार तयार होईल. या आकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यावर समोरून पडणारे सूर्य किरण एकत्र होऊन त्याच्या केंद्रस्थानी येतात. या केंद्रावर आपण आपले शिजवण्याचे पदार्थ ठेवायचे आहेत. एकत्रित किरणांमधे असलेली ऊर्जा आपले पदार्थ लौकर शिजवते.
 • मोठ्या आकाराचे आरसे वापरले तर मोठ्या प्रमाणात अन्न शिजवता येईल.
 • हे आरसे शेतावर, शाळांत खिचडी शिजवण्यासाठी , विविध शिबिरांमधे वापरता येतील. इंधनाची बचत होण्यासाठी ते फार उपयुक्त ठरेल.
 • कोणता पृष्ठभाग वापरून पाकळ्या बनवल्या आहेत त्यावर आरशाचा दणकटपणा, वजन व किंमत अवलंबून आहे.
 • प्रत्येक पाकळी बनवण्यासाठी पुढील मोजमापे बिनचूक वापरणे उपयुक्त व गरजेचे ठरेल.

अंतर्गोल आरशाबाबत तुम्हाला कोणतीही शंका असल्यास
freebirdEmail.png
या ठिकाणी संपर्क साधा.


अनुक्रमणिका

Author: प्रसाद मेहेंदळे

Created: 2017-11-15 Wed 16:31