UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


बुद्धाचा संघ

धर्माची दीक्षा देण्यासाठी जी तीन विधानं उच्चारावीत असा बुद्धांचा आदेश आहे, ती अतिशय प्रसिद्ध आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि ही ती विधानं होत. त्यापैकी तिसऱ्या म्हणजे ज्या संघाला शरण जायचं त्या संघाबद्दल मी काही स्वतंत्र विचार या लेखात मांडणार आहे.

हे विचार मांडण्याआधी तथागतांनी ज्या परिस्थितीत धर्मोपदेश केला त्याचा विचार करूया. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा हा काळ आहे.

माणूस शिकारी आणि टोळी या पातळीवरून पुढे आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. युद्धं चालू आहेत पण जीवनावश्यक वस्तू आणि सेवांसाठी एकमेकांचं सहकार्य मिळवणं हा एक चांगला पर्याय लोकांना समजला आहे. याचंच एक प्रगत स्वरूप म्हणून वणिग् (व्यापार) युगाचा उदयही झालेला दिसतो. नाणी या रूपात चलनही विकसित झालं आहे (याचा त्रिपिटकात उल्लेख आहे) .

पाणी, शेतीसाठी आणि पिण्यासाठी गरजेची गोष्ट. त्यावरून शेजारी राजांमधे तंटेही सुरू आहेत. अशाच तंट्यासंदर्भात युद्ध न करण्याचा निश्चय बुद्धांनी (राजपुत्र असताना) जाहीर केला होता. युद्धाच्या विरोधातला हा निर्णय प्रसिद्ध आहे. एका क्षत्रियानं युद्धाच्या विरोधात बोलणं हे विलक्षण आहे.

आणखी एक क्रांतिकारक विचार तथागत मांडतात. तो चंगळवादाच्या विरोधात आहे. व्यापारयुगाचं रूपांतर चंगळवादात होईल हे द्रष्टेपण बुद्धांजवळ निश्चित असणार. म्हणून युद्धातून बाहेर पडण्याचा विचार मांडणारे बुद्ध अर्थव्यवस्थेतूनही बाहेर पडण्याचा विचार मांडतात. म्हणूनच भिक्खूंनी द्रव्यार्जन न करणं अपेक्षित आहे. पण अर्थव्यवस्थेत सगळंच काही वाईट नाही यांचं त्यांना भान आहे. उदाहरणार्थ लोकांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य हा अर्थव्यवस्थेचा सद्गुण आहे. शिवाय अर्थव्यवस्था मानवी जीवनाला एक उद्दिष्ट (पैसे मिळवण्याचं) देऊ शकते.
(धन ही संकल्पना बरीच जुनी आहे. ईशावस्य उपनिषदात पहिला मंत्र आहे-
ईशावास्यं इदं सर्वं |
यत्किंच जगत्यां जगत् ||
तेन त्यक्तेन भुंजीथा |
मा गृधः कस्यस्वित् धनम् ||

अर्थः जगी सर्व ठायीं ईश्वराचा वास असतो. जे जे जगात जगते त्याने, त्यागाने सर्व भोगावे कुणाचे ही धन लुबाडू नये.)

मानवी जीवनाचं उद्दिष्ट पैसा मिळवणं आहे हा अर्थव्यवस्थेचा समज धम्म काढून टाकतो. निब्बाण (निर्वाण) हे वेगळंच उद्दिष्ट तो मानवाला देतो. हे करताना इतर व्यक्तींची मदत होणार आहे. सहकार्य हा समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा महत्वाचा सद्गुण आहे. अनेक व्यक्ती जीवनात प्रगती होण्यासाठी एकमेकांना मदत करू शकतात. आठ पदरी मार्गावर चालत एकमेकांच्या सहकार्यानं निर्वाणाप्रत जाता येईल असं बुद्ध म्हणतात. यासाठी एकमेकांना मदत करणारा भिक्खूंचा जथा म्हणजे संघ !

भगवान बुद्धांनी स्वतःच्या माणूसपणाचा स्वीकार केला होता. त्यामुळे मृत्यूचाही. आपल्यानंतर निर्वाणाप्रत जाण्यासाठी संघच उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. निब्बाणापर्यंत जाणारे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे भिक्खू एकमेकांच्या अनुभवातून शहाणे होतील आणि प्रवास चालू ठेवतील. भिक्खू एकमेकांच्या आजारपणात एकमेकांची सेवा करतील. वाटेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पाळण्याचे नियमही (विनयपिटक) बुद्धांनी ठरवून दिले होते . त्यात योग्य वाटेल तेव्हा बदल करण्याचे अधिकारही होते. (कारण सर्वच अनित्य आहे अशी शिकवण हा धम्माचा अविभाज्य भाग आहे.)

समाजव्यवस्थेतील त्रुटी काढून टाकून व्यक्तिगत पातळीवर निब्बाण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बुद्धांनी संघ निर्माण केला.


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-17 Fri 15:42