UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन जन लोकां…


बाखच्या पुष्पौषधी

बहुसंख्य व्याधींचा उगम मनातल्या ताण तणावांत असतो हे आता सर्वमान्य झालं आहे. या व्याधींना मनोकायिक व्याधी म्हटलं जातं. अशा व्याधींवरचा सुरक्षित उपाय आहे बाखच्या पुष्पौषधी. एडवर्ड बाख या ब्रिटिश होमिओपॅथ डॉक्टरांनी या पद्धतीचा वापर प्रथम केला. बाख यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी शोधलेल्या या ३८ औषधींचे सर्व गुणधर्म वाचता येतात. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच "ही पद्धत शास्त्रीय नाही", असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला आहे. असं म्हटलं जातं की डॉ. बाख आणि काही वनस्पती यांच्यामधील "मानसिक संवादातून" या पुष्पौषधींचा शोध लागला. शास्त्रीय - अशास्त्रीय अशा कोणत्या वादात न पडता, नेहमी उपलब्ध असणारी स्वस्त व सुरक्षित औषधे हा त्यांचा गुण मी लक्षात घेणार आहे. गेली २५ वर्षे विविध कारणांस्तव या औषधांचा वापर विविध व्यक्ती, पाळीव प्राणी यांच्यावर केल्यानंतरच मी हा लेख लिहिण्याचे धाडस करीत आहे. वाचन, प्रयोग, चर्चा आणि (कै. श्री. तळवलकर यांच्यासारख्या) ज्येष्ठांचे मार्गदर्शन या मार्गाने जमा झालेला अनुभव मी या लेखात लिहीत आहे. गोळ्या जरी होमिओपॅथिक औषधांसारख्या दिसल्या तरी या दोन्ही पद्धतींची मूळ तत्वे पूर्णपणे वेगळी आहेत.

 1. अॅग्रिमनीः वर वर आनंदी दिसणाऱ्या व्यक्ती. पण त्या मनातून खूप त्रास सहन करत रहातात. कुढ्या स्वभावाचे लोक.
 2. आस्पेनः अकारण किंवा माहिती नसलेल्या कारणाने वाटणारी थोडीशी गूढ भीती
 3. बीचः या व्यक्ती स्वतः नीटनेटक्या असतात त्यामुळे इतरांचा "गचाळपणा" यांना अजिबात सहन होत नाही.
 4. सेंटॉरीः नकार न देता येणाऱ्या व्यक्ती
 5. सेरॅटोः स्वतःच्या निर्णयक्षमतेवर विश्वास नसणाऱ्या व्यक्ती
 6. चेरी प्लमः पटकन परिस्थितीला शरण जाणाऱ्या (धीर सोडणाऱ्या) व्यक्ती
 7. चेस्टनट बडः चुकांपासून न शिकणाऱ्या व्यक्ती
 8. चिकरीः स्वार्थी, हट्टी प्रेम करणाऱ्या व्यक्ती
 9. क्लिमॅटिसः वर्तमानात काम न करता दिवास्वप्ने रंगवणाऱ्या व्यक्ती. (मुंगेरीलाल के हसीन सपने ही जुनी हिंदी मालिका आठवा.)
 10. क्रॅब अॅपलः स्वच्छतेचा अतिरेक करणाऱ्या व्यक्ती. स्वतःचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती.
 11. एल्मः जबाबदारीखाली पिचून गेलेल्या व्यक्तींसाठी
 12. जेन्टियनः तात्पुरत्या संकटाने धीर गळून पडणाऱ्या व्यक्ती
 13. गॉर्सः निराश आणि दुःखी व्यक्ती
 14. हीदरः आत्मकेंद्री व्यक्ती, स्वतःबद्दलच बोलणाऱ्या व्यक्ती
 15. हॉलीः द्वेष, हेवा, संशय घालवून प्रेम निर्माण करणारे औषध
 16. हनिसकलः भूतकाळातच रमणाऱ्या व्यक्ती
 17. हॉर्नबीमः काही करण्याच्या विचारानेच थकणाऱ्या व्यक्ती. कंटाळा विरोधी औषध
 18. इम्पेशन्सः चिडचिडेपणा, अधीर होणे या विरोधातील औषध
 19. लार्चः पूर्वतयारी करूनही आत्मविश्वास नसणाऱ्या व्यक्ती
 20. मिम्युलसः माहिती असणाऱ्या कारणांची भीती (उदा. उंचावरून खाली पहाण्याची, झुरळाची भीती)
 21. मस्टर्डः अकारण खचून जाणे
 22. ओकः पूर्ण दमून गेल्यावरही प्रयत्न तसेच चालू ठेवणाऱ्या व्यक्ती
 23. ऑलिव्हः शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी
 24. पाइनः अपराधी भावना बाळगणाऱ्या व्यक्ती
 25. रेड चेस्टनटः जवळच्या व्यक्तींबाबत अतिरेकी काळजी करणाऱ्या व्यक्ती
 26. रॉक रोजः प्रचंड धास्ती बाळगणाऱ्या व्यक्ती
 27. रॉक वॉटरः अतिरेकी शिस्त पाळणाऱ्या व्यक्ती, स्वतःला नाकारणाऱ्या व्यक्ती
 28. स्क्लेरँथसः पर्यायांपैकी निवड न करू शकणाऱ्या व्यक्ती
 29. स्टार ऑफ बेथेलेहेमः मानसिक किंवा शारीरिक धक्का बसलेल्या व्यक्ती
 30. स्वीट चेस्टनटः आत्यंतिक त्रास सहन करणाऱ्या, सर्व उपाय हरलेल्या व्यक्तींसाठी
 31. व्हरव्हेनः अति-उत्साही व्यक्ती
 32. व्हाइनः दुसऱ्यावर सतत अधिकार गाजवणाऱ्या, तडजोड न करणाऱ्या व्यक्ती
 33. वॉलनटः कोणत्याही बदलाला विरोध करणाऱ्या व्यक्ती, परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करणारे औषध
 34. वॉटर व्हायोलेटः पूर्ण (अतिरेकी) स्वावलंबनामुळे एकलकोडेपणा आलेल्या व्यक्ती
 35. व्हाइट चेस्टनटः नको असणारे विचार सतत घोंगावतात, त्या विरोधात औषधी
 36. वाइल्ड ओटः जीवनातील दिशा ठरवण्यात अनिश्चितता वाटणाऱ्या व्यक्ती
 37. वाइल्ड रोजः परिस्थितीला शरण गेलेल्या व्यक्तीसाठी
 38. विलोः दुसऱ्याला सतत दोष देणाऱ्या, रागावलेल्या व्यक्ती
 39. रेस्क्यू रेमेडीः ३९ वे औषध म्हणून एक ते अडतीस या पैकी पाच औषधींचे मिश्रण वापरले जाते. त्याला अचानक अपघातावरील औषधी (Rescue Remedy) म्हणता येईल. या औषधीत पुढील औषधांचे मिश्रण केलेले असते. अचानक झालेल्या मानसिक किंवा शारीरिक अाघातातून बाहेर येण्यासाठी जरूर वापरावे असे औषध.
  • रॉक रोज
  • इम्पेशन्स
  • स्क्लेरँथस
  • चेरी प्लम
  • क्लिमॅटिस

वरील सर्व औषधींच्या गुणधर्मांचा आणि लक्षणांचा अभ्यास करून ती औषधे निर्धोकपणे घेता येतात. कोणत्याही होमिओपॅथीच्या औषध दुकानात ही औषधे लगेच मिळतात. वाचकांनी ती जरूर वापरून पहावीत आणि आपले अनुभव आम्हाला या ठिकाणी इमेलने कळवावेतः-


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-13 Mon 11:17