UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


आइन्स्टाइनचा विश्वधर्म

अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या cosmic religion या विषयावरील विचारांचे मी मराठीत केलेले हे स्वैर भाषांतर.

जेव्हा आपण वैचारिक किंवा अध्यात्मिक चळवळींबद्दल (आणि त्या कशा विकसित होतात त्याबद्दल) विचार करतो, त्यावेळी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ती म्हणजे माणूस जे काही करतो किंवा ज्याचा विचार करतो, त्याचा संबंध त्याच्या आंतरिक गरजांशी आणि वेदनांपासून सुटका मिळवणे या दोन गोष्टींशी असतो. निर्मिती आणि धडपड कितीही उदात्त कारणासाठी असली तरीही भावना आणि इच्छा या गोष्टीच माणसाची निर्मिती आणि धडपड या मागे असतात.

अशा कोणत्या भावना आणि गरजा आहेत ज्यांमुळे माणसाने श्रद्धा आणि धर्म निर्माण केले ? थोडासा विचार केला तरी हे कळेल की अशा विविध भावनांनी, धार्मिक विचार आणि धार्मिक अनुभवांना जन्म दिला.

यातली पहिली भावना म्हणजे भीती. अविकसित लोकांचा धर्म भीतीतून निर्माण होतो. ही भीती प्रामुख्याने खायला न मिळण्याची, हिंस्र श्वापदांची, आजारी पडण्याची किंवा मृत्यूची असते. अविकसित स्थितीत, विश्वातील विविध घटनांमागील कार्यकारण भावाची समज अत्यंत मर्यादित असते. त्यामुळे हा माणूस स्वतःच एक तत्व निर्माण करतो. त्या तत्वाच्या इच्छा आणि कृतींनी त्याचे स्वतःचे (भीतीदायक) अनुभव नियंत्रित होत असतात अशी कल्पना करतो. (म्हणून मग) या तत्वाची कृपा आपल्यावर असावी अशी इच्छा धरतो. मग त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या परंपरेला अनुसरून उपास तापास करतो. याला मी भीतीचा धर्म म्हणतो.

धर्मगुरूंमुळे असा (भीती) धर्म निर्माण होत नाही, पण हे धर्मगुरू अशा धर्माला स्थैर्य मात्र देतात. धर्मगुरूंची ही जमात त्यांच्या धर्माला मानणाऱ्या लोकांचे आणि (भीती)दैवताचे मध्यस्थ म्हणून काम पहाते. अशा मध्यस्थांची शक्ती फक्त धार्मिकच असते असे नाही. एखादा (मध्यस्थ असणारा) नेता, किंवा मध्यस्थांचा समुदाय, स्वतःभोवती वेगळ्याच मार्गाने शक्तिवलय निर्माण करतात. किंवा राजकीय नेत्यांशी संगनमत करतात.

धर्माच्या जडणघडणीचा दुसरा मार्ग म्हणजे लोकांच्या सामाजिक समजुती व भावना.

नवी पिढी निर्माण करणारे आई–वडील आणि समाजातील नेतावर्ग, पतनक्षम व मर्त्य असणारच. त्यामुळे पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडतील अशा मार्गदर्शक तत्वांची समाजाला गरज भासते. त्यामुळेच सामाजिक दैवताची निर्मिती होते. हे दैवत समाजाचे रक्षण करते, त्याच्यासाठी निर्णय घेते. चागले किंवा वाइट म्हणजे काय हे ठरवते. चांगल्या कामासाठी पाठ थोपटते आणि वाईट कामाबद्दल शिक्षाही करते. या दैवताचे मानवजातीवर (किंवा त्या जमातीवर) प्रेम असते. दुःखात हे दैवत आधार देते. ते मृतांच्या आत्म्यांचे रक्षणही करते. ही देवाबद्दलची सामाजिक आणि नैतिक संकल्पना आहे.

भीतीच्या धर्माचे रूपांतर अशा नैतिक धर्मामधे कसे होते हे ज्यू लोकांच्या जुन्या पवित्र ग्रंथांमधे वाचता येते. “नवा करार” अशाच रूपांतरणाचे वर्णन म्हणता येईल. विशेषतः पौर्वात्य देशातील सुखवस्तु नागरिकांच्या धर्माचे वर्णन नैतिक धर्म असे करता येईल. लोकांच्या आयुष्यातील भीतीच्या धर्माचे रूपांतर नैतिक धर्मात होणे हा एक महत्वाचा टप्पा मानला पाहिजे. मात्र अविकसित लोकांचा धर्म हा भीती–धर्मच असे मानणे हे ही चुकीचे ठरेल. विकसित आणि अविकसित या दोन्ही लोकांचा धर्म भीती व नैतिकता या दोन्ही प्रकारांचे मिश्रण असते. विकसित लोकांच्या धर्मात नैतिक विचारांचा भाग मोठ्या प्रमाणात असतो इतकेच. पण या दोन्ही धर्म प्रकारांत देवाची संकल्पना हा सामायिक भाग आहे.

काही अपवादात्मक क्षमता असणाऱ्या व्यक्ती किंवा समाज, या दोन्ही धर्मप्रकारांच्या वरच्या पातळीवर जातात. या पातळीवर एक उच्च प्रतीचा धार्मिक अनुभव त्यांना येतो. पण हा अनुभव नेहमीच शुद्ध असतो असे नाही. मी या अनुभवाला वैश्विक धर्माची जाणीव असे म्हणतो. ज्यांना हा अनुभव नाही त्यांना तो काय असतो हे समजावून सांगणे मोठे अवघड आहे. अनुभवाच्या या पातळीवर मनुष्याशी साधर्म्य असणारा देव असत नाही. या पातळीवर माणसाच्या इच्छा आणि ध्येये यातल्या फोलपणाची जाणीव होते. निसर्गातील नियमबद्धता आणि विचारांतील सौंदर्य यांतील शक्ती जाणवते. या पातळीवर देह व व्यक्तिगत नियती ही तुरुंगासमान भासते. स्वतःच्या सर्वंकष अस्तित्वाचा अनुभव अर्थपूर्ण (वैश्विक) एकात्मतेतून तो घेऊ पहातो. अशा जाणीवेची सुरुवात आधीच्या पातळीवर काही वेळा झालेली दिसते (उदा. डेव्हिड लिखित स्तोत्रे आणि “प्रॉफेट” ). हा वैश्विक पातळीचा भाग बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणात दिसतो. ही गोष्ट शॉपेनहॉवर यांच्या बौद्ध धर्मविषयक निबंधांतून मांडली आहे.

कोणत्याही काळात, अध्यात्मिक श्रेष्ठजन त्यांच्या वैश्विक धर्माच्या जाणीवेमुळे वेगळे जाणवतात. ही जाणीव कोणतीही धार्मिक झापडे लावत नाही किंवा देवाला माणसाच्या रूपात आणत नाही. त्यामुळे ज्याचे मूलभूत तत्व वैश्विक सत्याचा अनुभव हे आहे असे चर्च, देऊळ किंवा मठ असतच नाही . विविध काळातील नवमतवादी विचारवंतांमधे असा अनुभव घेतलेले लोक आढळतात. त्यांच्या त्यांच्या काळात ते लोक एक तर निरीश्वरवादी म्हणून ओळखले गेले किंवा संत म्हणून. डेमॉक्रिटस्, असिसीचे संत फ्रॅन्सिस किंवा स्पिनोझा ही अशा लोकांची उदाहरणे सांगता येतील.

वैश्विक जाणीवेचा हा धर्म, देव किंवा धर्मतत्वे मानत नाही. त्यामुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पोहोचणार कसा ? मला असे वाटते की कला आणि विज्ञान या दोन्हींनी या (वैश्विक) धर्माची जाणीव, जे ती घेऊ शकतील त्यांच्यात जागी ठेवावी.

त्यामुळे आता आपण विज्ञान आणि धर्म यांच्यातल्या परस्परसंबंधाचे स्पष्टीकरण करू शकतो. हे स्पष्टीकरण परंपरागत स्पष्टीकरणापेक्षा भिन्न आहे. धर्म आणि विज्ञान हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्याचे कारण समजणे अवघड नाही. ज्या व्यक्तीला निसर्गातील रचना किंवा घटनांमागचा कार्यकारणभाव बहुतांशी समजला आहे, ती व्यक्ती अशा घटना किंवा रचनांमधील देवाचा हस्तक्षेप स्वीकारणे शक्यच नाही. भीती–धर्म किंवा नैतिक धर्म, दोन्ही, अशा व्यक्तीवर प्रभाव टाकू शकत नाहीत. बक्षिस देणारा किंवा शिक्षा ठोठावणारा देवही ही व्यक्ती मान्य करणार नाही. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या आंतरिक आणि बाह्य गरजेनुसार कृती करते पण देवाच्या दृष्टीने त्या व्यक्तीला निर्जीव वस्तू इतकेच महत्व आहे कारण सजीवांचे प्राक्तनही तोच ठरवत असतो ना !

या सगळ्याचा परिणाम म्हणून विज्ञानावर असा आरोप केला जातो की विज्ञान नीति–नियमांना कमी लेखते. पण हा आरोप चुकीचा आहे. माणसाचे नैतिक वर्तन सह–अनुभूती, शिक्षण आणि सामाजिक संबंध यांच्यावर आधारित असते आणि त्यासाठी धर्माची गरज रहात नाही. नरकाच्या शिक्षेची भीती किंवा मृत्यू नंतर स्वर्ग मिळण्याची आशा यावर माणसाचे जीवन आधारित असेल तर त्याची अवस्था केविलवाणीच म्हणायला हवी.

त्यामुळे धर्मपीठे नेहमीच विज्ञानाच्या विरोधात राहिली आणि विज्ञानाच्या पाठिराख्यांचा त्यांनी छळ केला. या उलट मी हे ठामपणे सांगू शकतो की वैश्विक धर्माचा अनुभव वैज्ञानिक संशोधनासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. दैनंदिन जीवनातून आणि इच्छा आकांक्षांपासून घेतलेली निवृत्ती, अपार श्रम आणि कामाला वाहून घेण्याची वृत्ती या मुळे अनेक क्रांतिकारी गोष्टींची निर्मिती झाली. वस्तुमात्राच्या नियमबद्ध रचनेवर असलेला ठाम विश्वास आणि कार्यकारणभावाची छोटीशी झलक पहायला मिळावी अशी तीव्र इच्छा या मुळेच केपलर आणि न्यूटन यांनी वर्षानुवर्षे एकट्यानेच काम केले आणि आकाशस्थ यंत्रणांची कोडी सोडवली.

ज्यांना वैज्ञानिक संशोधनाचा फक्त व्यवहारी उपयोगच माहिती आहे त्यांना टीकाकारांनी वेढलेल्या आणि तरीही देशोदेशीच्या लोकांना शतकानुशतके मदत करणाऱ्या संशोधकांची मनस्थिती समजणे फार अवघड आहे. सतत येणारे अपयश पचवून आपल्या ध्येयाशी निष्ठा बाळगणे फार कठीण काम आहे. केवळ वैश्विक धर्माची जाणीवच अशी प्रेरणा देऊ शकते. ज्यांनी अशा तऱ्हेचे काम करण्यात आयुष्य घालवले आहे त्यांनाच या प्रेरणेची कल्पना येऊ शकेल.

आताच्या ऐहिक जगात संशोधन करणारे लोकच खऱ्या अर्थाने धार्मिक असतात, असे जे म्हटले जाते ते अगदी खरे आहे.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-17 Fri 14:40