शब्दशक्ती
शब्दे वाटू धन जनलोकां…


कुत्रा… एक फिरवणे

त्या बाई अनेकदा आपल्या कुत्र्याला फिरवायला सकाळी बाहेर पडतात. कुत्रा चांगला थोराड आहे. डॉबरमन जातीचा. त्याच्या गळ्यात वरून मऊ वाटणारी पण चांगली दणकट असलेली दोरी असते. तिला लीश म्हणतात. या दोरीला लीश म्हणणे ही अमेरिकन पद्धत असावी असा मला संशय आहे. कारण फक्त अमेरिकन पद्धतीचीच नक्कल करण्याचा भारतीयांचा प्रघात आहे. साखळीची पद्धत आता गेली. साखळी हे कदाचित मालकाला कुत्र्याच्या गुलामगिरीचं चिन्ह वाटत असावं. कुत्र्याला काय वाटतं हे मला अजून कळलेलं नाही. बाई कुत्र्यापेक्षा थोड्या उंच आहेत. रस्त्यानं जाताना कुत्र्याला वाटणारं विविध गोष्टींचं आकर्षण आणि त्याप्रमाणे तिकडे ओढ घेणारे त्याचे पाय या मुळे कुत्राच बाईंना फिरायला नेतो आहे असा आपला समज होऊ शकतो.

कुत्रा आणि त्यांना फिरायला नेणारा त्याचे मालक-मालकीण यांचं थोडं निरीक्षण मी केलं आहे. कुत्रा आणि मालक यांच्या चेहऱ्यावर अनेकदा सारखेच भाव असतात असा माझा अनुभव आहे. कोणाचा भाव कोणाच्या चेहऱ्यावर उमटतो या विषयी मी काहीही अंदाज बांधत नाही. कुत्रा मालकाला ओढतो तेव्हा मालकाचा अपमान होतो आणि मालक कुत्र्याला स्वतःच्या इच्छेनुसार वेगळ्याच दिशेला खेचतो. थोड्याशा झगड्यानंतर साधारणपणे मालकाचाच विजय होतो. मालक आणि कुत्र्यामधले हे नाते वर्णन करायला फार किचकट आहे. फार तर सरकार आणि जनता यांच्यातले नाते त्याला समांतर आहे असं म्हणता येतं (काय कशाला समांतर हे वाचकांनीच ठरवावं).

कुत्रा माणसाचा मित्र आहे असं म्हटलं जातं. तो अनेकदा मालकाचा मित्र असतो हे आपण पहातो. मालक कुत्र्याचा मित्र असतो का असा प्रश्न मला नेहमीच पडतो. कारण मैत्री करणं हे सोपं काम नाही. कुत्र्याला ते सहज जमतं. मीपणाचा त्याग करण्यात कुत्रा यशस्वी झालेला मला दिसतो. माणसा सोबतचं सहजीवन साजरं करण्यात कुत्रा यशस्वी झाला आहे. देवाण घेवाण (give and take) सोसूनही स्वतःचं आयुष्य नीटपणे जगण्याची शैली कुत्र्यानं आत्मसात केलेली आहे. शहरांतल्या सदनिकांमधे स्वतःला पाळवून घेणाऱ्या कुत्र्यांची मात्र मला कीव येते. पण त्यांना हा पर्याय कोणी देतं का ? जातिवंत असणे ही बाजारानं ठरवलेली गुणवत्ता आहे, आणि बाजारात केवळ खरेदी-विक्री होते, नाही का ? मग या पर्यायाचा प्रश्न येतोच कुठं ?

शहरात जातिवंत कुत्र्यांनाच सहसा घरंदाज बनावं लागतं. उच्च जातीचे हे कुत्रे ऐषआराम आणि सुरक्षितता यासाठी स्वातंत्र्याचा त्याग करतात. भटके आणि गावठी कुत्रे पाळणं साधारणपणे प्रतिष्ठेचं मानलं जात नाही. याला अपवाद असणारी दोन उदाहरणं मला माहिती आहेत. माझ्या माहितीच्या एक बाई प्राधान्यानं गावठी कुत्र्यांसाठी होस्टेल चालवतात. दुसरं उदाहरण जास्त सार्वत्रिक आहे. लहान मुलांना रस्त्यावर खेळणारी गावठी कुत्र्यांची पिल्लं सुद्धा पाळावीत असं वाटतं. या लहान मुलांना प्रतिष्ठेचा स्पर्श झाला नसल्यामुळेच हे घडतं. लहान मुलांनी कुत्र्यांची शेपूट, कान ओढून त्यांना त्रास दिल्याचं आपण अनेकदा पाहतो. पण या गोष्टी निरागसपणामुळे घडण्याची शक्यता जास्त असते. गावठी पिल्लांशी मैत्री करणाऱ्या लहान मुलांची सामाजिक बुद्धिमत्ता (social intelligence) अधिक चांगली असते असं आढळून आलं आहे.

डॉबरमन कुत्रा फिरवणाऱ्या त्या बाई दिसल्या की मला बहिणाबाई चौधरींच्या चार ओळी आठवतात.

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर
मन मोकाट मोकाट त्याची कशी सांगू मात
आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात…

शहरात उभ्या पिकात घुसणारी गुरं ढोरं कुठून दिसणार ? पण कुत्रा फिरायला नेणाऱ्या मालकांना मनाच्या ओढाळपणाचं प्रात्यक्षिक देणारी ही श्वान मंडळी त्यांना एक प्रकारचा साक्षात्कारच घडवत नाहीत का ? साक्षात्कारावरून आठवण झाली… पातंजलयोगसूत्रात योगसाधनेच्या आठ पायऱ्यांचं वर्णन आहे. त्यातल्या महत्वाच्या (आणि शेवटच्या) तीन पायऱ्या आहेत- धारणा, ध्यान आणि समाधी. या तीन पायऱ्या मिळून जे त्रिक तयार होतं त्याला पातंजलि ऋषी संयम म्हणतात. धारणा म्हणजे मनात निश्चयपूर्वक, एक विशिष्ट विषय धरून ठेवणं, उदा. कुत्रा फिरायला न्यायचाच. ध्यान म्हणजे तो कुत्रा फिरवण्याची प्रक्रिया. हा कुत्रा ओढाळपणा करतोच. मग त्याला ताब्यात ठेवायचं. त्यात यश मिळालं की जे समाधान-शांतता मिळते ती समाधी. पण ही स्थिती फार काळ टिकत नाही. कारण कुत्रा ओढाळपणा करतोच. हे चक्र सतत चालू ठेवायचं.

कुत्रा माणसाचा मित्र आहे हे खरंच आहे. पण संयम शिकवणारा गुरु देखील आहे. नाही का ?


तुम्हाला या लेखना बद्दल काय वाटतं हे तुम्ही मला जरूर कळवा. त्यासाठी इमेल ने इथे संपर्क साधाः
editormail.png


मुख्यपान

Author: सम्यक

Created: 2022-01-11 Tue 07:42