UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


कल्पना नदीच्या काठी

‘ बाळू मोठा झोपाळू ‘ ही ओळ आपल्या बाळूला अजिबात लागू नव्हती. कारण बाळूला इंटरनेटचा फार नाद होता. कामाहून घरी परत आल्यावरही रात्री जागून तो इंटरनेट वर बराच वेळ घालवी. त्यामुळे तो स्वतःला जागरूक नेटिझन म्हणवून घेत असे. एकदा त्याने इंटरनेटवर एक जाहिरात वाचली.

१००० रुपयात एक किलोमिटर नदी विकणे आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

बाळूकडे २५०० रुपये होते. तेव्हा अडीच किलोमिटर नदी विकत घेण्याच्या इराद्याने त्याने दिलेल्या लिंकवर क्लिक केले. तिथे एकच किलोमिटर नदी उपलब्ध होती. पण उरलेल्या १५०० रुपयांत बाळूने नदीकाठीचे लहानसे घरही विकत घेऊन टाकले !

नदीकाठी आपले एक घर असावे अशी बाळूची फार दिवसांची इच्छा होती. आता केवळ घरच नव्हे तर नदीही त्याची स्वतःची झाली होती. आपल्या कल्पनेतली ही नदी व घर असे विकत घेतल्यावर त्या नदीचे नाव बाळूने ” कल्पना नदी ” असे ठेवले. रोज सायंकाळी घरी आल्यावर बाळू इंटरनेटवरून आपल्या या कल्पना नदीच्या काठी विहार करीत असे.

कल्पना नदी फार सुंदर होती. कोणताही कारखाना आपले सांडपाणी नदीत सोडत नसे त्यामुळे कल्पनेचे पाणी स्फटिकस्वच्छ दिसे. स्फटिकस्वच्छ पाण्यात अनेक चमकदार मासे विहार करत. सोनेरी माशांची एक चपळ जोडीही तिथे फिरताना दिसायची. त्यांची नावे बाळूने सोनाजी आणि सोना अशी ठेवली होती. पाण्यात उतरून कधीकधी बाळू माशांशी पोहण्याची स्पर्धाही करायचा. एक मासा पोहण्यात जरा मंद होता. त्याच्याशी बाळू शर्यत जिंकत असे. नदीच्या दोन्ही काठांवर तजेलदार हिरवळ होती. पोहून झाल्यावर जेवून तो थोडावेळ हिरवळीवर लोळण घेई.

आंबा आणि चिक्कू ही दोन्ही फळे बाळूला आवडत. कल्पनेच्या काठावर त्याने लावलेल्या झाडांना एका बाजूला आंबे तर दुसऱ्या बाजूला चिक्कू येत. या झाडाला तो आंचिचे झाड म्हणे. आंब्याच्या फळात कोय नसायची. या आंब्याचे नाव बाळूने ‘ कोयना ‘ आंबा असे ठेवले होते. चिक्कूची बी लहान असल्यामुळे बाळूला खुपत नसे.

एक दिवस आंचिच्या झाडाखाली गळ घेऊन मासे पकडण्यासाठी बाळू बसला होता. गळाचा आकडा कल्पनेच्या पाण्यात बुडवून एक तास झाला तरी एकही मासा गळाला येईना. गळ काढून घेऊन बाळू घरी जायला निघणार तोच गळाला झटका बसला. पहातो तो काय, सोनाजीच गळाला लागला होता.

बाळूने घशातला आकडा काढताच सोनाजीने दोन्ही कल्ले जोडून नमस्कार केला आणि तो म्हणाला, ” तू मला खाऊ नकोस कारण मी विषारी मासा आहे. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंस तर माझ्यातले विष उतरून जाईल. नंतर तू मला खाऊ शकशील.”

” मग विचार तुझा प्रश्न.” अशी बाळूने आज्ञा दिली. तेव्हा सोनाजीने त्याचा प्रश्न विचारला –

” कल्पनेच्या काठावर तुझे सख्खे शेजारी कोण ते तू मला सांग. पण जर हे उत्तर तू मला देऊ शकला नाहीस तर माझे विष उतरणार नाही शिवाय मी पुन्हा पाण्यात निघून जाईन. “

बाळू प्रश्नांना अजिबात घाबरत नव्हता. घरी येऊन त्याने सर्व सर्च इंजिने कामाला लावली. त्याच्या माहितीतल्या सर्व फोरमवर त्याने हाच प्रश्न विचारला. त्याच्या दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले नाही. तो पुन्हा नदीकाठी गेला. तेव्हा सोनाजी मासा पाण्यात लुप्त झाला होता.

(८ जून २०१४)


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-13 Mon 12:33