UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


बोक्कोचान

दोन महायुद्धं होऊन गेली आहेत. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या दोन भीषण अणुस्फोटांच्या आता बऱ्याचशा जगात केवळ आठवणीच राहिल्या आहेत. अधिकाधिक देश आता स्वतःला अणुयुद्धासाठी सक्षम बनवून आपल्याला “विकसित” म्हणवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा वेळी पृथ्वीवर खरीच शांतता नांदावी, यासाठी आहेका कुठला उपाय ? कोणत्याही देशात, कोणत्याही खंडात किंवा कोणत्याही ग्रहावर ?

आहे असा एक अफलातून उपाय ! “राल” ग्रहावरचे लोक तो योजतात. एकमेकांकडे क्षेपणास्त्र रोखून बसलेले देश शांततेच्या वाटाघाटी करतात. क्षेपणास्त्रे काढून घेऊन एकजूट करतात. कसे ? कोणता उपाय ? तो यशस्वी ठरलाय ? याचं उत्तर आपल्याला मिळतं “भेट” या कथेत.

बँकेवर एकटा माणूस दरोडा घालतो. बँक लुटण्यात यशस्वी होतो. पोलिसांच्या कोंडीतही सापडतो. पण ताब्यात ठेवलेल्या ओलिसामुळे पोलिसांदेखत नाहीसा होतो. कोण असतो तो ओलिस ?

दुसऱ्या एका ग्रहावरचे दुष्ट लोक पृथ्वीवरच्या माणसांची कातडी सोलू बघतात. त्यांचे उपायही योजतात. पण काहीतरी गडबड होते आणि सगळे पृथ्वीवासीय जिवंत रहातात. कसे ?

कितीही दारू प्यायली तरी ती “तिला” चढतच नाही. एक दिवस मात्र दारूच साऱ्यांचा नाश घडवते. “तिच्याशिवाय” सर्वांचा.

अंतराळातून आलेली एक नळकांडी. त्यातून येणारा कर्कश, वैताग आणणारा आवाज. पोटात मळमळ चालू करून उलटी आणणारा वास. तो कशानं थांबला ? कसलं होतं ते यंत्र ?

सुरईतला सैतान प्रसन्न होऊन एका माणसाला हजारो नोटांची चळत देतो. पण त्या माणसाला त्याचा काहीच उपयोग होत नाही. का ?

फोनवरून भुताने संपर्क साधून सांगितल्याप्रमाणे एका माणसाला त्याच्या घराच्याच अंगणात प्राचीन नाण्यांचा खजिना सापडतो. पण त्यालाही तो खजिना वापरता येत नाही. का ? सोन्याच्या खडकांचाच एक ग्रह अंतराळ प्रवासात सापडतो. पण…….

या आणि अशाच उत्तमोत्तम उत्कंंठावर्धक लघु-लघु कथा आपल्याला वाचायला मिळतात जपानी साहित्यातील विज्ञान लघुकथांच्या विश्वात. प्रसिद्ध जपानी लेखक शिनिची होशी यांचा “बोक्कोचान व इतर जपानी कथा” हे या विश्वातले एक पुस्तक. हे पुस्तक आपल्या पर्यंत मराठीत पोचवण्याचं काम केलं आहे श्री. निस्सीम बेडेकर यांनी.

या कथा जरी जपानी असल्या तरी एखाद दुसरा अपवाद वगळता त्या स्थलकालनिरपेक्ष आहेत. अगदी कथानायकांची नावं सुद्धा श्री. “न” किंवा श्री. “स” अशी असल्यामुळे आपल्याला तशी सांस्कृतिक ठेच वगैरे मुळीच लागत नाही.

या संग्रहातील बऱ्याच कथा “विज्ञान काल्पनिका” या सदरात मोडणाऱ्या असतील. तरी काही मात्र आपल्या रोजच्या भोवतालच्या आयुष्यात घडू शकतील अशा किंवा निव्वळ कल्पनारम्य आहेत. शिवाय या कथांमधे कोणतीही अश्लील किंवा असभ्य वर्णने नाहीत . त्यामुळे ८ वर्षांपासून ते ८० वर्षांनंतरच्या वयाचा वाचक सारख्याच तन्मयतेने या कथाचा आस्वाद घेऊ शकतो. वाचकांचे मनोरंजन करता करता, त्यांना विचार करायला लावणाऱ्या काही कथा सूक्ष्म मनोव्यापारांवर टीका करणाऱ्याही आहेत. या सर्व कथांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा धक्कादायक अनपेक्षित शेवट. अनेकदा सर्वसामान्य वाटणारी कथा शेवटी वेगळ्याच उंचीवर पोचते.

या कथा वाचनीय होण्याचे श्रेय मूळ लेखक शिनिची होशी यांच्याइतकेच जाते ते श्री. निस्सीम बेडेकर यांना. कथा स्थलकालनिरपेक्ष असल्या तरी त्या मराठी बाजात आपल्यापुढे श्री. बेडेकर यांनीच सादर केल्या आहेत. प्रस्तावनेत श्री. बेडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे हा त्यांचा पहिलाच भाषांतरित कथासंग्रह असला तरी तो नवोदित चाचपडणाऱ्या लेखकाचा वाटत नाही.

श्री. शिनिची होशी यांच्या प्रमाणेच इतरही जपानी साहित्यिक श्री. निस्सीम बेडेकर यांनी आपल्यासाठी मराठीत भेटायला आणले तर मराठी वाचक त्यांचे नक्कीच स्वागत करतील.


अनुक्रमणिका

Author: चारुगीता दातार

Created: 2017-11-19 Sun 17:48