UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


दूरशिक्षण

मला जे शिकायचे आहे ते माझ्या गावात शिकवत नाहीत.

ही तक्रार इंटरनेटच्या जमान्यात करणे योग्य होणार नाही. मला जो विषय शिकण्याची इच्छा आहे, त्याच्या संबंधी अनेकानेक संकेतस्थळांचा आपण शोध घेऊ शकतो. नंतर त्या ठिकाणी जाऊन त्या विषयातली माहिती मिळवणे हे चक्क एका बोटाच्या टिचकीसरशी (click) आपण करू शकतो.

दुर्दैवाने (विशेषतः भारतात) माहिती आणि ज्ञान यातला फरक समजून घेण्याची गरजच व्यवस्थेने निर्माण केलेली नाही. नव्या पिढीच्या हातात संगणक आणि इंटरनेट आल्यानंतर, त्याचा वापर माहितीतून ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी व्हावा हे अपेक्षित आहे. या मिळालेल्या ज्ञानातून आपल्या सगळ्यांची समृद्धी वाढावी, आणि सगळ्या समाजाचा विकास व्हायला हवा.

इंटरनेट वरून शिकताना काही विशेष मर्यादा पडतात.

  • आपण शिक्षकांची व्याख्याने ऐकून किंवा पुस्तक वाचून स्वतःच्या टीपा काढून शिकत असू तर त्यावेळी स्वतःला वहीत लिहावे लागते. लिहीत असताना मनात आणखी एकदा वाचले जातेच. इंटरनेटवरची माहिती संगणकावरच साठवायची असेल तर कॉपी पेस्ट करण्याचा मार्ग आपला वेळ वाचवतोच. पण त्यामुळे आपण लिहिण्याची प्रक्रिया लुप्त होते. यावेळच्या ज्यादा वाचनातून मिळणारी समज, कॉपी पेस्ट पद्धतीमुळे नाहीशी होते.
  • खरेतर अनेक संकेतस्थळांवरून घेतलेली माहिती आपण अनेकदा पुन्हा उघडून वाचतही नाही. मग ती वाचून रवंथ करणे दूरच.

या मर्यादा ओलांडण्यासाठी संगणकीय शैक्षणिक प्रणालींचा वापर करणे गरजेचे ठरते. ब्लॅकबोर्ड, मूडल, डोकिओस, क्लॅरोलाइन, वर्डप्रेस अशा संगणकीय प्रणाली या साठी वापरल्या जातात. ज्या संकेतस्थळावर अशा तऱ्हेने शिकवले जाते तेथे या प्रणालींमुळे –

  • शिकणारा आणि शिकवणारा एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात.
  • रचनाबद्ध रीतीने सर्व अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.
  • नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षकांच्या आवाजातील व्याख्यान ऐकता येते. त्यांनी केलेले प्रयोग चित्रपट्टीवर पहाताही येतात.
  • अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना, येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी चर्चा मंडळे (फोरम्स), लिखित संवाद (चॅट), यांचा वापर करता येतो.
  • केलेला गृहपाठ शिक्षकाकडून तपासून मिळतो. आणि त्यात सुधारणाही सुचवल्या जातात. आदर्श उत्तर कोणते आहे हे त्वरित वाचावयास मिळते.
  • शिक्षणासाठी आवश्यक ती शिस्त पाळावी लागते. पण आपल्या सवडी नुसार व आपल्या वेगाने शिकता येते.
  • संगणकीय प्रणालींमुळे परीक्षाही इंटरनेटवरच देता येतात. त्याचे निकाल बहुतेकवेळा लगेच मिळतात.
  • स्वतः वाचून अभ्यास करण्याची, विषय समजून घेण्याची व ज्ञान वापरण्याची सवय लागते. शेवटी व्यवहारात हेच एक कौशल्य उपयोगी पडते असा अनुभव आहे.

मी मायक्रोकंट्रोलर या विषयावर इंटरनेटवर मार्गदर्शन करतो. अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
freebirdEmail.png


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-17 Fri 10:20