शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
अल्पतम उपभोक्ता
1849 साली हेन्री डेव्हिड थोरो यांनी सविनय कायदेभंगाची संकल्पना प्रथम मांडली. त्याचा अत्यंत यशस्वी वापर महात्मा गांधींनी आपल्या कारकिर्दीत केला. थोरो यांनी मांडलेल्या सविनय कायदेभंगाचा “लोकांनी सरकारला स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अधिकार गाजवू देऊ नये” असा अर्थ थोडक्यात सांगता येतो..
अधुनिक जगातील बँका, बड्या कंपन्या आणि ” फायद्यासाठी वाट्टेल ते ” हे ध्येय असणाऱ्या इतरांना हा अधिकार गाजवायला मिळू नये या साठी व्यापार व्यवहार क्षेत्रातल्या या सविनय कायदे भंगाची जरूरी आहे. पण हे सारे प्रत्यक्षात कसे आणायचे ?
- खरेदी कराल ती रोख रक्कम देऊनच. गरजेपोटी खरेदी करा. पण रोख रक्कम देऊनच. क्रेडिट कार्ड कंपन्या गरज नसताना केलेल्या आपल्या खरेदीवर मोठ्या होतात आणि आपण कर्जबाजारी !
- कंपन्यांचे लोगो असलेले कपडे वापरू नका. फायद्यामागे धावणाऱ्या कंपन्यांची चिन्हे आपले कपडे , टोपी यासारख्या ठिकाणी लावून त्यांची चालती बोलती जाहिरात बनू नका.
- विशिष्ट कंपनीच्या वस्तूंशी निष्ठा नको. साधारणपणे सगळ्या वस्तू सारख्याच प्रकारे बनवण्यात येतात.
- चालू फॅशनच्या आहारी जाऊ नका. ही फॅशन लौकरच कालबाह्य होते आणि तुमचे पैसे, वेळ आणि श्रम वाया जातात.
- एकमेकांच्या वस्तू वापरा. नव्याने वस्तू घेण्याची बहुतेकदा गरज नसते.
- वस्तूंची अदलाबदल करा. आपल्याकडे अनेक वस्तू पडून असतात. त्यांचा इतरांना उपयोग होऊ शकतो. हीच गोष्टी इतरांकडे पडून राहिलेल्या वस्तूंबद्दल.
- जिव्हाळ्याच्या लोकांना भेटवस्तू देऊ नका. त्या ऐवजी त्यांच्या बरोबर वेळ मजेत घालवा. त्यांचे एखादे काम करा.
- जाहिरातींकडे लक्ष देऊ नका. विक्रेत्याकडे दुर्लक्ष करा. टि.व्ही.वर जाहिरात लागताच चॅनेल बदला. पण खरे तर टी.व्ही पहाणेच बंद करा.
- कोणतेही स्वयंचालित वाहन वापरू नका. चाला, पळा किंवा सायकल सारखे वाहन वापरा. त्यामुळे वेळ वाचेल, हवा शुद्ध राहील आणि शरीराला व्यायामही मिळेल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे-बस या सारखी सार्वजनिक वाहने वापरा.
- गरजेची असेल तेवढ्याच छोट्या जागेत रहा. परवडेल इतक्या मोठ्या जागेत नको. त्यामुळे तुम्ही वस्तूही कमी साचवाल आणि वीज, पाणी या सारख्या गोष्टींचीही बचत होईल.
- बिघडलेल्या वस्तू दुरुस्त करून वापरा. शक्यतो नव्या विकत घेऊ नका.
- अधिकाधिक स्वंयंपूर्ण व्हा. स्वतःसाठी भाजी लावा, फर्निचर स्वतः बनवा, स्वतःचे कपडे स्वतः शिवा. स्वयं-पाक करा.
- कमी वस्तूंची इच्छा बाळगा. तुमच्या गरजा वाढवण्साठी जाहिरातपटू, विक्रेते आणि बड्या कंपन्या सर्व गोष्टी करतातच. पण अधिक श्रीमंत होऊन रहाण्यासाठी , समाधानी रहाण्यासाठी आणि स्वतंत्र रहाण्यासाठी कमी वस्तूंची इच्छा असणे हेच फक्त गरजेचे आहे.
(९ मे २०१५)