शब्दशक्ती

शब्दे वाटू धन जनलोकां…


अनामवीरा…

"अळिंबीची ही जात खाण्यायोग्य नसते. दिसायला छान टवटवीत आणि डेरेदार. पण ही विषारी आहे." प्राध्यापिका सांगत होत्या आणि जीवशास्त्राचे विद्यार्थी असणारी मुलंमुली ऐकत, पहात होती. मग त्यातले काय विषारी आहे, त्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे सगळं सांगितल्यावर त्या म्हणाल्या, "यातलं विष ओळखण्यासाठी पूर्वी कोणीतरी प्राणाचंही मोल दिलं असेल का ? हा शोध किती महत्वाचा होता हे आपल्याला समजतंय्. पण तो कुणी लावला त्याचं (खरं म्हणजे तिचं. कारण खाद्यपदार्थ तपासणारी "ती" असण्याची शक्यता जास्त.) नाव आपल्याला ठाऊक नाही. अशा अनेक अनामवीरांनी आपलं जीवन (आणि जेवणही) समृद्ध केलं आहे."

या अनामवीरांच्या पराक्रमाचे परिणाम माणसांत इतके खोलवर रुजले आहेत की त्या नावांची आता आपल्याला गरजच उरलेली नाही. पण अशा अनेक अनामवीरांची आठवण ठेवणं निश्चितच कृतज्ञतेचं लक्षण ठरेल. कुसुमाग्रजांनी "अनामवीरा.." या त्यांच्या कवितेत अशी कृतज्ञता व्यक्त केलेली आढळते. कवितेतला हा अनामवीर युद्धभूमीवर पतन पावला आहे. कुसुमाग्रज लिहितात–

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जनभक्तीसाठी हपापून त्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवणारे "नेते" मी पहातो तेव्हा अशा अनामवीरांची आठवण मला तीव्रतेने होते.

घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात गर्दभरोहणं
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्

कपडे फाडून, भांडी फोडून किंवा गाढवावर बसून का होईना पण प्रसिद्धी पावावे. हा श्लोक किती जुना आहे हे सांगता येणं कठीण आहे. पण प्रसिद्धी पावण्याची माणसाची भूक जुनीच आहे हे आपल्याला मान्य करावेच लागते. सध्याच्या काळात तर स्वतःच्या मोबाइलवर सेल्फी काढत रस्तोरस्ती फिरणारे आत्मलुब्ध (narcist) जाता येता दिसतात. हे फोटो समाज-माध्यमांमधे टाकून प्रसिद्धी मिळवू पहाणारे नामवीर, आपल्याला किती "लाइक्स" मिळाले हे मिनिटामिनिटाला तपासत राहतात. अशा काळात अनामवीरांची स्तुती करण्याचे धाडस मी करतो आहे.

Slowly and sadly we laid him down,
From the field of his fame fresh and gory;
We carved not a line, and we raised not a stone,
But left him alone with his glory.
–Charles Wolfe

एका प्रसिद्ध इंग्रजी कवितेतल्या या ओळी सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या सेनानीचा मृत्यू गौरवतात. ऐन युद्धातच हा सेनानी धारातीर्थी पडला आहे. आम्ही त्याच्या नावाची ओळही त्याच्या थडग्यावर कोरू शकलो नाही, इतकेच काय खुणेचा दगडही तिथे रोवला नाही. त्याच्या कीर्तीसह आम्ही त्याला जमिनीखाली सोडून आलो…असं कवि म्हणतो. या सेनानीचे नाव सर जॉन मूर. त्याच्या दफनसमयी अशी कोणतीही खूण ठेवली गेली नाही हे खरेच. पण मग ही नंतर लिहिलेली कविताच त्याचे नाव गौरवणारा स्तंभ ठरली नाही का ? त्यामुळे या सेनानीला (त्याचा त्याग महान असला तरी) अनामवीर म्हणून गौरवण्यात मला संकोच वाटतो.

आपलं नाव व्हावं ही इच्छा कर्तृत्व दाखवण्यासाठीची एक प्रेरणा असू शकते हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पण समाजात माझं नाव होण्यासाठी मी जे काही समाजाला दिलं ते काय योग्यतेचं होतं हे पडताळता येत नाही. म्हणून मग सवंग लोकप्रियतेच्या इच्छेनं पछाडलेले बाजी मारून जातात. जनसामान्यांची कुवत साधारणच असते, त्यांची स्मरणशक्ती देखील सुमारच असते हे विचारात घेता त्यांच्या बळावर नामवंत होणे ही काही अवघड बाब ठरत नाही. त्यामुळे मग नामवंत होण्यासाठी वाढदिवसाचं निमित्तही (वय वाढण्यासाठी काहीच करावं लागत नाही !) पुरेसं ठरतं. हे पाहून मला अनेकदा खेद होतो पण लायकी नसताना मानसन्मान मिळण्यापेक्षा लायकी असताना मानसन्मानापासून मी वंचित राहिलो तरी चालेल. असं इंग्रज लेखक मार्क ट्वेन यांनी म्हटलं होतं. माझ्या खेदावर हा उतारा आहे असं मी मानतो.

अनामवीर अल्पसंख्य असले तरी त्यांची संख्या नगण्य नाही. भगवान बुद्धांनी साक्षात्कार झाल्यावर माझ्या आधी अनेक बुद्ध होऊन गेले आणि माझ्या नंतरही अनेक जण बुद्धपदाला पोचतील असं विधान केलं. हे अनामवीरच. वर्तुळाचा परीघ आणि त्याचा व्यास यांचं गुणोत्तर हा एक स्थिरांक असतो हे सत्य प्राचीन गणितज्ञांना माहिती होतं असं दिसतं. पण ते ज्या कोणाच्या लक्षात आलं त्यानं (किंवा तिनं) स्वतःचं नाव अमर केलं नाही. वेद-उपनिषदे आजच्या काळाशी किती सुसंगत आहेत याचं उत्तर नकारार्थी देऊनही मी प्राचीन साहित्यातल्या या अनामवीरांना नमस्कार करतो. वेरूळ अजिंठ्यातल्या शिल्पांखाली स्वतःचे नाव न कोरून अनामवीर बनलेल्या कलाकारांना माझा नमस्कार. यमुनेच्या तीरावर एका बादशाही लहरीसाठी संगमरवरी वास्तुशिल्प घडवणारे आणि दूर मिसर देशात कोण्या फारोहाला अमर करण्यासाठी मणामणाचे दगड वाहून ते रचून पिरामिड उभारणाऱ्या अनामवीरांना माझे सलाम.

वर ताजमहाल आणि पिरॅमिडची मी उदाहरणं दिली खरी. पण ती पाहिली की लक्षात येतं की काही जणांना सक्तीनं अनामवीर बनावं लागलं आहे. ताजमहाल किंवा पिरॅमिड बांधणारे यात येतात. त्यांच्यावर झालेला हा अन्यायच आहे आणि व्यवस्थेचे असे बळी अनेक असतील. कुरुक्षेत्रावर लढलेले जवळजवळ सर्व अठरा अक्षौहिणी सैन्य गारद झाले. काही मोजके वगळता त्यातल्या कोणाचीही नावे आपल्याला माहिती नाहीत, समजणारही नाहीत. पण हे नव्हते अनामवीर. हे व्यवस्थेचे बळी होते. त्यांचे हौतात्म्य म्हणजे राज्यकर्त्यांच्या दुरभिमानाचा परिणाम होता.

खरा अनामवीर कर्तृत्व गाजवतो ते आतल्या प्रेरणेतून. पण निर्मितीची ही प्रक्रिया निरपेक्ष असते. त्याला किंवा तिला काही घडवायचे असते, मग ते शब्दातून असो वा दगडमातीतून, रंगातून असो व सुरांतून. निर्मितीच्या त्या क्षणी अनामवीराचे मन उचंबळून येते, प्रतिभा उतू जाते. नवनवोन्मेषशालिनीप्रज्ञेचे लोट व्यवस्थेचे बांध उखडून फेकून देतात आणि सर्वदूर पसरतात, सर्वभर होतात. निर्मितीची तेजोशलाका सोलीव सत्याच्या दिशेने वहात सुटते. निर्मिकाला नाम-रूपाचे बंधन जाचक वाटू लागते. ही केवळ शब्दांची आतषबाजी नाही. या साऱ्याचा अनुभव आल्यावर समाजमान्यतेसारख्या गोष्टींचा विचार अनामवीर करत नाहीत यात आश्चर्य ते काय ?

ज्यांनी निरपेक्ष निर्मिती केली आहे त्यांनी हे सारे अनुभव घेतलेच असतील हे दुसरा कोणी सांगू शकणार नाही. कारण हे अनुभव व्यक्तिगत असतात. पण त्यांची प्रेरणा या अनुभवांच्या दिशेने त्यांना घेऊन जात असते हे निश्चित. आजच्या काळाशी असे अनुभव सुसंगत ठरतात का ? या प्रश्नाचं उत्तर मी होकारार्थी देतो. अगदी उदाहरणासहित. चिरस्थायी ठरेल अशी निर्मिती करणारा एक अनामवीर निर्मिक; माती, काच, धातु, लाकूड आणि नैसर्गिक धागा इतक्याच गोष्टी वापरून निर्मिती करतो आहे. संपर्क साधूनही स्वतःचं नाव प्रसिद्ध करायला या व्यक्तीनं नकार दिला. त्याच्या संकेतस्थळावर त्याच्या निर्मितीविषयी वाचता येईल.

दुसरं उदाहरण तर आणखीच चपखल बसणारं आहे. सातोशी नाकामोटो या (काल्पनिक?) व्यक्तीनं (की गटानं ?) block chain technology या तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. ३९००० ओळींचा, किचकट गणितानं भरलेला हा संगणकीय प्रोग्राम आहे. जगातल्या अनेक हुकुमशहांना या प्रोग्राममुळे त्यांची अर्थव्यवस्था कोसळून पडेल अशी धडकी भरली आहे. सातोशी नेमका कोण आहे किंवा ते किती आहेत याचा शोध अजूनही लागलेला नाही. अर्थशास्त्र आणि अतिप्रगत गणित यांचा एकत्र वापर करून मानवी प्रगतीचं एक नवं दालन या अनामवीरानं खुलं केलं आहे.

पाश्चात्य सिनेदिग्दर्शक वुडी एलन यांचं एक अवतरण जगप्रसिद्ध आहे. "पुढच्या जन्मी मला माझं आयुष्य उलट्या क्रमानं जगायला आवडेल. मी पहिल्यांदा मृतावस्थेतून जिवंत होणार ते एका वृद्धाश्रमात. रोज माझी तब्बेत सुधारतच जाणार आणि मग उत्तम निरोगी असल्यामुळे मला तिथून काढून टाकतील. मग मी माझं पेन्शन घ्यायला जाईन. माझ्या कामाला जेव्हा मी सुरुवात करीन, त्यावेळी मला सोन्याचं घड्याळ भेट म्हणून मिळेल आणि एक छानशी पार्टी दिली जाईल. ४० वर्षं असं काम केल्यावर मग माझा निवृत्तीचा दिवस येईल त्यावेळी मी कॉलेजात जायला उत्सुक असेन. कॉलेजनंतर मी शाळेत जाईन मग बालवाडीत जाईन. मग मी माझा जन्म होईपर्यंत एक लहान बालक बनेन. त्यानंतर मी एका आरामशीर उबदार खोलीत नऊ महिने काढीन. ….आणि मग…माझा अंत होईल तेव्हा मी समागमसुखाचा अत्युच्च आनंद बनलो असेन."

पातंजलयोगशास्त्रात "प्रतिप्रसव" ही अश्शीच प्रक्रिया सांगितली आहे, ज्यात योगी आपल्या जन्मापर्यंत उलट्या क्रमाने सारे अनुभव घेतो आणि मागल्या जन्मात प्रवेश करतो. आधुनिक शब्दात सांगायचं झालं तर पूर्वजांच्या साऱ्या जनुकांचे पाढे वाचून झाल्यावर या योग्याचे अनेक जन्म त्याला आठवतात. प्रत्येक जन्मात त्याचं नाव आणि रूप बदलतंच. आपल्याला कोणतेही विशिष्ट नाव नाही याचं प्रत्यंतर त्याला येतं. मग तो अनामवीर होतो. असा कोणी योगी आजवर तरी मला भेटलेला नाही. त्यामुळे वर सांगितलेल्या अनामवीरांचे आणि अशा योग्याचे काही नाते असते का या प्रश्नाचे उत्तर मला सापडलेले नाही.


तुम्हाला या लेखना बद्दल काय वाटतं हे तुम्ही मला जरूर कळवा. त्यासाठी इमेल ने इथे संपर्क साधाः
editormail.png


मुख्यपान

Author: सम्यक

Created: 2022-02-04 Fri 08:19