UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


मुक्त संगणक प्रणाली २

मागच्या लेखात आपण असं पाहिलं की मुक्त संगणक प्रणालीची खरी शक्ती, लेखकांनी मुक्त केलेल्या उगम कार्यक्रमात आहे.

उगम कार्यक्रम खुला असण्याचे फायदे

हा उगम कार्यक्रम आम्हाला समजत नाही त्यामुळे मुक्त प्रणालींचं आम्हाला महत्व का वाटावं, असं अनेकांचं म्हणणं असतं. हा उगम कार्यक्रम कोण समजून घेऊ शकतो ? याचं उत्तर असं आहे – लिहिता वाचता येणारं कोणीही !

मात्र त्यासाठी तो समजून घेण्याची इच्छा, वेळ आणि कष्टाची तयारी या गरजेच्या गोष्टी आहेत. समजा या तीनही गोष्टी तुमच्या कडे नसतील आणि यातलं आपल्याला काय समजणार, अशी भीती मनात असेल तर तुमचा असा मित्र/मैत्रिण गाठा की जी हे करू शकते. ती कदाचित इंजिनियर असेल, कॉंप्यूटर क्षेत्रातली जाणकार व्यक्ती असेल. विज्ञान क्षेत्रातील तज्ञ असेल. माझ्या माहितीत काही डॉक्टरही (रोग्यांना औषध देणारे) असे आहेत की जे यात रस घेऊन काम करतात.

उगम कार्यक्रम खुला करण्याच्या या अटी मुळे केवळ संगणकीय प्रणालीच मुक्त झाल्या आहेत असं नाही, तर त्या वापरल्यामुळे आपणही (खाजगीपणा जाण्याच्या) भीतीतून मुक्त होतो.

सा विद्या या विमुक्तये

मुक्त उगम कार्यक्रम अनेकांना मुक्त करतात. ही मुक्तता मिळालेल्यात प्रथम येतात संगणकशास्त्राचे विद्यार्थी. गल्लोगल्ली असलेल्या संगणकशास्त्राच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा दर्जा यथातथाच आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचं महत्वाचंं कारण म्हणजे चांगली प्रणाली कशी लिहायची असते हे त्या विद्यार्थ्यांना कधी पहायलाच मिळालेलं नाही. केवळ मुक्त प्रणालीच ही अडचण सोडवू शकते. खुले उगम कार्यक्रम पाहून, वाचून, समजून घेऊन हे विद्यार्थी जाणकार होऊ शकतात. आणि जाणकाराकडेच असते निर्मितीची शक्ती.

मुक्त प्रणाली, मूळ उगम कार्यक्रमात आपल्या गरजे नुसार बदल करण्याचं स्वातंत्र्यही देते. त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या गरजे प्रमाणे नव्याने प्रणाली विकसित करू शकतात.

अनेक पदव्या घेतल्यावरही काहीच निर्माण न करता येणारे आपल्या भारत देशात प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळेच ते बेकारीच्या भीतीच्या छायेत सतत वावरत असतात. या भीतीतून विद्याच त्यांना मुक्त करू शकते केवळ पदवी नव्हे. विद्या प्राप्त करून घेण्याची संधी मुक्त प्रणाली देत असते. “सा विद्या या विमुक्तये” या संस्कृत अवतरणाचा अर्थ तोच आहे.

उगम कार्यक्रम खुला केल्यामुळे आणखी एक फायदा होत असतो. या कार्यक्रमात थोडा फरक केल्यामुळे नव्या सोयी असणारी प्रणाली पटकन निर्माण करता येते. त्यामुळे नव्या प्रणाली मुळापासून लिहाव्या लागत नाहीत आणि वेळ वाचतो. मुक्त प्रणाली वापरल्यानं चाकाचा शोध आपल्याला पुन्हा पुन्हा लावावा लागत नाही. (“We don’t have to re-invent the wheel”).

शब्दे वाटू धन जन लोकां

मुक्त संगणक प्रणालीचं वैशिष्ट्य केवळ उगम कार्यक्रम खुला करणं इतकंच नाही. तर मूळ प्रणालीच्या बदललेल्या अनेक आवृत्ती लोकांना वितरितही करता येतात यात आहे.

संगणकशास्त्राच्या वर्गात कोणी एकानं लिहिलेल्या प्रणालीचा उगम कार्यक्रम, त्यानं सर्वांना वाटलाच पाहिजे असा नियम असायला हवा. त्यामुळे मुक्त प्रणालीचे फायदे विद्यार्थीदशेपासूनच सगळ्यांना कळतील. हे कॉपी करणं नाही का होणार ? हो होईल ! पण ते वाईट असेल असं नाही. ते सहकार्याची भावना वाढवेल आणि कमी वेळात नव्या सोयी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी प्रत्येक विद्यार्थ्याला देईल. शिवाय मूळ प्रणाली मधे छोटे छोटे बदल केलेल्या अऩेक प्रणाली निर्माण होतील.

आई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं.

आपण पिढ्यान् पिढ्या वेगवेगळे पदार्थ खात आलो. अगदी कोणती वनस्पती, भाजी म्हणून खाण्यायोग्य आहे- विषारी तर नाहीना, हे ठरवण्यासाठीही काही शतकांपूर्वी कोणीतरी धोका पत्करला होता. काहींनी एखादा पदार्थ अधिक चवदार बनवला, काहींनी मसाल्यांचा शोध लावला. आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया, माहिती त्यांनी आपल्या शेजाऱ्यांपासून दडवली नाही. ती मुक्त केली. म्हणून आपण आज पोषक, चवदार जेवण जेवू शकतो. मानव जातीचा भविष्यकाळ सुखदायी व्हावा म्हणून मुक्त प्रणाली ही भूमिका आज बजावत आहेत.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-15 Wed 15:23