UP | HOME

माझे एक भाषण


मूर्ती फोडा

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या MIT इंजिनिअरिंग महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक पदावरून विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद….

प्रिय मित्र,

वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या तुमच्या सारख्या उत्साही आणि विचारी मित्र मैत्रिणींशी बोलायला मिळावं म्हणून तर मी इथे आलो आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी अशाच तऱ्हेच्या वाद वक्तृत्व स्पर्धांना मी हजेरी लावली होती. त्यातल्या काही मी जिंकल्या काही मी हरलो. जिथे हरलो, तिथे परीक्षकच कसे चुकीचे होते याची चर्चा त्यावेळी मी अहमहमिकेनी केली . जेव्हा जिंकलो,तेव्हा केवळ माझं श्रेष्ठत्वच त्यामुळे सिद्ध झालं असंच मलाही वाटलं. पण एक नक्की. एखाद दुसरी स्पर्धा वगळली तर तिथे परीक्षक कोण होते, त्यांची नावं देखील मला आठवत नाहीत. मात्र स्पर्धा चालू नसताना आसपास केलेली भटकंती, नव्या मित्रांबरोबर केलेल्या चर्चा, खेळ आणि वाद यामुळे माझ्या मतांचे घासले गेलेले कंगोरे, विज्ञान, राजकारण, साहित्य आणि तत्वज्ञान अशा कोणत्याही विषयाचे धुंडाळलेले कानेकोपरे मला आठवतात. मी आज परीक्षकाच्या वेषात आलो आहे. त्यामुळे संध्याकाळी तुमच्या बरोबर अशा गप्पा मारता येणार नाहीत मला. म्हणून शिंग मोडून वासरात शिरण्याचा हा प्रयत्न मी या लिखित संवादापुरताच मर्यादित ठेवला आहे.

जर्मन तत्वज्ञ ग्योथ यांनी वापरलेले एक रूपक मला आठवतं. दैनंदिन जीवनात जगणारे आपण सारे रहदारीत पळणाऱ्या वाहनांप्रमाणे आपापल्या गंतव्य स्थानी पोहोचतच असतो. यावेळी या वाहनांमधे स्पर्धा असत नाही. एक प्रवाह मात्र असतो. आयुष्यातल्या अशा रहदारीत जागोजागी लाल सिग्नल आहे हे माहीत असूनही अनेक मुलं मुली दुसऱ्या वाहनांच्या पुढे जाण्याचा आटापिटा करतात हे चित्र रहदारीत आणि दैनंदिन जीवनातही मला दिसतं. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण तणाव निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करायला हवी असं डॉ. अभय बंग सतत सांगताहेत. आपली जीवनशैली अधिकाधिक साधी करणे, हा त्यावरचा उपाय मला शंभर टक्के मान्य आहे. या साठी तुम्ही आत्ता पासूनच प्रयत्न करायला हवेत. पण यामुळेही प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. कारण मी शर्यतीत न रहाता, केवळ रहदारीत राहिलो, तरी माझे गंतव्य स्थान नक्की कोणते, हा खरा प्रश्न आहे. तुमच्या माझ्या या ध्येयाबद्दल मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो.

तुम्ही जे काही जिथे कुठे शिकत आहात, त्या शिक्षण संस्थांचे ध्येय तुम्हाला भरपूर रोजगार मिळण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण देणे असे आहे. पण असे ध्येय फारतर एखाद्या सरकारचे असू शकते. कारण निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केल्याची आकडेवारी त्यांना नंतर जाहीर करायची आहे. शक्यतो निर्यात होऊ शकेल (त्यातही अमेरिकेत) आणि नाहीच जमले तर याच देशात एखाद्या बहुराष्ट्रीय कारखान्यात खपेल असे व्यक्तींचे उत्पादन दरवर्षी करीत रहाणे हे या व्यवस्थेचे उद्दिष्ट होत आहे. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवणे हेच जर तुमचे जीवितध्येय असेल तर सध्याच्या विकृत शिक्षणपद्धतीने तुमच्यावर मिळवलेला हा विजय म्हणावा लागेल. तुमच्या सभोवतीचे जग अधिक सुंदर करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त बनवणे हा तुमच्या शिक्षणाचा हेतू असायला नको का ? स्वतंत्र आणि निर्भय होण्याचे शिक्षण आजची कोणतीच संस्था तुम्हाला देऊ शकेल असं मला वाटत नाही. ते तुमचे तुम्हालाच घ्यावे लागेल. जागतिक उदारीकरण आणि ग्लोबल व्हिलेज चे कर्णकर्कश डंके याच्या जोडीला वाजवले की माझ्यासारख्याचा आवाज तुम्हाला ऐकूच येणार नाही अशी या व्यवस्थेची खात्री आहे. म्हणूनच अजिबात जोरात न ओरडता, तुमच्या कानात कुजबुजण्याचे (व्हिस्परिंग कँपेन) मी ठरवले आहे.

शिक्षण पोट भरण्यासाठी आहे आणि ते भरले कधी हे समजण्यासाठी सुद्धा आहे. नाहीतर टागोरांच्या गोष्टीतल्या परीस शोधण्यासाठी कमरेला लोखंडी साखळी बांधून धावणाऱ्या माणसाप्रमाणे तुमची गत होईल. शिक्षण समृद्धी आणि सुरक्षितता मिळण्यासाठी आहे हे खरेच आहे. पण त्याच्या बदल्यात आपण आपले स्वातंत्र्य विकता कामा नये. अतिविकसित तंत्रज्ञानामागे धावणाऱ्या मुलांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कारण तुम्ही तुमच्या शिक्षणाचा मूळ हेतू विसरावा याची काळजी जगातल्या सर्व मोठ्या (म्हणजे आकाराने आणि ताकदीने) संस्था घेत आहेत, घेणार आहेत. मी लहान सहान संस्थांबद्दल बोलत नाहीये. ज्या संस्थांबद्दल बोलतोय् त्या खरोखरच राक्षसी आहेत. त्यात जगातली सर्व सरकारे येतात. बहुराष्ट्रीय कंपन्या, सार्वजनिक आणि खाजगी प्रसार माध्यमे येतात, आणि वरवर निराळे रंग पांघरून आत एकच कुटिल हेतू बाळगणारे सर्व राजकीय पक्षही येतात. शिक्षणावर यांचा सर्वात जास्त डोळा आहे. कारण या कारखान्यात एकाच छापाचे गणपती बनत रहाण्यामुळे त्यांची राजकीय गणिते अबाधित रहातील.

तुम्ही एकाच छापाचे बनू नये म्हणून काय करता येईल तेही सांगतो. स्वतःच्या शैक्षणिक विषयांवर मर्यादा घालून घेऊ नका. इंजिनिअर असाल तर जमेल तेव्हा होमिओपॅथीचा अभ्यास करा. असे वर्ग अनेक ठिकाणी चालवले जातात. ते खर्चिकही नसतात. चित्रकार असाल तर संगणकावर प्रोग्रामिंग करायला शिका. कवि असाल तर इंटरनेटवर वेबसाइट बनवायला शिका. खरं तर तुम्ही कोणीही असाल तरी तुम्हाला जे जे वाटते ते एकलव्य वृत्तीने शिकत रहा. मानवी मेंदूला काहीही अशक्य नाही. आणि महत्वाचे म्हणजे ज्यांना ही संधी कोणत्याही कारणामुळे मिळत नसेल तर त्यांना ती तुम्ही मिळवून द्या. या मुळे अशी कोणती क्रांती होणार आहे म्हणता ? या मुळे क्रांतीच्या संकल्पनेत क्रांती होईल. विचार करण्याचे आणि मग त्याचा उच्चार आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य त्यामुळे हळू हळू पसरायला लागेल. मानवी बुद्धिमत्तेला एकाच कप्प्यात कोंबण्याचा आजच्या शिक्षणाचा परिणाम त्यामुळे ढासळायला लागेल. अनेक पैलू असणारी व्यक्तित्वेच जागतिकीकरणाच्या हाकाटीला तोंड देऊ शकतील. हे करणे गरजेचे आहे. कारण केवळ आहेरे गटातल्या राक्षसी संस्थांचेच जागतिकीकरण हे एक रूप आहे. आणखी एक गोष्ट. हे शिक्षण आमरण चालू ठेवायचे आहे. युद्ध लांब पल्ल्याचे आहे. ते कित्येक पिढ्या खाईल.

तुम्ही तुमच्या शिक्षणावर खूपच खर्च केला आहे. त्यामुळे तो लौकरात लौकर भरून यावा यासाठी बहुराष्ट्रीय कंपनीतली नोकरी ही तुम्हाला गरजेची वाटत असणार. हा दोष तुमचा नाही. तुम्हाला दिलेल्या शिक्षणाचा आहे. तीन ते चार वर्षे श्रम, वेळ आणि धन खर्च करून तुम्ही जे काही शिकलात त्यापैकी किमान एका कोणत्यातरी विषयात गोडी निर्माण करण्यातही हे शिक्षण अयशस्वी ठरते असा अनेक विद्यार्थ्यांबद्दलचा माझा अनुभव आहे. आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करणारे हे शिक्षण, मग इंजिनियरला कारकून व कारकूनाला हमाल बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची काठी आधारासाठी घ्यायला तुम्हाला भाग पाडते. म्हणून पहिल्यांदा मी उल्लेख केल्या प्रमाणे मार्कांच्या शर्यतीतून बाहेर पडा आणि ज्ञानाच्या रस्त्यावर रहदारीत चालत रहा. Jack of all trades and master of atleast one. हे तुमच्या शिक्षणशैलीचं बोधवाक्य बनू द्या.

तुमच्या तुम्हीच घालून घेतलेल्या गैरसमजुतींच्या बेड्या तोडून टाका. सरकार सर्वशक्तिमान असते. प्रत्येक गोष्ट विकता येते, विकत घेता येते, विकावी लागते. मुलींनी मारामारी करू नये. जगात कुठेतरी महासत्ता असते, आणि महासत्ता होणं हेच आपलं ध्येय असायला हवं. मुलग्यांनी स्वयंपाक करायचा नसतो, इराणनं अणुबॉंब बनवता कामा नये. अशी गैरसमजुतींची अनेक उदाहरणं आहेत. हे असं घडतं तेव्हा दुसरंच कोणीतरी आपल्या तोंडून बोलत असतं. म्हणूनच आमचा विकास आणि प्रगतीच्या व्याख्या आम्हीच केल्या पाहिजेत. बहुतेक वेळा या व्याख्या कोणत्या तरी जागतिक अर्थसंस्थेच्या साच्यात आणि ढाच्यात बसवण्यासाठी केलेल्या असतात, म्हणजे मग कोणता तरी प्रश्न सोडवण्यासाठी हजारो कोटी रुपये कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. आमचा प्रश्न आमच्या पद्धतीने आणि आम्हीच सोडवू आणि पेपर तपासण्यासाठी तुमच्याकडे मुळीच देणार नाही. ही आमची भूमिका असायला हवी. कर्ज देताना सावकार घरातल्या तरण्या मुलीवर डोळा ठेवून असतो हे हिंदी सिनेमातल्या गोष्टीतही दाखवलेले नसते काय ?

म्हणूनच आम्हाला कृतीत उतरणारी बंडखोरी हवी आहे, पण तिला विचारांचे अधिष्ठान असायला हवे. मग आम्हाला मूर्ती फोडाव्या लागतील. विचारांच्या, इतिहासाच्या, व्यक्तिपूजेच्या आणि समज गैरसमजांच्या सुद्धा. शंभर वर्षे आधी कवि केशवसुत म्हणून गेलेः

मूर्ती फोडा धावा धावा फोडा मूर्ती

आतील संपत्ती फस्त करा

व्यर्थ पूजा द्रव्ये त्यांस वाहूनीया

नाके घासूनिया काय लभ्य ?

आम्ही डोंगरीचे द्वाड आडदांड

आम्हाला ते चाड संपत्तीची

कोडे घालूनीया बसली कैदाशीण

उकलिल्या विण खाईल ती

तिच्या खळीमध्ये नाही आम्हा जाणे

म्हणून करणे खटाटोप

याच्यातल्या कोणत्याही आणि सर्व विचारांचा प्रतिवाद करण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. या विषयावर एकमेकांशी वाद-संवाद चालू करा. तोच माझा हेतू आहे.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-13 Mon 10:39