शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
नवे जग नवा भारत
गेली कित्येक वर्षे गल्ली पासून दिल्ली पर्यंत हजारो कोटी रुपयांची कामे झाल्याचा आकडेबाज टाहो फोडला जातोच आहे. पण सामान्य माणसाला आलेले वैफल्य अजूनही तसेच आहे. याचे रहस्य आहे आपल्याला रोज दिल्या जाणाऱ्या राजकीय शिक्षणात. प्रचंड आर्थिक आकडे म्हणजेच प्रगती आणि विकास असा आपला समज करून दिला जात आहे. गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या आपणा सर्वांनी जाणून घ्यावे असे हे संकल्पचित्र.
या लेखात मांडलेले विचार “Fourth World” या M.P. Parameswaran यांच्या पुस्तकातले आहेत. चंगळ करणारे पहिले जग, साऱ्या गोष्टी सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवून निर्धास्त होऊ इच्छिणारे दुसरे जग आणि गरिबी, पददलन, कंंगाली यांनी पछाडलेले-(विकसनशील किंवा अविकसित म्हणून समजले जाणारे) गोंधळलेले तिसरे जग आहे. डॉ. परमेश्वरन् खऱ्या अर्थाने सुखी होणाऱ्या चौथ्या जगाची संकल्पना मांडतात. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणे शक्य आहे. केवळ आर्थिक उत्पन्न हा सुखाचा आणि समाजाच्या विकासाचा मापदंड होऊच शकत नाही. चौथ्या जगात विकासाची मानके बदललेली असतील. हे कसे साध्य होईल याचा विचारही या लेखमालेत होणार आहे. पण त्याआधी काही मुख्य संकल्पना स्पष्ट करणे गरजेचे ठरेल.
- गरज आणि हाव यात फरक करणेः गांधीजींचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. “This world has enough to satisfy everyone’s need, but not even one man’s greed.” हे जग, जगातल्या प्रत्येकाची गरज भागवू शकेल पण फक्त एका माणसाची हाव भागवू शकणार नाही.
- चंगळवादी जग सांगते की गरजा अमर्याद आहेत. किंबहुना चंगळवादी जग ‘नव्या गरजांचेच उत्पादन ‘ करत राहते. चंगळवादी जगात हाव अस्तित्वात नाही ती यामुळे.
- ज्या जगाने आपली सर्व आयुष्ये सरकारच्या स्वाधीन केली आहेत, त्या जगाला असे वाटते की आज वाटणारी हाव उद्या गरज बनते. त्यामुळे गरज आणि हाव यात हे जग फरक करू इच्छित नाही.
- तिसरे जग गोंधळलेले आहे. या जगातल्या नागरिकांची त्यामुळे ओढाताण होणे साहजिक आहे. गरज आणि हाव यातला फरक करण्याची क्षमता त्यांच्यात नाही.
- चौथे जग गरज आणि हाव यातील फरक ओळखू शकते. त्यासाठीची कसोटी या जगाला माहिती आहे. ती कसोटी आहे उत्पादनांचे कल्याणमूल्य (welfare value) आणि चिरस्थायी अस्तित्व (sustainability) .
- उत्पादनांचे कल्याणमूल्यः विविध उत्पादने तयार होतात ती स्वतःचे एक उपयोग मूल्य घेऊनच. पण हा उपयोग मानवासाठी कल्याणप्रद आहे की नाही याचे एक “कल्याण मूल्य” असते. (राष्ट्रीय उत्पन्नात या वस्तूंचा वाटा फार मोठा असतो तरीही) शस्त्रे, मादक पेये, अंमली पदार्थ यांचे “कल्याण मूल्य” ऋण (विघातक) समजले पाहिजे . अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवणाऱ्या अनेक उत्पादनांचे कल्याणमूल्य धन (विधायक) समजले पाहिजे. धन कल्याणमूल्य असलेल्या इतरही अनेक वस्तू सापडतील. काही वस्तूंना कल्याणमूल्यच नसते. त्या अनेकदा बिन जरुरीच्या असतात. काही अशाही वस्तू असतात की ज्यांचे कल्याणमूल्य बदलते. गरज आणि हाव यात फरक करताना वस्तू किंवा सेवेचे कल्याणमूल्य महत्वाचे मानले पाहिजे.
- गरजा सुद्धा दोन प्रकारच्या आहेत.
- अन्न वस्त्र निवारा या मूलभूत भौतिक गरजा.
- या भौतिक गरजांशिवाय “अध्यात्मिक” गरजाही आहेत.
- अध्यात्मिक गरजांत एक महत्वाची गरज म्हणजे आर्थिक आणि शारीरिक सुरक्षितता- स्वतःची आणि आपल्या मुलाबाळांची.
- या शिवाय स्वाभिमान, समाज मान्यता, प्रेम मिळवणे व देणे ही अध्यात्मिक गरजांची काही उदाहरणे आहेत.
- समाजातला सहभागः माणसाला सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावेसे वाटते. या सहभागात हक्कांबरोबरच कर्तव्यांचाही समावेश होतो.
- जीवनाची गुणवत्ताः ही ठरवण्यासाठी दरडोई उत्पनाचाच केवळ विचार करणे हा अविचार होईल. निरोगी दीर्घायुष्य हे मानक मृत्यूशी लढण्यातील यश मोजण्यास उपयुक्त ठरेल. केरळ आणि श्रीलंका येथील उदाहरणांवरून , दीर्घायुष्य आणि शिक्षण या मानकांशिवाय दरडोई उत्पन्नाचा स्वतंत्र विचार करणे योग्य ठरते. (मानके एकमेकांवर कमित कमी अवलंबून असावी लागतात. वर उल्लेख केलेल्या उदाहरणांमधे दीर्घायुष्य आणि शिक्षण यांचा दरडोई उत्पन्नाशी थेट संबंध जोडता आलेला नाही.) जीवनाची गुणवत्ता ठरवताना पुढील गोष्टींचा विचार व्हायला हवा.
- भौतिक गुणवत्ताः
- दीर्घायुष्य
- निरोगी जीवन
- एकटेपणापासून मुक्ती आणि स्वतःसाठी मोकळा वेळ मिळणे
- विविध गुणवत्तांचॆ चिरस्थायी स्वरूप ( sustainable)
- अध्यात्मिक गुणवत्ताः
- गुन्हेगारी किंवा तत्सम अवांछित घटनांचा अभाव
- उच्च दर्जाचे शिक्षण
- वाढलेली वाचनाची सवय
- कला आणि क्रीडा यात वाढता सहभाग
- आर्थिक उपक्रमांत वाढता सहभाग
- राजकीय उपक्रमांत वाढता सहभाग
- भौतिक गुणवत्ताः
- विकासाच्या नव्या दिशाः
- नव्या जगात, आताच्या विकसनशील व अविकसित देशातील उत्पादन दर वाढेल. तर आताच्या विकसित देशांतील उत्पादन दर कमी होईल (त्यामुळे या देशातील व्यक्तींना मोकळा वेळ अधिक मिळेल) .
- नव्या जगात लोकसंख्या स्थिर होईल.
- शहरीकरणाचा वेग कमी होईल.
- वरील प्रकारचा विकास सतत होत गेला तर एक दिवस असा येईल की कोणत्याही गोष्टीचे रूपांतर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पादक गोष्टीत करता येईल आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यापासून मिळेल.
या पुढील लेखात उरलेल्या मानकांचा विचार येणार आहे. ती आहेत- समता, सुरक्षा, चिरस्थायी विकास, उत्पादनाची साधने आणि स्वयंपूर्णता.