UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


हात हवे मज असले सुंदर…

मला लांबच्या लांब हात आवडतात. कारण आमच्या घरी सध्या लाडवांचा डबा बऱ्याच उंच अशा फळीवर ठेवला आहे. म्हणून “हात पाहिजेत” अशी एक जाहीरात देण्याचा माझा विचार होता, पण नंतर मी तो बदलला कारण जाहिरात देऊनही तसे हात मिळतीलच अशी खात्री नव्हती. मग आपण डायरेक्ट देवालाच असे हात का मागू नयेत ? पण असं पहा की देवालाच जर हात मागायचे तर फक्त असे लांबच्या लांब हात कशाला मागायचे ?

खूप खूप लाडू तयार करणारे हातच मागावेत असं मला वाटलं. पण मग जेव्हा खूप लाडू तयार करायला मुळात खूप धान्य पिकवावं लागेल असं माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी मनातल्या मनात म्हटलं की आता मात्र खूपच विचार करून जे मागायचं ते मागितलं पाहिजे.

परमेश्वरा मला विलक्षण सुंदर हात हवेत. सुंदर हात म्हणजे सुंदर काम करणारे हात. कष्टाची बीजं पेरून येईल त्या पिकाला गोंजारणारे हात. त्या पिकावर ऐतखाऊपणे कोणी हल्ला केला तर त्यांच्यावर गोफण चालवणारे हात. कापणी मळणी करणारे हात. दळणारे हात, भाकरी तयार करणारे हात. आणि तोंडात घास भरवणारे हात.

मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ? मी देवाला पंख नाही मागितले, हात मागितले. हात इतर प्राण्यांना असतात का ? नाही . माणसालाच असतात. सुंदर हात मागून मी देवाकडे माणुसकीच नाही का मागितली ? माझ्या हातांनी घडवलेली प्रत्येक कृती माणुसकीनं भरलेली असेल. माझे हात संकटात सापडलेल्याला मदत करतील.

जे मायेचा घास भरवती चिमण्या ओठी

जे चुकलेल्या पांथस्थांना दीपच होती

हात अन्नपूर्णेचे असले….

श्रोतेहो, मला एक गोष्ट आठवते. एक होता शिल्पकार. त्यानी एका दगडातून मूर्ती घडवायला घेतली. प्रथम त्यानं हात कोरले. आणि आश्चर्य घडलं.. जर शिल्पकारानं कुठे चुकीचा हातोडा मारला, तर मूर्तीचे हात ती चूक आपणहून दुरुस्त करायचे. होता होता संपूर्ण मूर्ती तयार झाली. आणि मूर्तिकाराला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यानं स्वतःचीच मूर्ती तयार केली होती. स्वतःच स्वतःला घडवणारे अतिसुंदर हात मला हवेत.

हात म्हणजे हाताचा नुसता पंजा नव्हे. काम करायला पंजाला मागच्या संपूर्ण बाहूची गरज लागते. सहकार्य लागतं. असे सहकार्याचे तुमचे हातही मला हवेत.

कलाकारांचे आणि कामगारांचे हात तर मला हवेच आहेत. पण तेही हात मला हवेत की जे बंदूक चालवून या कलाकारांचं आणि कामगारांचं रक्षण करतात. जुलमी सत्ताधीशांविरुद्ध बाँब फेकणारे क्रांतिकारकांचे हात मला हवेत. दांडीयात्रेत मीठ उचलणारे हात मला हवेत. फक्त तिनशेवीस रायफली वापरून क्रांती करणाऱ्या माओच्या, लक्तरे पांघरलेल्या, मुक्तिसेनेचे हात मला हवेत.

लोकहो एक विचारू ? देवाजवळ सुंदर हात मागणारे हे माझे हात तरी कुठे कुरूप आहेत ? आईबाबांना नमस्कार करण्यासाठी ते न सांगता जुळतात. चुकले तर छडी खाण्यासाठी प्रामाणिकपणे पुढे येतात. स्वार्थासाठी ते धर्म, जात, तत्व यांचा ढोंगी प्रचार किंवा स्वीकार करत नाहीत.

देवाकडे मी खरं तर मी फक्त एकाच प्रकारचे हात मागणार आहे. ते हात विलक्षण सुंदर आहेत. त्या हातांनी मी कोणतंही काम चुटकीसरशी करू शकेन. मी चुकीचं काम करायला लागले तर ते हातच मला थांबवतील.

आदर्श शिक्षक होण्याचं माझं स्वप्न आहे. माझे विद्यार्थी हेच माझे हात. मी कलाकार विद्यार्थी घडवीन, कामगार विद्यार्थी घडवीन. सैनिक, शेतकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ माझे विद्यार्थी असतील. सुजाण नागरिक घडवण्यासाठी वाट दाखवणारे हात असतील माझे. माझे हात माझ्या विद्यार्थ्यांच्या गुणांचं कौतुक करून त्यांना शाबासकी देतील. चुकीबद्दल शिक्षा करतील. आणि व्यवहारच्या सीमेपर्यंत त्यांना सोडलं की निरोपादाखल हात हलवतील. देवा, असे हात मला दे…

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.

(१९८१ साली चारुता जोशी हिच्यासाठी लिहून दिलेले भाषण)


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-16 Thu 16:40