UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


पटची भाषा

आपला खाजगी संवाद इतरांना कळू नये ही आपली नेहमीच इच्छा असते. त्यासाठी आपण कोणी राजा महाराजा किंवा सेनाधिकारी असण्याची गरज नाही. लहानपणी आपण यासाठी पट ची भाषा वापरत होतो. त्यापट लापट चापट पपट टपट मापट रपट असं भराभर बोलून आपल्या एका सवंगड्याला सांगून दुसऱ्याला चापट मारवत होतो. इंटरनेटचा विकास झाल्यावर ह्या पटच्या भाषेने निराळे रूप घेतले. त्याला एनक्रिप्शन असं म्हणतात.

खाजगीपणा जपण्यासाठी , आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी ही नवी पटची भाषा आपल्या मदतीला धावून येते. त्याच बरोबर लपून छपून पापकृत्य करण्यासाठी अतिरेकी, किंवा प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पुढारीही त्याचा वापर करू शकतात. अर्थातच ही भाषा केवळ पट हा शब्द प्रत्येक अक्षरानंतर वापरण्या इतकीच मर्यादित नाही. ही भाषा अधिक प्रभावी होण्यासाठी ती अधिक क्लिष्ट होणं गरजेचं आहे. म्हणूनच गणित आणि संगणकीय तंत्रज्ञान याचा वापर त्यासाठी अनिवार्य आहे.

समजा उत्सवचं ऊर्मीवर प्रेम आहे. (त्यांचं अजून लग्न झालेलं नाही !:)) . उत्सव ऊर्मीला पत्र पाठवू इच्छितो. आणि तुम्हाला ते पत्र वाचायला मिळू नये अशी त्या दोघांची अर्थातच इच्छा आहे. त्यांनी जर एकमेकांतला हा लिखित संवाद एनक्रिप्शनचा उपयोग करून चालू ठेवला तर हे नक्कीच शक्य आहे. त्यासाठी ही दोघे इमेल करताना पुढील प्रकारे काळजी घेतात…..

  • उत्सव स्वतःच्या संगणकाचा वापर करून एक “किल्ल्यांची जोडी ” तयार करतो. त्यातली सार्वजनिक किल्ली तो ऊर्मीला पाठवून देतो. खाजगी किल्ली स्वतःकडेच ठेवतो. ऊर्मीसुद्धा संगणक वापरू शकते. अशीच किल्ल्यांची जोडी ती तयार करते आणि स्वतःची सार्वजनिक किल्ली ती उत्सवला पाठवते. एकदा या किल्ल्या तयार झाल्या की मग पुन्हा पुन्हा त्या तयार कराव्या लागत नाहीत.
  • ऊर्मीच्या सार्वजनिक किल्लीचा वापर करून उत्सव आपला निरोप सांंकेतिक भाषेत रूपांतरित करतो (किंवा कुलुपबंद करतो). आणि तो निरोप ऊर्मीला पाठवून देतो.
  • ऊर्मी स्वतःच्या खाजगी किल्लीने हे कुलूप उघडते आणि तिला तो निरोप समजतो. याच पद्धतीने उत्सवच्या सार्वजनिक किल्लीचा वापर करून ती त्याला कुलूपबंद पत्र पाठवते. आणि ते कुलूप तो त्याच्या खाजगी किल्लीने उघडतो.
  • जोपर्यंत ऊर्मीची किंवा उत्सवची खाजगी किल्ली तुमच्यापाशी नाही तोवर तुम्हाला हे पत्र वाचता येत नाही.
  • दोघांच्या दोन्ही किल्ल्या म्हणजे प्रचंड मोठी संख्या असते. या संख्येचा आवाका साधारण ३८ आकडी संख्येपर्यंत जाऊ शकतो. केवळ संगणकालाच हे कुलूप उघडता आणि बंद करता येते. त्यासाठी साधारण २ सेकंद इतकाच वेळ लागतो. एकदा का या किल्ल्या तयार झाल्या की मग त्या पुन्हा पुन्हा वापरता येतात. किंवा गरज भासल्यास बदलताही येतात.

इंटरनेटने जोडलेल्या जगात या सांकेतिक भाषेला प्रचंड महत्व आलं आहे. या भाषेच्या नियंत्रणाचे कायदे करण्याची आवश्यकता जगात अनेक पुढारलेल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांंना वाटते. उद्याच्या जगाचे रूप ही सांकेतिक भाषा ठरवणार आहे.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-17 Fri 15:20